Android app on Google Play

 

गीता हृदय 8

निष्काम कर्म करणा-याची जीवनयात्रा चांगली चालते. त्याला चित्तशुद्धीचे फळ मिळतें. चित्तशुद्धीमुळें त्याला त्याच्या कर्मांतूनच ज्ञानहि मिळतें. महाभारतांत तुलाधार वैश्याची गोष्ट आहे. त्याच्याकडे जाजलि नांवाचा एक ब्राम्हण ज्ञानार्थ म्हणून आला. तुलाधार म्हणाला “माझ्या जवळ कोठलें ज्ञान? ज्ञान असलेंच तर तें एकच आहे. आणि तेंहि माझ्या तराजूच्या दांडीनें मला शिकविलें आहे. ही तराजूची दांडी जशी सरळ असते तसें माझें मन सरळ ठेवायला शिकलो आहे. शत्रु असो; मित्र असो; स्वजन असोत; परजन असोत; तराजूची दांडी सरळ तसें माझें मन.” तुलाधाराला त्याच्या वाणिज्याच्या स्वधर्मांतूनच चित्तशुद्धि मिळून मोक्षाचें ज्ञानहि मिळालें. सेना न्हावी, गोरा कुंभार, कबीर सर्वांना त्यांच्या त्यांच्या स्वधर्माचरणांतूनच चित्तशुद्धी होऊन ज्ञानहि मिळालें. सेना न्हावी दुस-यांच्या डोयी करी. दुस-यांच्या डोक्यातील मळ काढी. असा मळ काढतां काढतां त्याच्या मनांत विचार आला “मी दुस-यांच्या डोक्यांतील मळ काढीत आहे, परंतु माझ्या डोक्यांतील मळ मी काढला आहे का? “गोरा कुंभार मडकी भाजीं, कच्ची आहेत की पक्की तें पाही. असें करतां करतां त्याच्या मनांत विचार आला “मडकें कच्चें की पक्कें तें मी पाहतों. परंतु माझ्या जीवनाचें मडकें मी पक्के केलें आहे का?” सांवता माळी मळा करी. विषारी रान, निरूपयोगी तण उपटून टाकी. असें करतां करतां त्याच्या मनांत विचार आला “ माझ्या हृदयांतील वासनांचें विषारी गवत मीं उपटून टाकलें आहे का?” कबीर मोमीन होता. वस्त्रे विणीं. विणतां विणतां त्याच्या मनांत येई “माझ्या जीवनाचे वस्त्र मीं नीट विणलें आहे का? माझें निर्मळ जीवनवस्त्र प्रभूला देतां येईल का?”

अशा रितीनें त्या त्या कर्मांतूनच चित्तशुद्धि होऊन ज्ञानहि मिळते. कर्मयोगी आपल्या कर्मांने ही केवढाली फळें मिळवितो फळाची इच्छा मनांत धरून कर्में करणा-यास तें क्षुद्र फळ मिळेल. परंतु निष्कामवृत्तीने कर्मांत रंगलेला कर्मयोगी तें फळ मिळवून शिवाय चित्तशुद्धि मिळवितो. ज्ञानाचा अधिकारी होतो. मुक्त जणुं होतो.

स्वधर्मचरण सतत करीत राहिल्यानें समाजांतील दंभहि टळतो. एकादा केवळ निर्वासन झालेला ज्ञानी म्हणेल “मला आतां कशासाठी कर्म करावयाचें? मिळवायचें असें काय राहिलें आहे?” परंतु तो जर स्वस्थ बसेल तर इतरहि तसें करूं पाहतील. याची शांति व समाधान तर त्यांच्याजवळ नाही. परंतु केवळ वरपांगी अनुकरण करतील. समाजांत यामुळें दंभ मानेल. म्हणून कर्मयोगी सतत निष्काम सेवा करीतच राहतो.

असा हा कर्मयोग भगवान् श्रीकृष्ण सांगत आहेत. कर्माचा महिमा त्यांनींच शिकवावा. कोणतेंहिसेवाकर्म तुच्छ नाही हें त्यांनी स्वत:च्या जीवनांत दाखविलें त्यांनी गायी चारल्या. राजसूययज्ञांत उष्टीं काढलीं, शेण लावलें. जेव्हा शिशुपाल म्हणाला “त्या कृष्णाची काय अग्रपूजा करतां? तो गवळट गायी चारणारा कृष्ण. गोपाळकृष्ण असें म्हणवून घेण्यांतच मला आनंद आहे.” भगवंतांनी अर्जुनाचे घोडे हांकले. भारतीय युद्धांत सायंकाळ व्हावी, क्षत्रिय सायंसंध्या करावयास जावेत. परंतु भगवान् श्रीकृष्ण त्यावेळेस काय करीत असत? ते रथाच्या घोड्यांस पाण्यावर नेत. त्यांच्या अंगांत रूतलेली शल्यें काढीत. त्यांचा खरारा करीत. आपल्या पितांबराचा तोबरा करून त्यांतून चंदी देत. मोरोपंतांनीं वर्णन केलें आहे:

“औषध सुचणूक कल्पी पीतपट पसाहि तोबरा माप
श्रितसाहित्य कराया न बरा मांदार तो बरा मा-प” ।।


हा लक्ष्मीपति भक्तांची किती काळजी घेतो! कल्पवृक्षापेक्षां हा किती श्रेष्ठ ! हा भगवान् पितांबरांतून चंदी देत आहे!
अशा भगवंतांनी कर्माचा महिमा सांगितला आहे. असा हा प्रभु संतांनी उभा केला आहे. कर्माचा महिमा सांगून शेवटी भगवान् सांगतात “अर्जुना, स्वधर्माचरणानें मोक्ष हातीं येईल. परंतु कामक्रोध, नाना वासना, लोभ यांमुळे स्वधर्माचरण हातून नीट होणार नाही. तरी पण कामक्रोध ताब्यांत घे, संयमी हो आणि निष्काम कर्मयोगाच्या साधनानें कृतार्थ कर.”

गीता हृदय

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
गीता हृदय 1
गीता हृदय 2
गीता हृदय 3
गीता हृदय 4
गीता हृदय 5
गीता हृदय 6
गीता हृदय 7
गीता हृदय 8
गीता हृदय 9
गीता हृदय 10
गीता हृदय 11
गीता हृदय 12
गीता हृदय 13
गीता हृदय 14
गीता हृदय 15
गीता हृदय 16
गीता हृदय 17
गीता हृदय 18
गीता हृदय 19
मी शास्त्रज्ञ झाले तर
गीता हृदय 21
गीता हृदय 22
गीता हृदय 23
गीता हृदय 24
गीता हृदय 25
गीता हृदय 26
गीता हृदय 27
गीता हृदय 28
गीता हृदय 29
गीता हृदय 30
गीता हृदय 31
गीता हृदय 32
गीता हृदय 33
गीता हृदय 34
गीता हृदय 35
गीता हृदय 36
गीता हृदय 37
गीता हृदय 38
गीता हृदय 39
गीता हृदय 40
गीता हृदय 41
गीता हृदय 42
गीता हृदय 43
गीता हृदय 44
गीता हृदय 45
गीता हृदय 46
गीता हृदय 47
गीता हृदय 48
गीता हृदय 49
गीता हृदय 50
गीता हृदय 51
गीता हृदय 52