Android app on Google Play

 

गीता हृदय 5

तुरूंगाच्या भिंतींचीच फक्त काळजी घेतली जाते.” आपण या देहांत असलेलें आत्मतत्त्व पहात नाहीं. आपला आत्मा पंख फडफडवून सारीं कृत्रिम बंधनें, खोटे भेदभाव तोडून सर्व विश्वाला मिठी मारूं इच्छितो. परंतु त्याच्या भुकेकडे आपलें लक्ष नाही. आपण देहाचीच पूजा करित बसलों आहोंत. स्वत:च्या देहाची, स्वत:च्या जातीच्या लोकांच्या देहांची. जपानला वाटतें फक्त जपान्यांनी सुखांत लोळावें. जर्मनांना वाटतें जर्मनांची सत्ता असावी. इंग्रजांना वाटतें आपलें साम्राज्य असावें. परंतु सारे मानव सुखी व स्वतंत्र असूं देत असें कोण म्हणतो? जो तो आपले रंग, आपला देश, आपली जात पहात आहे. बाहेरच्या आकारांना आपण महत्त्व देत आहोंत. शिंपले हृदयाशीं धरीत आहोंत. मोती फेंकून देत आहोंत! गीता सांगते “अरे सर्वत्र भरलेला परमात्मा पहा. देहाला भुलून अखंड आत्म्याचे खंड पाडूं नका.” 

हिंदुस्थानांत ज्याप्रमाणें भेदांचा बुजबुजाट त्याप्रमाणें मरणाचाहि अपरंपार डर. इतर देशांनी मरणाचा जसा खेळ केला आहे. स्वदेशार्थ लाखों मरत आहेत. परंतु आपल्याकडे सारीच भीति! “लाठी बसेल, गोळी लागेल, तुरूंगांत जावे लागेल” अशी भीति एकमेकांस घालीत असतात. ज्ञानेश्वरांनी दु:खाने म्हटलें आहे:

“अगा मर हा बोल न साहती
आणि मेलिया तरी रडती”

मरणे हा शब्दहि उच्चारूं देत नाही. कोणी मेलें तर जगांत कोठें नसेल अशी आपली रडारड! असे कांतडीला कुरवाळणारे, सदैव भांडणारे जे करंटे त्यांच्या नशिबीं शतकानुशतकें गुलामगिरी नाही येणार तर काय?

आपण भेदांची डबकीं बुजबुजलीं पाहिजेत. देहाची क्षुद्रता ओळखली पाहिजे. देह हें ओळखली पाहिजे. देह हें साध्य नसून एक साधन आहे हें लक्षांत ठेवलें पाहिजे. स्वधर्माचरण करण्यासाठीं हा देह. स्वधर्म म्हणजे स्वत:चें कर्तव्य-कर्म. आपणांस जन्मत:च स्वधर्म प्राप्त होत असतो. आईबाप जसे शोधावा लागत नाहीं. आपण कोणत्या तरी एका प्रवाहांत जन्मत असतों. आपल्या सभोंवती विशिष्ट परिस्थिति असते. त्या परिस्थित्यनुरूप आपणांस स्वधर्म मिळतच असतो. उदाहरणार्थ, आपण परतंत्र हिंदुस्थानांत जन्मलों, म्हणून येथें जन्मणा-या प्रत्येकाचा स्वातंत्र्यासाठी धडपडणें हा आजचा स्वधर्म आहे.

परंतु स्वातंत्र्यासाठीं धडपडण्याचा जो स्वधर्म तोहि सर्वांचा सारखाच असेल असें नाहीं. प्रत्येकाची वृत्ति निराळी. कोणी म्हणेल मी हरिजनसेवा करून स्वातंत्र्याच्या कार्यांत मदत करतों. कोणी म्हणेल मी खादीचें काम उचलतों. कोणी  म्हणेल मी राष्ट्रभाषेचा प्रचारक होतों. कोणी म्हणेल मी चर्मालय काढतों. कोणी म्हणेल मी शास्त्रीय गोरक्षण हाती घेतों. कोणी म्हणेल मी साक्षरतेला वाहून घेतों. कोणी म्हणेल मी मधुसंवर्धनविद्येचा भक्त होतों. कोणी म्हणेल मी शेतक-यांची संघटना करतों. कोणी म्हणेल मी कामगारांत घुसतों. कोणी म्हणेल मी उघड बंड करतों. कोणी म्हणेल मी फांशी जातों. कोणी म्हणेल मी तुरूंगांत बसतों. जो तो आपापल्या शक्तीप्रमाणें, वृत्तीप्रमाणे स्वातंत्र्याच्या कामांत मदत करील.

याला स्वधर्म म्हणतात. स्वधर्म म्हणजे हिंदुधर्म, ख्रिस्ती धर्म असा अर्थ नव्हे. स्वधर्म म्हणजे स्वत:चा वर्णधर्म. वर्ण म्हणजे रंग. कोणता रंग घेऊन आपण जगांत आलों? आपल्या मनोबुद्धीचा कोणता रंग आहे? माझा कल कोठें आहे? तें पाहून तदनुरूप सेवाकर्म हाती घ्यावयाचें. त्या कर्तव्यकर्मासाठीं मग जगावयाचें, त्यासाठीं मरावयाचें.

“स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावह:”

गीता हृदय

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
गीता हृदय 1
गीता हृदय 2
गीता हृदय 3
गीता हृदय 4
गीता हृदय 5
गीता हृदय 6
गीता हृदय 7
गीता हृदय 8
गीता हृदय 9
गीता हृदय 10
गीता हृदय 11
गीता हृदय 12
गीता हृदय 13
गीता हृदय 14
गीता हृदय 15
गीता हृदय 16
गीता हृदय 17
गीता हृदय 18
गीता हृदय 19
मी शास्त्रज्ञ झाले तर
गीता हृदय 21
गीता हृदय 22
गीता हृदय 23
गीता हृदय 24
गीता हृदय 25
गीता हृदय 26
गीता हृदय 27
गीता हृदय 28
गीता हृदय 29
गीता हृदय 30
गीता हृदय 31
गीता हृदय 32
गीता हृदय 33
गीता हृदय 34
गीता हृदय 35
गीता हृदय 36
गीता हृदय 37
गीता हृदय 38
गीता हृदय 39
गीता हृदय 40
गीता हृदय 41
गीता हृदय 42
गीता हृदय 43
गीता हृदय 44
गीता हृदय 45
गीता हृदय 46
गीता हृदय 47
गीता हृदय 48
गीता हृदय 49
गीता हृदय 50
गीता हृदय 51
गीता हृदय 52