गीता हृदय 31
आणि अर्जुना, ही सोपी अक्षरें तुला सांगितली. परंतु कठिण अक्षरें व जोडाक्षरेंहि तुला शिकावी लागतील. एरव्ही ही विश्वग्रंथ वाचतां येणार नाही. संतांच्या ठिकाणी देव पहायला तुला तूं शिकशील, परंतु रावणाच्या ठिकाणीहि देव पाहायला तुला शिकलें पाहिजे. रावण हें जोडाक्षर आहे. गायीच्या ठिकाणी देवत्व पाहशील, परंतु व्याघ्राच्या भीषणतेंतहि प्रभुरूप पहावयास शीक. फुलाच्या ठिकाणी प्रभुरूप पाहूं शकशील, परंतु त्या तेजस्वी नागाच्या ठिकाणीहि प्रभु पहां. एकदा पाव्हरीबाबांना साप चावला. परंतु ते म्हणाले “प्रभु आला व चुंबन देऊन गेला.” सर्पाच्या ठिकाणी त्यांना प्रेमळ परमेस्वर दिसला. अशी ही जोडाक्षरें शिकून, बारीक अक्षरेंहि शेवटी शिकलें पाहिजे. गंगेच्या ठायी प्रभु पाहिला, परंतु दंवबिंदूंतहि तो मला दिसला पाहिजे. आकाशाला कवटाळूं पाहणा-या, हजारों पक्ष्यांना आश्रय देणा-या शीतळ वटवृक्षाचे ठायी देव मानणें सोपें आहे; परंतु लहान तृणाचे ठायीहि ईश्वरी प्रभा पहावयास आपण शिकलें पाहिजे.
अशा रीतीने आपण शिकत गेले पाहिजे. म्हणजे सर्वत्र परमेश्वरच दिसेल. सारेच जसे गोड. त्या वैदिक मंत्रांत ऋषी म्हमतो ना:
“मधु वाता ऋतायते मधु क्षरन्ति सिन्धव:
माध्वीर्गावो भवन्तु न:
मधु नक्तमुतोषसि, मधुमत्पार्थिवं रज:”
सारेच गोड ! वारे गोड, तारे गोड. दिवस गोड, रात्रहि गोड. नद्या गोड, गायी गोड. मातीचा कणहि गोड ! ज्या मातीच्या कणांतून फुलांना रूप-रस गंध मिळतो, फळांना रस-रंग मिळतात, तो मातीचा कण का सुंदर नाही.
अशा रितीनें शिकत शिकत आपण जाऊं या. हा विश्वग्रंथ आपण वाचूं या रविन्द्रनाथ म्हणतात “परमेश्वर फुलांच्या रूपानें, ता-यांच्या रूपानें, आकाशांतील अनंत रंगाच्या रूपानें, पाखरांच्या रूपानें, वायुलहरीच्या रूपानें आपणांस पदोपदी क्षणोक्षणी संदेश पाठवतो. परंतु ही वाचणार कोण ?”
ही पत्रें वाचायला शिकला तो खरा ज्ञानी. तो खरोखर शिकला. बाकीची सारी पोपटपंची आहे. ज्ञानाचा मिथ्या भार आहे तें मंगलमय ज्ञान आपण मिळवूं या. विश्वग्रंथात सर्वत्र प्रभुरूप पहायला शिकून मुक्त होऊं या. आनंदसिंधूंत डुंबूं या.