Get it on Google Play
Download on the App Store

मी शास्त्रज्ञ झाले तर

अशा रितीनें देवाजवळच आपलें सुखदु:ख सांगणारे, त्याची करूणा भाकणारे तेहि एकप्रकारें आर्तभक्तच. परंतु गीतेंतील आर्तभक्त तो हा नव्हे. गीतेतील आर्तभक्त उदार आहे. तो स्वत:च्या दु:खाने दु:खी नसून, दुस-यांचे दु:ख पाहून दु:खी झालेला आहे. समर्थ रामदास स्वामी लहानपणीं घरांत कोठे तरी लपले होते. आठ-दहा वर्षाचें वय; परंतु आजुबाजूचें अपरंपार दु:ख व दैन्य पाहून त्यांचे हृदय जणुं पिळवटून गेलें. बाळ कोठें गेला म्हणून आई धुंडीत होती. शेवटीं खोलीत एका कोप-यांत बाळ आढळला. आई म्हणाली “वेड्या, येथें अंधारांत काय करतोस? तो उदार मनाचा बाळ म्हणाला “आई, चिंता करितों विश्वाची.” समर्थ बाळवयांतच विश्वाची चिंता करूं लागले. सर्वांना सुखी कसें करतां येईल याची विवंचना करूं लागले. ती आर्तभक्ति होती. विवेकानंदाची अशीच एक गोष्ट आहे. एके दिवशी रात्री त्यांना झोप येईना. डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वहात होत्या. उशी ओलीचिंब झाली. त्यांच्या मित्रानें विचारलें “काय झालें? कां रडतां?” ते म्हणाले “काय सांगू ? या माझ्या देशाची स्थिति कशी सुधारूं ही चिंता मला रडवीत आहे. तुम्ही माणसांचे पशू केले आहेत. अस्पृश्यांची किती केविलवाणी दशा ! स्त्रियांची किती दुर्दशा ! सर्वत्र विषमता, अज्ञान ! जिकडे तिकडे गुलामगिरी. स्वकियांची व परकीयांची. सारें आकाश जणुं फाटलें आहे असें वाटतें. परंतु मला जर एक हजार सेवक मिळतील, सिंहाच्या छातीचे, निश्चयी वृत्तीचे वीर मिळतील, तर या हिंदुस्थानचे स्वरूप मी बदलून टाकीन.” अशी विवेकानंदांची आर्तभक्ति होती. दुस-याचें दु:ख पाहून सारखी तळमळ वाटणें म्हणजे आर्तभक्ति. विवेकानंदांनी देशभक्तीची व्याख्या करितांना एके ठिकाणी म्हटलें आहे “तुम्ही तुमच्या देशबंधूंच्या सुखदु:खाशी एकरूप झाला आहांत का? त्यांच्या नाडीच्या ठोक्याबरोबर तुमच्या नाडीचे ठोके पडतात का? त्यांच्या हृदयाबरोबर तुमचें हृदय उडतें का? बोला. असें असेंल तर देशभक्तीची पहिली पायरी तुम्ही चढलेत असें मी म्हणेन.”

अशा आर्तभक्तींतूनच जिज्ञासु-भक्ति उत्पन्न होते असें म्हटलें तरी चालेल. जगांत दु:ख आहे, अन्याय आहे, विषमता आहे, रोग आहेत. हे अपरंपार दु:ख कसें दूर करूं असें मनात येऊन मनुष्य विचार करूं लागतो. तो प्रश्न करूं लागतो. रोग पाहून हे रोग कां होतात याची चर्चा तो करूं लागतो. तो संशोधक होतो. जगांतील नाना प्रकारचें जें दु:ख तें दूर करण्यासाठी प्रयोग करूं लागतो.

हे जिज्ञासू भक्त आपल्याकडे फार झाले नाहींत. पाश्चिमात्यांत असे भक्त फार झाले. एक इटॅलियन शास्त्रज्ञ प्लेगाचें संशोधन करूं लागला. संशोधन करतां करतां त्याला प्लेगची गांठ आली. केलेलें संशोधन त्या तापांत तो लिहून ठेवीत होता. एक जर्मन शास्त्रज्ञ प्रयोगालयांत प्रयोग करीत होता. एकदम स्फोट झाला. त्याचा एक डोळा फुटला, एक हात तुटला. दुस-या हातानें परमेश्वरास प्रणाम करून तो म्हणाला “ देवा, अजून एक डोळा शाबूत आहे. एक हात सुरक्षित आहे. तुझें रूप मी शोधून काढीन.” असे जिज्ञासू भक्त पाश्चिमात्य संस्कृतीच्या पायांत आहेत. कोणी ध्रुवावर जातात, तेथें संशोधन करतात. कोणी हिमालयावर पुन्हां पुन्हां चढायला येतात. मानवी सुखांतकशी भर घालतां येईल यांचे कोणी प्रयोग चालवितात. हे सारे जिज्ञासू भक्त होत.

गीता हृदय

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
गीता हृदय 1 गीता हृदय 2 गीता हृदय 3 गीता हृदय 4 गीता हृदय 5 गीता हृदय 6 गीता हृदय 7 गीता हृदय 8 गीता हृदय 9 गीता हृदय 10 गीता हृदय 11 गीता हृदय 12 गीता हृदय 13 गीता हृदय 14 गीता हृदय 15 गीता हृदय 16 गीता हृदय 17 गीता हृदय 18 गीता हृदय 19 मी शास्त्रज्ञ झाले तर गीता हृदय 21 गीता हृदय 22 गीता हृदय 23 गीता हृदय 24 गीता हृदय 25 गीता हृदय 26 गीता हृदय 27 गीता हृदय 28 गीता हृदय 29 गीता हृदय 30 गीता हृदय 31 गीता हृदय 32 गीता हृदय 33 गीता हृदय 34 गीता हृदय 35 गीता हृदय 36 गीता हृदय 37 गीता हृदय 38 गीता हृदय 39 गीता हृदय 40 गीता हृदय 41 गीता हृदय 42 गीता हृदय 43 गीता हृदय 44 गीता हृदय 45 गीता हृदय 46 गीता हृदय 47 गीता हृदय 48 गीता हृदय 49 गीता हृदय 50 गीता हृदय 51 गीता हृदय 52