गीता हृदय 13
अध्याय ५ वा
कर्मामध्यें विकर्म ओतलें की त्या कर्मांचें अकर्म होतें. कर्म करून जणुं संन्यासी. संन्यास म्हणून निराळी वस्तूच जणुं नाही. पांचव्या अध्यायांत कर्मयोग व संन्यास यांची तुलना आहे. कर्मयोग श्रेष्ठ कीं संन्यास श्रेष्ठ? कोणता मार्ग घ्यावा? भगवान् म्हणतात “ अरे, संन्यास व कर्मयोग हेका वेगवेगळे आहेत? संन्यास वा कर्मयोग यांत फरक आहे असें म्हणणारे वेडे आहेत.” खरोखर हीच गोष्ट आहे. संन्यास व कर्मयोग म्हणजे वेडे आहेत. “खरोखर हीच गोष्ट आहे. संन्यास व कर्मयोग म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू.
तरीहि ‘कर्मयोगो विशिष्यते’ असें म्हटलें आहे. हें कोणत्या अर्थानें म्हटलें आहे. संन्यासापेक्षां कर्मयोगांत विशेष असें काय आहे? विशेष आहे तें हें की कर्मयोग आपण समजूं शकतों. कर्मयोग म्हणजे रात्रंदिवस कर्म करीत असूनहि कांहीहि केलें नाही असें वाटणें. ही गोष्ट आपण जीवनांत अनुभवूं शकतों. या गोष्टीची आपणांस कल्पना येऊं शकते. आई मुलाची सेवा करते, परंतु तिला त्या सेवेचें ओझें वाटत नाही. आपण मित्रांसाठी कांही श्रम केले तर त्या श्रमांचा बोजा वाटत नाही. कर्मयोग समजायला सोपा आहे. कर्म करीत राहून अकर्मी दशेचा अनुभव घेणें हें जरा सोपें आहे. संन्यास म्हणजे कांहीहि न करता सारें करणे. कर्मयोग म्हणजे सारें करून कांही न केल्यासारखें वाटणें. यांतील संन्यास समजणें जरा कठिण. कांहिहि न करतां सारें कसें करावयाचें तें पटकन समजणार नाही. परंतु कर्मयोगाची कल्पना येते म्हणून तो विशेष आहे. सोपेपणाच्या दृष्टीनें कर्मयोगाचें विशिष्टत्व. एरव्हीं दोन्ही सारखेच.
चौथ्या अध्यायांत म्हटलें आहे कीं
“इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम
विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽव्रवीत्”
प्रभूनें हा योग प्रथम सूर्याला शिकविला आणि सूर्यापासून मनु म्हणजे विचार करणारा पहिला मानव शिकला. सूर्य म्हणजे कर्मयोग व संन्यास यांची मूर्ति आहे. सूर्याला कर्मयोगी म्हणावयाचें की संन्यासी म्हणावयाचें? सूर्य उदयाचलावर येऊन नुसता उभा राहतो. परंतु तो पूर्व दिशेला उभा राहतांच सा-या जगभर व्यवहार सुरू होतात. पक्षी उडूं लागतात. गुरें चरायला जातात. माणसें उठून नानाप्रकारचे उद्योग करूं लागतात. सारा अंधार नाहीसा होतो. सूर्य येतांच सर्व विश्वाला चालना मिळते.
‘मित्रो जनान् यातयति ब्रुवाणो’
असें वेदांत म्हटलें आहे. तो सूर्य मुकेपणानें जणुं हांका मारतो. सर्व लोकांना उद्योग करायला लावतो. असा जो हा सूर्य, त्या सूर्याला आपण जर म्हटलें “हे सूर्यनारायणा, तुझें केवढें कर्तृत्व ! तूं सारा अंधार दूर केलास. सर्व जगांत चैतन्य ओतलेंस. तुला कोटि कोटि प्रणाम.” तर तो सूर्य म्हणेल “तुम्ही काय म्हणतां तेंमला कळत नाही. कोणता अंधकार मीं दूर केला? मला चिमूटभर आणून तरी दाखवा. मी कांही करीत नाहीं. मी येथें नुसता उभा आहें.” सूर्य कांही करीत नसून सारें करतो. सारें करून काहीं करीत नाही. संन्यास व कर्मयोग यांची तो संमिश्र मूर्ति आहे. दोन्ही एकच असें जणुं विचारी मानवाला तो सांगत आहे.
आपण असें म्हणत असतों की शुक, याज्ञवल्क्य वगैरे संन्यासमार्गानें गेले. जनकादिक कर्मयोगाच्या मार्गानें गेले. परंतु याज्ञवल्क्यचाच शिष्य जनक व जनकाचाच शिष्य शुक्र. संन्याशाचा कर्मयोगी शिष्य व कर्मयोग्याचा संन्याशी शिष्य. गुरु-शिष्य यांच्यांत अभेद असतो. म्हणजेच संन्यास व कर्मयोग हे अंतर्यामी एकच आहेत.