Get it on Google Play
Download on the App Store

गीता हृदय 27

असा हा रोकडा भक्तिधर्म आहे. प्रत्यक्षवगम धर्म आहे. तुमच्या बंधूची सेवा करा. त्यांची सुकलेली तोंडें फुलतील. तुम्हांला परमसुख होईल. आपल्या सभोंवती असलेले लोक म्हणजेच भगवंत असें मनांत येऊन जर आपण कर्में करूं तर ती कर्में किती सुंदर होतील ! त्या कर्मांत एक प्रकारचें तोज येईल. आपला एकादा साधा मित्र यावयाचा असला तरी आपण किती काळजीपूर्वंक मनापासून सारें करतों. मग हा प्रत्यक्ष परमेश्वर आहे असें मानूं तर किती दक्षतेनें व हृदय ओतून तें कर्म करूं? कलकत्त्यांत एक महाराष्ट्रीय संन्यासिनी होती. तिनें मुलींची एक शाळा चालविली होती. एकदां विवेकानंद तिच्या भेटीसाठी गेले होते. त्यांनी विचारलें “माईजी, काय चाललें आहे?” ती तपस्विनी म्हणाली “या देवतांची सेवा करीत आहे.” ती संन्यासिनी त्या मुलीकडे किती आदरानें व भक्तीनें पहात होती. शिक्षकानें मुलांकडे याच दृष्टीनें पहावें. त्यांना दगड आहेस, नंदीबैल आहेस. असें म्हणूं नये. माझ्या समोरच्या मुलांत दिव्यता आहे. ती प्रकट व्हावी म्हणून मला उद्योग करावयाचा आहे. स्वत:मधील दिव्यता या मुलांनी प्रकट करावी म्हणून त्यांना साहाय्य देण्यास मी उभा आहें अशा भावनेनें शिक्षक वागेल तर तें अध्यापनकर्म कसें दिव्य होईल !

मी एकदां एका शहरी गेलों होतों. गव्हर्नर यायचे होते. गटारें सफा केली जात होती. झाटलोट होत होती. गव्हर्नर येण्याआधी त्या गावांत का माणसें रहात नव्हती? परंतु म्युनिसिपालिटीच्या सभासदांना व अध्यक्षांना गव्हर्नर देव वाटला. तो येणार म्हणून ते स्वच्छता करूं लागले. बाकीची पन्नास हजार जनता तिच्या प्राणांची जणुं किंमत नाही ! आपल्या शहरांतील सर्व लोक म्हणजेच परमेश्वराची रूपें असें मनांत वागवून म्युनिसिपालिटीचे सभासद वागतील, तर म्युनिसिपल कारभार, बोर्डाचा कारभार किती निराळा होईल ! असा हा थोर मानवधर्म नववा अध्याय सांगत आहे. सर्वत्र परमेश्वर पाहून त्याची तुझ्या कर्ममय पुष्पांनी पूजा कर, मानवांतील देव पहा, त्याला सुखी करण्यासाठी ऊठ, असा संदेश नववा अध्याय देत आहे.

आणि सर्वत्र परमेश्वर जो पाहूं लागला तो कोणाला तुच्छ मानणार, हीन मानणार? तो कोणाला अस्पृश्य म्हणून दूर लोटणार ? ज्ञानेश्वर म्हणतात, माझ्या भक्ताला मग जातिभेद दिसत नाहीत.

“तेथ जातीव्यक्ती पडे बिंदुलें”

जातीभेद, व्याक्तिभेद, यांच्या नावानें शून्याकार होतो. सर्वत्र मंगल परमात्माच दिसतो.

कर्म कोणतेंहि असो, तें ईश्वरार्पण भावनेनें जर आपण करूं तर सारे मुक्त होऊं. नववा अध्याय मोक्षाची दारें सर्वांना सताड उघडी करीत आहे:

“स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परांगतिम्”

 

गीता हृदय

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
गीता हृदय 1 गीता हृदय 2 गीता हृदय 3 गीता हृदय 4 गीता हृदय 5 गीता हृदय 6 गीता हृदय 7 गीता हृदय 8 गीता हृदय 9 गीता हृदय 10 गीता हृदय 11 गीता हृदय 12 गीता हृदय 13 गीता हृदय 14 गीता हृदय 15 गीता हृदय 16 गीता हृदय 17 गीता हृदय 18 गीता हृदय 19 मी शास्त्रज्ञ झाले तर गीता हृदय 21 गीता हृदय 22 गीता हृदय 23 गीता हृदय 24 गीता हृदय 25 गीता हृदय 26 गीता हृदय 27 गीता हृदय 28 गीता हृदय 29 गीता हृदय 30 गीता हृदय 31 गीता हृदय 32 गीता हृदय 33 गीता हृदय 34 गीता हृदय 35 गीता हृदय 36 गीता हृदय 37 गीता हृदय 38 गीता हृदय 39 गीता हृदय 40 गीता हृदय 41 गीता हृदय 42 गीता हृदय 43 गीता हृदय 44 गीता हृदय 45 गीता हृदय 46 गीता हृदय 47 गीता हृदय 48 गीता हृदय 49 गीता हृदय 50 गीता हृदय 51 गीता हृदय 52