गीता हृदय 4
अध्याय २ रा
दुस-या अध्यायाच्या आरंभी जीवनाचे महासिद्धान्त सांगितले आहेत. कोणते हे महासिद्धान्त? आत्मा सर्वत्र भरलेला आहे.
देह नाशिवंत आहे.
स्वधर्म अबाध्य आहे.
या तीन सिद्धान्तांत जीवनाचें सारें शास्त्र जणुं येऊन गेलें. आत्मा अनंत आहे. एकच तत्त्व जणुं सर्वत्र भरलेलें आहे. आपणांस याचा पदोपदीं थोडा तरी अनुभव येत असतो. आपणांस
सुखदु:ख होतें तसें दुस-यास होतें. आपण सारे समान, सारखे आहोंत. एकच चैतन्य सर्वांत खेळत आहे. सर्वत्र भरलेले हें आत्मतत्त्व पाहुणें म्हणजेच मोक्ष. परंतु आपण या आत्मतत्त्वाचे खंड खंड करतो. एकादी मौलवान पैठणी असावी, एकाद्या लहान मुलानें हातांत कात्री घेऊन त्या पैठणीचे तुकडे तुकडे करावे, तसें आपण करीत असतों. सर्वत्र भरलेल्या आत्मतत्त्वाचे आपण तुकडे करतों. एक सुंदर विणलेलें सणंग त्याच्या चिंध्या करतों आणि मग अंगावर घ्यायला कांही नाही म्हणून रडत बसतों! जगभर जी दु:खें आहेत, जे अन्याय आहेत, ज्या स्पर्धा आहेत, ज्या मारामा-या आहेत, जी युद्धें आहेत, त्या सर्वांचे कारण काय? एकच कारण. आणि तें म्हणजे आपण नाना कृत्रिम भेद निर्माण करीत असतों. सर्वत्र भरलेलें एक आत्मतत्त्व आपण पहात नाहीं. नदी वाहती असावी, परंतु नदींत ठायी ठायी बांध घालून जर आपण डबकी निर्माण करूं तर त्यामुळें हिंवताप मात्र येईल. डांस सर्वत्र होतील. मरून जाऊं. आज जगांत आपण सारे मरत आहोंत. कारण आपण डबकीं निर्माण केली आहेत. हे म्हणे गोरे, काळे, हे हिंदू, हे मुसलमान, हे कोकणस्थ, हे बाह्मण हे बाह्मणेतर, हे स्पृश्य हे अस्पृश्य, हे देशस्थ हे कोंकणस्थ, हे महाराष्ट्री हे गुजराथी, सारी डबकी! आपापल्या डबक्यांत बसून सारे बेडकांप्रमाणें अहंकारानें टरों टरों करीत आहेत. सर्वांवर मरणकळा येत आहे.
ज्या हिंदुस्थानानें गीता दिली, उपनिषदें दिली, त्या हिंदुस्थानांत भेदांचा जसा बुजबुजाट झाला आहे. ठायीं ठायीं आपापल्या क्षु्द्र जातीचीं डबकीं उभीं करून आपण करंट्यासारखे भांडत आहोंत.
ही अशीं डबकीं आपण कां निर्माण करतों? सर्वत्र भरून राहिलेलें आत्मतत्त्व आपण कां पहात नाही? कारण नाशिवंत देहालाच आपण महत्त्व देतों. गीता सांगते अरे, हा देह जाणारा आहे, हे मडकें फुटायचें आहे, हें वस्त्र फाटायचें आहे. या देहाला काय महत्त्व देतोस? यांतील आत्मा पहा. परंतु आपण रंगाचे ते माझे असें आपण म्हणूं लागतों. बाह्य रूपरंगांना महत्त्व देऊन डबकी निर्माण करतों. अरे, उद्या मेल्यावर एकाच मातींत सारे मिळून जाणार आहांत. ज्या शरीराची एवढी मातब्बरी तुम्हांस वाटते आहे तें नाशिवंत आहे.
“आधीं पलंगी झोंपती
शेवटी गोव-यांची संगती”
परंतु विचार करतो कोण? तुकारामांनी म्हटलें आहे :
“एकमेकांची दहनें
पाहती न होती शहाणे”
सारे शेवटी मातींत जातात हें पाहूनहि आपण शहाणे होत नाही. दु:खाची गोष्ट आहे.
रविन्द्रनाथांनी गीतांजलींत एके ठिकाणी म्हटलें आहे “या तुरूंगांत एक कैदी आहे. या कैद्याकडे कोणाचेंच लक्ष नाही.