गीता हृदय 34
अध्याय १२ वा
सातव्या अध्यायापासून आपण बाराव्या अध्यायापर्यंत आलों. भक्तीच्या ऊहापोहाचा हा शेवटचा अध्याय. हा लहानसा वास श्लोकांचा अध्याय अत्यन्त गोड आहे. अति पवित्र असा हा अध्याय आहे. कर्मवीर महर्षि अण्णासाहेब कर्वे यांनी आपल्या आत्मचरित्रांत मी बाराव्या अध्यायांतील श्लोक रोज गुणगुणत असतों असें लिहिलें आहे. हा अध्याय सर्वांनी पाठ करावा, म्हणावा. जीवनावर त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही.
या बारव्या अध्यायांत अर्जुनानें एक प्रश्न विचारला आहे. पांचव्या अध्यायांत ज्याप्रमाणें संन्यासी श्रेष्ठ कीं कर्मयोगी श्रेष्ठ असा प्रश्न आहे, त्याप्रमाणें येथें निर्गुणाचा उपासक तुला अधिक आवडतो की सगुणाचा उपासक तुला अधिक आवडतो, असा प्रश्न आहे, तेथें पाचव्या अध्यायांत भगवंतांनी उत्तर दिलें होतें की “अर्जुना, अरे संन्यासी वा कर्मयोगी हे दोघे सारखेच हो. त्यांच्यात द्वैत पाहणें, फरक पाहणें हे मूर्खपणाचे आहे. परंतु त्यांचला त्यांत पहायचेंच झालें तर कर्मयोग समजण्यास जरा सोपा म्हणून तो विशेष, असें म्हणावें पाहिजे तर.” हें जसें तेथें उत्तर देण्यांत आलें आहे, तसेंच उत्तर येथेंहि आहे. सगुण भक्त तुला आवडतो, की निर्गुण आवडतो? प्रभु या प्रश्नाचें काय उत्तर देणार? एकाद्या मातेला दोन मुलगे असावेत. एक चांगला मिळवता आहे, आईपासून दूर राहतो आहे; आणि दुसरा आईला क्षणभरहि सोडूं शकत नाही. त्या मातेला जर तुम्ही विचारलेंत की “ हे माते, या दोन मुलांपैकी तुला कोणता आवजतो ? तर ती माता काय उत्तर देईल ? ता म्हणेल “दोन्ही मला सारखेच आवडतात. परंतु हा लहानगा आहे ना, त्याला माझ्याशिवाय चैन पडत नाही. सारखा भोंवती भोंवती असतो. माझ्या पायांजवळ घुटमळतो. परंतु दोन्हा मला प्रियच आहेत.”
जीवनांत सगुण व निर्गुण दोहोंचा अनुभव हवा. तरच जीवनाला पूर्णता येईल. आपण सारे प्रथम सगुणपूजक असतों. बुद्धधर्मांत तीन गोष्टी सांगितल्या आहेत:
१ बुद्धं शरणं गच्छामि ।
२ संघं शरणं गच्छामि ।
३ धर्मं शरणं गच्छामि ।
आपण प्रथम एकाद्या महात्म्याभोंवतीं गोळा होतों. भगवान् बुद्धासारखी थोर विभूति उभी राहिली की त्या मूर्तीभोंवती आपण रूंझी घालूं लागतों. लोकमान्य टिळक होतें, त्यांच्या भोंवती जमले. अशा रीतीनें सगुण मूर्ति डोळ्यांसमोर ठेवून आपण जात असतों. कोणाची तरी मूर्ति डोळ्यासमोर हवी. बुद्धांची घ्या, लोकमान्यांची घ्या, महात्माजींची घ्या. त्या मूर्तीसमोर आपण उभे राहतों आणि प्रकाश मिळवितों. परंतु देह हा जाणारा आहे. सा-या मूर्ती, सारे आकार मोडायचे आहेत, मातीत जायचे आहेत. मूर्ति मोडली तर का रडत बसणार ? समर्थांच्या प्राणोत्क्रमणाची वेळ जवळ आली. सारे शिष्य रडूं लागले. तेव्हा समर्थ म्हणाले “हेंच का शिकलेत? अरे माझी पार्थिव मूर्ति लोपली तरी चिन्मय मूर्ति आहे. दासबोधाच्या रूपानें मीच आहें.”