गावाचे नाव :- वालावल
जिल्हा :- सिंधुदुर्ग
जवळचे मोठे गाव :- मालवण, कुडाळ, परूळे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात वालावल नावेचे पुरातन निसर्गरम्य गाव आहे. या गावात नारायणाचे पुरातन कौलारू मंदिर आहे. वालावल गावाचे ६ व्या शतकातील नाव बल्लावल्ली होते. गावाला लागून असलेले दाट जंगलांनी वेढलेले डोंगर, दर्या, गावाच्या उत्तरेकडून वहाणारी कर्ली नदी यामुळे प्राचीन काळापासून हे गाव एखाद्या वनदुर्गाप्रमाणे दुर्गम होते.
त्यामुळे प्राचीन काळापासून राजेरजवाडे, या भागातील अधिकारी यांनी या गावाचा आसरा घेतलेला आहे. इ.सनाच्या ११ व्या शतकात शिलाहार राजांचे या ठिकाणी वास्तव्य होते. नंतर विजयनगरच्या काळापासून बहामनी व नंतर विजापूरच्या राजवटी पर्यंत प्रभूदेसाई घराण्याकडे कुडाळ महालाची जहागिरदारी होती. त्यांचे वास्तव्यही वालावल गावात होते. इ.सनाच्या ११ व्या शतकात मुसलमानांनी गोवा काबीज केला. त्यावेळी गोव्यातील पेडणे महालातील हरमळ गावातून श्री देव नारोबाची मुर्ती ब्राम्हणांनी वालावल गावात आणली. त्यावेळी चंद्रभान व सूर्यभान हे वीर पुरुष याठिकाणी अधिकारी होते. त्यांनी नारायणाचे मंदिर बांधून वालावली गावाचे उत्पन्न मंदिराला दिले. मंदिरा समोरील दिपमाळांच्या मध्ये मंदिराची स्थापना करणार्या कल्याण पुरुषाची देवळी बांधण्यात आली आहे. लक्ष्मी नारायण मंदिराच्या स्थापनेचा काळ साधारण इ.स.१३५० ते १४०० च्या दरम्यान असावा. मंदिराची बांधणी चालुक्य पध्दतीची असून कालौघात मुळ मंदिराच्या बांधकामात भर पडत गेली.
विलोभनीय सृष्टीसौंदर्य, मनाला भुरळ घालणारा इथला नयनरम्य परिसर, जीवनाला जलसंजीवनी देणारी कर्ली नदी! आणि या अशा मांगल्याची, पवित्रतेची जपणूक करणारे श्री लक्ष्मीनारायण मंदिर नजिकच श्रीदेव रवळनाथ, उंचावर वसलेले व तेथून सुमारे तीन-चार कि.मी. लांब असलेले माऊली मंदिर! सारेच अविस्मरणीय!
वालावलचा श्री देव नारायण !
दंतकथेनुसार श्री नारोबा व माऊली हे भाऊबहीण तिर्थयात्रेला चालले होते. वाटेत वालावल गावी कुपीच्या डोंगर पठारावर (सड्यावर) माऊलीला तहान लागली म्हणुन श्री नारोबा पाणी आणण्यासाठी दरीत (गावात) उतरला. तेथील घरातून वड्याचा स्वयंपाक चालू होता. त्या वासाने नारोबाची भूक उफाळून आली. माऊलीला विसरून तो तिथेच जेवला. पोट भरल्यावर त्याला माऊलीची आठवण झाली. पाणी घेऊन भीत भीतच तो डोंगरावर गेला. नारोबा वेळेवर पाणी घेऊन आला नाही म्हणून माऊलीला खुप राग आला होता. रागाच्या भरात तिने नारोबाच्या श्रीमुखात दिली. (श्री नारोबाच्या मुर्तीच्या गालावरील खडडा याची खुण म्हणून दाखवतात.) या भांडणामुळे पुढे न जाता माऊली तिथेच राहीली.माऊलीचे देवालय पर्वती म्हणून सड्यावर बांधलेले आहे. (या ठिकाणी नवरात्रोत्सव होतो.) श्रीनारायणाचे मंदिर गावात आहे. दरवर्षी वैकुंठ चतुर्दशीस नारोबा, माऊलीस पाणी घेऊन जातो (श्रीनारायणाची पालखी पाणी घेऊन माऊली मंदिरात जाते.)
श्री लक्ष्मीनारायाणाचे देवालय गावांतील “मुडयाचा कोन” या नावाच्या दरीच्या पायथ्याशी बांध घालून बनविलेल्या सुंदर विस्तीर्ण तलावाच्या काठी बांधलेले आहे. नैसर्गिक सौंदर्यामुळे व प्रसन्नतेमुळे या स्थानाला आपोआपच गांभीर्य व पावित्र्य लाभले आहे.
ईतिहास - भगवान परशुरामाने कोकण प्रदेश वसविल्यापासून आर्यांची अधिसत्ता येथे सुरु झाली असावी. इ.स. पूर्वी २५० च्या सुमारास मौर्यवंशीय सम्राट अशोक याच्या अधिपत्याखाली रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा प्रदेश होता, असे इ.स. १८२२ मध्ये ठाणे जिल्ह्यात नालासोपारा या ठिकाणी सापडलेल्या शीलालेखावरून दिसून येते. सम्राट अशोकाच्या अखेरच्या काळात मौर्य सत्ता नष्ट होऊन हा प्रदेश सातवाहन किंवा शालिवाहन राजघराण्याकडे आला. त्यावेळी हा प्रदेश दक्षिण राष्ट्रांत मोडत असे. शालिवाहन राजघराण्याचा पहिला राजा सिमुक हा इ.स. पूर्वी ७३ व्या वर्षी गादीवर बसला. पैठण ही त्याची राजधानी होती. इसविसनाच्या सहाव्या शतकाच्या आरंभास चालुक्य कुळातील राजांनी दक्षिण राष्ट्र जिंकले. त्यांची राजधानी वातापीपूर (आत्ताचे विजापूर जिल्ह्यातील बदामी) ही होती. चालुक्यांनी दक्षिण कोकण ताब्यात घेतल्यापासून त्यांची दक्षिण कोकण व गोव्याची राजधानी रेवती द्वीप म्हणजे आजचे सिंधुदुर्गातील रेडी हे गाव होते. या चालुक्य कुळातील सत्याश्रय पुलकेशी नावाच्या राजाने आपला मुलगा चंद्रादित्य यास कुडाळ येथे राज्यकारभार करण्यासाठी पाठविले होते. हा चंद्रादित्य राजा व त्याची राणी विजयभट्टारिका ही फार उदार मनाची होती. राणी विजयभट्टारिका हिने कोचरे व नेरूर येथे काही जमिनी इनाम दिल्याचे ताम्रपट सापडले आहेत. वालावल गावाची वसाहतही प्राचीन असून नेरूर येथे सापडलेल्या एका ताम्रपटावरून या गावांचे चालुक्यकालीन नाव “बल्लावल्ली” असल्याचे दिसते. या ताम्रपटांतील उल्लेख असा-
“नदी तटस्थ बल्लावल्ली
सहम्यपूरयोर्मध्ये नेरूर नाम्ना ग्राम:”
या ताम्रपटाचा काळ इ. स. ७००-७०१ असा असून त्याचा मुख्य उद्देश चालुक्य नृपती विजयादित्य याने वत्सगोत्री जन्नस्वामी याचा पुत्र देवस्वामी याला बल्लावल्ली व सहम्यपूर (सध्याचे सरंबळ) या गावांच्या मध्ये असलेले नेरूर हे गाव दान दिले हे नमूद करण्याचा होता. त्यानंतर आठव्या शतकात राष्ट्रकूट वंशाची अधिसत्ता आली.
दक्षिण कोकणावर शिलाहार राजांनी पण राज्य केले. प्रथम ते राष्ट्रकूट व चालुक्यांचे मांडलिक होते. नंतर काही काळ स्वतंत्र राजे म्हणूनही राज्य करीत होते. “अकराव्या शतकाच्या सुमारास महालक्ष्मी लब्धवर प्रसाद ही उपाधी लावणाऱ्या कोल्हापूर शाखेच्या शिलाहार राजांनी ज्यावेळी कोकण प्रांतात राज्य मिळविले त्यावेळी वालावल येथील कुपीचा डोंगर या ठिकाणी त्यांचे वसतीस्थान असल्याचे दिसून येते” (असा हा सिंधुदुर्ग-ले. माधव कदम). शिलाहार भोजराजाने इ. स. ११०३ च्या सुमारास सिंधुदुर्गातील विजयदुर्ग किल्ला बांधला. इ. स. १२१२ मध्ये देवगिरीच्या यादव नृपती सिंधण याने शिलाहारांचे राज्य जिंकले. देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथील प्रसिद्ध शिवमंदिर यादवकुळातील राजांनी बांधले, असे म्हणतात. “यादवांच्या कारकिर्दीत कृष्णप्रभू या कुडाळदेशकर भारद्वाज गोत्री ब्राम्हणाला कोकणचा सर्वाधिकारी म्हणून नेमले गेले होते.” (असा हा सिंधुदुर्ग – श्री. माधव कदम) कै. रावबहाद्दूर वासुदेव अनंत बांबर्डेकर हे “मठगांवचा शिलालेख आणि ब्राम्हण सामंत राजवंश” या आपल्या पुस्तकात म्हणतात-
“इ.स. च्या बाराव्या शतकात कुडाळचे देसाई यांनी सर्व कोकणात पुष्कळ दूरपर्यंत स्वाऱ्या केल्या होत्या असे समजते.” (वि.ज्ञा.वि. पु. १८) ‘In the twelfth century the Desai of Sawantwadi, the most northern of the poligar chiefs, overran the whole of the kokan’ (Bom.Gazeteer- Sawantwadi History). सावंतवाडी हा शब्द इ.स. १८ व्या शतकाच्या सुरवातीस रूढ झाला (तत्पूर्वी त्या प्रदेशाला कुडाळ प्रांत म्हणत).
इ.स. १३१८-१९ मध्ये दिल्लीच्या मुस्लिम सुलतानांनी मलिक कफूरला पाठवून यादवांची सत्ता नष्ट केली व तिथून मुस्लिम सुलतानांची सत्ता सुरु झाली. मलिक कफूरच्या शेवटच्या स्वारीत गोमांतक त्याच्या साम्राज्यात गेला. “गोमंतकीय जनतेला मुसलमानी अंमल फार त्रासदायक झाला. हिंदू चालीरीती, समाजाची व्यवस्था, उत्कर्षाची साधने मुसलमानी विचारांच्या अगदी विरुद्ध असल्याने प्रत्येक ठिकाणी अपमान आणि त्रास सोसावे लागत. (आपल्या गोमांतक – गोमांतकाचा संक्षिप्त इतिहास- ले. श्री. प्रसाद गांवकर १९४७).
चौदाव्या शतकाच्या मध्यापासून मुसलमानांनी गोव्यात प्रलय मांडला होता, आणि हिंदूंची दैना होऊन त्यांची देवालये भ्रष्ट होऊ लागली होती. “इ.स. १३५१-५२ मध्ये बहामनी हसन गंगूने गोवा घेऊन कदंबांचे राज्य बुडविले. इ.स. १३५२ ते १३८० मध्ये बहामनी सत्तेने गोव्यांत धर्मांतर, प्रजेची छळवणूक करून देवालये भ्रष्ट केली. गोवा प्रदेशाचे राज्य कदंबांकडे होते. तेव्हा सप्तकोटीश्वराला त्यांनी आराध्यदैवत मानले होते…. बहामनी सलतनतीने कदंबांचा पराभव करून गोवा घेतले तेव्हा त्यांनी सोमनाथप्रमाणे याही मंदिरात संपत्ती पुरून ठेवली आहे. अशा समाजाने संपूर्ण मंदिर उद्ध्वस्त करून टाकले.” (अर्वाचीन गोव्याचा इतिहास खंड ३, श्री. बा. द सातोस्कर). याच धार्मिक छळाच्या काळात श्री देव नारायणाच्या हरमल येथील देवालयाला धोका उत्पन्न झाला असावा व त्याची पूजाअर्चा करणाऱ्या ब्राम्हणांनी श्री देव नारायणाची मूर्ती उचलून वालावल येथे आणली असावी व जंगलात लपवून ठेवली असावी.
इ.स. १३३६ मध्ये बुक्कराज व त्याचा मुलगा हरिहर यांनी विजयनगरच्या हिंदू राज्याची स्थापना केली. त्यांचा मुख्य प्रधान माधवाचार्य याने इ.स. १३४५ मध्ये कोंकण प्रांतावर स्वारी करून मुसलमानांना या प्रांतातून घालवून दिले असे कोचरे येथील इ.स. १३९१ (शा.श. १३१३) च्या नरहरी मंत्र्याच्या ताम्रपटावरून दिसते. याच सुमारास “१३८० मध्ये विजयनगर सम्राट बुक्क याच्या कारकीर्दीत माधव मंत्र्याने गोवा घेतले. व हिंदू धर्माची पुनःप्रस्थापना केली…. तुर्कांना हुसकावून सप्तकोटिश्वर व गोव्यातील इतर मंदिरांचा पुनरुद्धार केला.” (श्री. बा. द. सातोस्कर) (नंतर तीनशे वर्षांनी शिवाजी महाराजांनी १३ नोव्हेंबर १६६८ रोजी मंदिराचा जीर्णोद्धार करून भव्य मंदिर उभारण्यासाठी कोनशीला बसविली.) अशा तऱ्हेने १४ व्या शतकाच्या उत्तरार्धात हा प्रदेश निर्वयन झाल्यावर व सर्व स्थिरस्थावर झाल्यावर श्री देव नारायणाच्या मूर्तीची स्थापना वालावल गांवी करण्यात आली असावी.
इ.स. १४६९-७३ च्या दरम्यान कुडाळ प्रांतावर “ताब्रांची स्वारी” म्हणून प्रसिद्ध असलेली बिदरच्या बहामनी सुलतानाचा सरदार वजीर महंमद गवान याने स्वारी केली. माधवाचार्यांच्या इ.स. १३४५ च्या स्वारीपासून कुडाळ प्रांताची सर्व व्यवस्था होडावडेकर दळवी-सावंतांकडे होती. महंमद गावानाने इ.स. १४७३ मध्ये प्रभू यांच्या सहाय्याने होडावडेकर दळवी सावंतांना दूर करून कुडाळ प्रांत बहामनी सुलतानाच्या अंमलाखाली आणला. महंमद गवान याने कुडाळ प्रांत जिंकल्यावर परत जाताना कुडाळ प्रांताची व्यवस्था आपल्या कोकण स्वारींत मदत करणाऱ्या गोमजी प्रभू यांच्याकडे सोपविली.
पंधराव्या शतकाच्या अखेरीस कोंकण प्रांत बहामनी अंमलापासून विजापूरचा बादशहा युसूफ याच्या ताब्यात गेला व आदिलशाही सत्ता सुरु झाली.
या आदिलशहाने १६ व्या शतकामध्ये रेडी खाडीच्या मुखाशी बळकट असा एक किल्ला बांधला. तोच आज पडक्या स्थितीत असलेला यशवंत गड. इ.स. १६५२ मध्ये शिवाजी महाराजांनी तो जिंकल्यावर त्याला यशवंत गड हे नांव दिले ..-
देवालयाची बांधणी वास्तुशास्त्रोक्त व टुमदार आहे. यास्तव मधून मधून स्थापत्यशास्त्र महाविद्यालयांचे विद्यार्थी या मंदिराच्या स्थापत्यकलेचा अभ्यास करण्याकरिता येतात. हल्लीच (इ.स. २०१० मध्ये) रहेजा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे विद्यार्थी स्टडी टूरसाठी येथे चार दिवस मुक्काम करून होते. त्यांच्या सोबत आलेले त्यांचे प्राचार्य श्री. खानोलकर म्हणाले की देवालयाच्या गाभाऱ्याबाहेरील शिल्पकला व देवळाचे बांधकाम हे पायाभूत स्थापत्यशास्त्राच्या कल्पनेशी जवळीक दाखवते. रामनवमीला येथे नऊ दिवस यात्रा असते. वालावल गावची कोणतीही व्यक्ती पंढरपूरची वारी करत नाही, असा गावचा रिवाज आहे.
श्री देव नारायणाच्या मूर्तीस प्रसिद्ध विद्वान भय्यादाजी शास्त्री ‘अनिरुध्दाची मूर्ती' म्हणतात.
या अगोदरही दुसऱ्या एका महाविद्यालयाची स्टडी टूर आली होती. या देवालयाचे बांधकाम एकाच वेळेस झालेले नसून, क्षेत्र महात्म्य वाढीबरोबर निरनिराळ्या शतकांत भक्तजनांकडून एक एक सुधारणा होत जाऊन त्याला सध्याचे स्वरूप आलेले आहे.
शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना- मुख्य देवालयाची बांधणी चालुक्य पद्धतीची असल्याचे म्हटले जाते. बांधकाम जांभेथर दगडाचे व आंतील खांब व गाभाऱ्याचा दरवाजा काळीथर दगडाचा आहे. त्यावर सुंदर कोरीवकाम आहे. गाभाऱ्याच्या महाद्वारावरील व त्यापुढील चौकांतील सहा पाषाणी स्तंभावरील कोरीव काम शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. महाद्वाराच्या दोन बाजूला दोन द्वारपाल असून मध्ये वरच्या बाजूस शेषशायी विष्णूची मूर्ती कोरलेली आहे. द्वारपालांच्या वरच्या बाजूलाही देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.
महाद्वाराला लागून खाली डावीकडे विनम्र गरुडाची तर उजवीकडे मारुतीची मूर्ती कोरलेली आहे. खांबांची उंची सुमारे ६|| फूट असून खांबास वापरलेला पाषाण काळाकभिन्न व गुळगुळीत आहे. प्रत्येक खांबाच्या मध्यावर एक वीत उंचीच्या वेगवेगळ्या देवदेविकांच्या सुंदर मूर्ती वर्तुळाकार कोरलेल्या आहेत. प्रत्येक खांबावरच्या मूर्तीच्या वरची व खालची वेलबुट्टीसारखी नक्षी सुंदर व वेगवेगळ्या प्रकारची आहे.
चौकाचा कडीपाटाचा छत, पाटावर कोरलेल्या पौराणिक देवदेवतांच्या मूर्तीनी भरलेला आहे. या मूर्तींविषयी कै. विश्वनाथ रेडेशास्त्री त्यांच्या “श्रीमन्नारायण चरित्रात” म्हणतात– “चौकातील छताच्या दिग्पतिंना वा दशावतारांस || काष्ठविनिर्मित देखुनि आश्चर्य गमेल सान थोरांस ||”
या शिवाय श्री गणेश, महिषासूरमर्दिनी, भस्मासूर मोहिनी, श्रीशंकर यांच्या मुर्तीपण आहेत. श्री. गणेश विष्णू पुजारे (मामा पुजारे) यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन मेषाची तोंडे असलेला अग्निदेव, माणसावर बसलेला नैऋत्ती, बदक वाहन असलेला विश्वकर्मा, हरण वाहन असलेला सोम या लाकडी मूर्ती शंभर दिडशे वर्षापेक्षा जास्त पुरातन आहेत. चौकापुढील मुखशाळेचे काम काळीथर दगडाचे आहे.
मुखशाळेचे छत हे शके १८०६ (इ.स. १८८४) मध्ये पुनर्बांधित झाले असावे असे एका दक्षिणोत्तर आडव्या मोठया तुळईवर “शके १८०६ नारायण मुखशाळा” अशा कोरलेल्या अस्पष्ट अक्षरावरून वाटते. यापुढे कोरलेली अक्षरे तुळईवरील रंगकामामुळे वाचता येत नाहीत.
मुखशाळेपुढे नव्या जुन्या पद्धतीच्या मिश्रणाने बांधलेला अर्वाचीन सभामंडप व सभामंडपाच्या पुढे काळीथर दगडाची पाच खांबी दीपमाळ आहे. दीपमाळेच्या बांधकामाची पद्धत मराठेशाहीतील असल्याचे म्हटले जाते. या दीपमाळेच्या चौथऱ्यावर कल्याण पुरुषाची घुमटी आणि वृंदावन आहे. घुमटीत श्रीकडे तोंड करून बद्धांजली वीरासन घालून बसलेली विनम्र श्री कल्याण पुरुषाची व हातांत चवरी घेऊन उभी असलेली अशी त्यांच्या परिचारकाची अशा दोन मूर्ती आहेत. वृंदावनाच्या दर्शनी दासमारुतीची मूर्ती कोरलेली आहे.
कल्याण पुरुषाची घुमटी श्रींचा सभामंडप बांधण्यापूर्वी सभामंडपाच्या ईशान्य कोपऱ्यातील आता असलेल्या मोठया खांबाच्या बाजूच्या जागेत होती. ही जागा सभामंडपात घेतल्यामुळे समाधीवरील कल्याण पुरुषाची आणि त्याच्या परिचारकाची मूर्ती दीपमाळेच्या चौथऱ्यावर घुमटी बांधून त्या ठिकाणी ठेवण्यात आल्यामुळे, समाधीच्या जागी कोणी बसू नये म्हणून एक लाकडी खुंट उभा करण्यात आला होता. या लाकडी खुंटाबद्दल श्री. गुं. फ. आजगांवकर यांनी आपल्या “वालावल दर्शन” या पुस्तकात “श्री नारायण देवालय बांधण्यापूर्वी हल्लीच्या कोनशिला समारंभाप्रमाणे उभारलेला तो आद्यस्तंभ आहे. अशा प्रकारचा स्तंभ उभारण्याची पद्धत विजयनगर स्थापन होण्यापूर्वीपासून रूढ होती.” असे म्हटले आहे. आता हा खुंटही अस्थित्वात नाही. परंतु तेथील बाळंद्यावर विश्वाकर्माची प्रतीकात्मक मूर्ती स्थापून कोणी बसू नये अशा सूचना लिहून ठेवण्यांत आल्या आहेत.
कल्याण पुरुषाच्या घुमटीवर श्रींच्या पादुका कोरलेल्या आहेत. कल्याण पुरुषाने समाधी घेताना आपली नजर सतत श्रींच्या चरणाकडे असावी व श्रींच्या पादुकांवरील पाणी आपल्या मस्तकावर पडावे असे मागणे केले होते असे म्हणतात. श्रींनी आपल्या प्रिय भक्ताची ही इच्छा पूर्ण केली आहे.
देवासमोर पितळेचा मोठा कासव मुखशाळेत बसविलेला आहे. त्यावर सन १८८९ असे (शके १८११) लिहिलेले असून स्थापत्यकर्त्याचे नाव भानु बापू हळदणकर असे आहे.
देवालयाच्या सभोवार तट आहे. तटाच्या आतील देवस्थानाच्या पवित्र जागेला “जगत्” म्हणतात. या जगताला तीन दरवाजे असून वर नगारखाने बनविलेले आहेत. या नगारखाण्यापैकी दोघांचे नुतनीकरण झाले असून तिसऱ्याचे बांधकाम अर्धवट आहे. तटाच्या आतल्या बाजूस भक्तजनांना राहण्यासाठी “पडशाळा” किंवा धर्मशाळा बांधलेल्या आहेत. श्री नारायण मंदिराच्या उजवीकडे एक जुने देवचाफ्याचे झाड व जुनी धर्मशाळा होती त्या धर्मशाळेच्या मागे औदुंबर व त्याखाली काही योगी पुरुषांच्या समाध्या होत्या. धर्मशाळेच्या जागी देव पावणेराची वास्तू आता पुनः उभी राहिली आहे.
नैऋत्येच्या बाजूने जगताला लागून विस्तीर्ण नयनरम्य तलाव आहे. तो तलाव दरीला बांध घालून तयार केलेला आहे. तलावांतील पाण्याचा उपयोग शेतीसाठी, पिण्यासाठी व श्रीदेव नारायणाच्या पूजा-अभिषेकासाठी करतात. या तलावाचे पाणी कधीही खराब होत नाही असा लौकिक आहे. काही वर्षापूर्वी तलावाच्या वेगवेगळ्या भागांतून पाण्याचे नमुने घेऊन तपासले असता ते आरोग्यास हानीकारक नसल्याचे आढळून आल्याचे कळते. श्रीदेव नारायणाची सेवा व या तलावाचे पाणी तीर्थ म्हणून सेवन करून पूर्वी क्षयरोगीही बरे झाल्याचे सांगतात. ह्या पाण्यास तीर्थाप्रमाणे मान असल्यामुळे या तलावाचे पावित्र्य राखणे सर्व ग्रामस्थ व भाविक यांचे कर्तव्य आहे, हे वेगवेगळे सांगणे न लागे.
जवळजवळ ६० वर्षापूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळातील गोष्ट. एप्रिल-मे महिन्याच्या सुमारास तलावाच्या बांधांतील मधला दरवाजा (मूस) उघडून तलाव पूर्णतः कोरडा करण्यात येई व तलावातील जमीन भुईभाडयाने भातपेरणीसाठी (पुनर्रोपण पद्धतीमधील रोपांसाठी) दिली जाई. तलाव आटला की आजूबाजूच्या विहिरी पण कोरडया होत. लोकांचे पाण्याचे हाल तर व्हावयाचेच पण श्री नारायणाच्या पूजा-अर्चेलाही पाणी मिळणे कठीण होत असे. लागोपाठ काही वर्षे असे झाले आणि एका वर्षी दीड-दोन वीत वाढलेल्या रोपावर प्रचंड प्रमाणात घनदाट अशी कीड पडली. रोपाखालील क्षेत्रापलिकडे अर्ध्या-पाव किलोमीटर (फर्लांगभर) पर्यंत ही कीड दिसत होती. तलाव पुनः कोरडा करून जमीन भुईभाडयाने देण्याचे धैर्यच कुणाला झाले नाही.
गेले काही वर्षे एक नवीन प्रथा सुरु झाली आहे. पावसाळयाच्या सुरवातीस मत्स्यबीज तलावात सोडतात आणि उन्हाळ्यात मोठी जाळी घालून मासे पकडतात. त्यामुळे पाणी गढूळ तर होतेच पण पाण्याला माशांचा वास येवू लागतो. ही प्रथा बंद होणे आवश्यक आहे कारण ह्या तलावाला नारायणतीर्थ म्हटले जाते. देवाच्या अभिषेकासाठी हे पाणी वापरतात.
या तलावाबाबत शंभर वर्षापूर्वीची स्थिती विश्वनाथ रेडेशास्त्री यांच्या पुस्तकात दिली आहे ती अशी-
स्फटिक-सम तळ्याचे देखुनी शुद्ध पाणी |
हरिखुनि मज वाटे तेथे ये चक्रपाणी ||दक्षिण दिग्भागी श्रीनारायण तीर्थ नामक तलाव
सिन लोहित पद्माही शोभे, यज्जल म्हणे तृषित, ‘लाव’.
तलावाच्या काठी शिवलींग व श्रीराम मूर्तीची स्थापना केलेली आहे. ज्यांना दक्षिण रामेश्वराचे दर्शन घेणे शक्य नाही, त्यांनी ते या ठिकाणी घ्यावे अशी श्रद्धा आहे. या शिवलिंगाच्या वरच्या बाजूला संध्यामठ (संन्यमठ) म्हणून एक खोली होती. त्या ठिकाणी काही ब्रम्हवृंद संध्या करीत तर साधू-संन्याशी शांत वेळेस ध्यानधारणा करीत. आता त्या जागी बांधलेली नवीन जागा देवस्थानाच्या कार्यालयाचा भाग आहे.
कल्याण पुरुषाने बांधलेले देवालय म्हणजे मुखशाळेच्या मागील भाग. त्यानंतर विस्तार आणि सुधारणा चालूच आहे. मुखशाळेसहित तलावादी रचना श्रीमंत पेशवे यांच्या मदतीने झाली आणि कै. वे. शा. सं. नारायण भटजी इनामदार पित्रे यांनी हे काम करून घेतले. यासाठी इ.स. १७६० च्या सुमारास श्रीमंत पेशवे यांनी सात हजार रुपये वाडी दरबाराकडे पाठवून हे काम करून घेतले.
श्रीमंत पेशवे यांनी केलेल्या बांधकामानंतर काही वर्षांनी एका जहाजावरील मोठी घंटा कोणीतरी मुखशाळेत आणून लावली. या घंटेवर ती कोणी, कधी व कोणत्या जहाजासाठी बनविली याबद्दल फ्रेंच भाषेत लिहिलेल्या दोन ओळी होत्या त्या अशा – “La Frigate le Franklin Fait Par Jean Bazin Anantis 1778” शिवाय तिच्यावर येशू ख्रिस्ताचे कृसी फिकशन् व तीन बॅजीस होते. या घंटेबद्दल किंवा ती ज्या जहाजावर होती याबद्दलचा अधिक इतिहास उपलब्ध नाही. नोव्हेंबर २००२ मध्ये या घंटेला तडा गेला व ती निकामी झाली. तिचेच साहित्य वापरून आता तेवढीच नवीन घंटा करून बसविण्यात आली आहे.
श्रींच्या भक्तांच्या उदार देणग्यांमुळे देवालयातील आवारातील इमारतींचा जीर्णोद्धार, सुधारणा व नवीन बांधकामे होतच असतात. मंदिरामागील जीर्ण होऊन पडायला आलेल्या दोन धर्मशाळांची पुनर्बांधणी हल्लीच झाली.
मंदिराच्या उत्तर तटाला लागून आतल्या बाजूस पूर्वी एक धर्मशाळा होती. आता ती अस्थित्वात नाही.
श्री देव नारायणाच्या पूर्वेला तटाबाहेर ग्रामदेवता रवळनाथाचे प्राचीन देवालय आहे. दोन्ही मंदिराच्या मधे एक पिंपळाचा पार असून त्यावर मारुतीची घुमटी आहे. काही वर्षापूर्वी पिंपळाचे झाड पडले. आता तेथे औदुंबराचे झाड वाढले आहे. या मारुतीच्या घुमटीजवळच ब्राम्हणाची (भारद्वाजगोत्री कशाळीकरांचा मूळ पुरुष) समाधी असल्याचे सांगतात. आता तेथे भारद्वाजगोत्री कशाळीकर मंडळातर्फे जीर्णोद्धार करण्यात आला आहे.
कै. अ. ब. वालावलकर यांच्या “मठ गावाचा शिलालेख आणि कुडाळ प्रांताचा प्राचीन इतिहास” पुस्तकात छापलेला मंदिर व त्याच्या परिसराचा नकाशा माहितीसाठी पुढे दिला आहे. हा नकाशा ७०-८० वर्षापूर्वी श्री नारायण मंदिराच्या आतील व बाहेरील परिसर कसा होता याची चांगली कल्पना देतो. आता या परिस्थितीत थोडाफार बदल झाला आहे.
- श्री. वामन शांताराम वालावलकर संकलित श्री क्षेत्र वालावल या ग्रंथातून