गंगासागर
गंगासागर ....
भारतमध्ये प्रत्येक सण, उत्सव श्रद्धा आणि आस्थेने साजरा केला जातो. मकरसंक्रांती या सणाचे भारतात विशेष महत्व आहे. मकरसंक्रांती संदर्भात गोस्वामी तुलसीदास यांनी रामचरितमानसमध्ये लिहून ठेवले आहे की...
माघ मकरगत रबि जब होई। तीरथपतिहिं आव सब कोई।। (रा.च.मा. 1/44/3)
असे म्हटले जाते की गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर प्रयागमध्ये मकरसंक्रांतीच्या दिवशी सर्व देवी-देवता स्वतःचे स्वरूप बदलून स्नान करण्यासाठी येतात. यामुळे त्याठिकाणी मकरसंक्रांतीच्या दिवशी स्नान करणे पुण्यदायी मानले जाते.
भारतामध्ये मकरसंक्रांती सणाचा सर्वात प्रसिद्ध मेळा बंगाल येथील गंगासागर येथे लागतो. गंगासागर मेळ्याच्या प्रथेमागे एक पौराणिक कथा आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी गंगा स्वतः स्वर्गातून खाली उतरून भगीरथाच्या मागेमागे चालत कपिलमुनी यांच्या आश्रमात जाऊन सागराला मिळाली होती. गंगेच्या पावन जलामुळे राजा सगरच्या साठ हजार श्रापित पुत्रांचा उद्धार झाला होता.
गंगा जिथे बंगालच्या उपसागराला मिळते ते संगमाचे ठिकाण, जे गंगासागर नावाने एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. आणि हुगळी, म्हणजेच गंगा नदी. गंगेच्या मुर्शिदाबादपासून निघालेल्या प्रवाहाला पश्चिम बंगाल मधे हुगळी या नावाने संबोधले जाते. पश्चिम बंगालच्या दक्षिणेस हे पवित्र संगमाचे ठिकाण आहे, जिथे लाखो भाविक आणि पर्यटक दरवर्षी मोठ्या श्रद्धेने आणि कुतूहलाने जातात.
गंगेचा प्रवाह जिथे बंगालच्या उपसागरास मिळतो त्या ठिकाणाला धार्मिक महत्व आहे. गंगा सागराचा हा संगम "पवित्र संगम" म्हणून प्रसिद्ध पावला आहे. बंगाली पौष महिन्यातला हा शेवटचा दिवस, म्हणजेच मकर संक्रांत, या दिवशी सूर्य मकरवृत्तातून भ्रमण करतो म्हणून त्या दिवसाला विशेष महत्व आहे. त्या दिवशी देशभरातून, शेजारी देशातून साधू-संत, तपस्वी, धार्मिक गुरु, श्रद्धाळू लोक आणि पर्यटक असे सगळेच इथे गर्दी करतात. संगमाच्या ठिकाणाला अगदी मेळ्याचे स्वरूप प्राप्त होते.
पुराणकथेनुसार, कपिलमुनी हा विष्णूचाच एक अवतार आहे. कर्दममुनींच्या इच्छेनुसार विष्णूने त्यांच्या पोटी जन्म घेतला. असे सांगितले जाते की विष्णूने कर्दम मुनिना सांसारिक आयुष्याचा मार्ग अवलंबण्यास सांगितले, त्यावेळी त्यांनी विष्णूला हि अट घातली, जी विष्णूने मान्य केली. अधिरथाने गंगा धरतीवर आणली ती इथेच गंगासागर संगमाच्या ठिकाणी. त्याची पण एक अख्यायिका सांगितली जाते. सत्य युगात 'सागर' नावाचा राजा होता. अयोध्येच्या या राजाने अश्वमेध यज्ञाचा घाट घातला होता. त्याचा यज्ञाचा अश्व, देवाधिदेव इंद्राने, कपिल मुनींच्या आश्रमा जवळच पाताळात लपवून ठेवला होता. राजाचे ६०,००० पुत्र अश्वाच्या शोधात आश्रमापर्यंत येऊन पोहोचले, त्यांना घोडा सापडला. घोडा कपिलमुनींनी लपवला या धारणेने त्यांनी तिथे उच्छाद मांडला, ज्यामुळे कपिलमुनींच्या तपश्चर्येत / ध्यान साधनेत व्यत्यय आला. क्रोधीत झालेल्या मुनींनी ध्यानातून बाहेर येत राजपुत्रांवर आपली नजर टाकताच, सर्व ६०,००० राजपुत्रांची जागेवरच राख झाली आणि कपिलमुनींच्या शापवाणीनुसार त्यांना नरकात स्थान मिळाले. सागर राजाला जेंव्हा हि हकीकत समजली तेंव्हा त्याने कपिलमुनिंचे मन वळवण्याचा बराच प्रयत्न केला. शेवटी राजाच्या तिसऱ्या पिढीला यात यश आले. राजाचा नातू, भगीरथाने, कपिलमुनींच्या आज्ञेनुसार विष्णूपत्नीस 'गंगेच्या' रुपात धरतीवर आणले आणि तिच्या पावन स्पर्शाने राजपुत्र शापमुक्त झाले. तो दिवस होता मकर संक्रांत. तर असे हे संक्रांतीचे महात्म्य. भगीरथाने शंकराच्या मदतीने गंगा धरतीवर आणली.
फोटो -: गंगासागर येथील श्री कपालमुनी यांचे मंदिर ....