महाराज कोण होते, कोठून आले
महाराज कोण होते, कोठून आले, ब्राह्मण होते (कारण ते उत्तम प्रकारे वेदपठण करित, तसेच वेदश्रवणदेखिल त्यांना फार आवडे) किंवा नव्हते ह्या गोष्टींवर बराच वाद चालतो. माघ वद्य ७ शके १८०० , २३ फेब्रुवारी १८७८ या दिवशी ऐन तारुण्यात ते शेगाव जि. बुलढाणा येथे दिगंबरावस्थेत दृष्टीस पडले. त्या वेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते.
ह्या संदर्भात दासगणूंनी लिहिले आहे,
"कोण हा कोठीचा काहीच कळेना |
ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे |
साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ति |
आलीसे प्रचिती बहुतांना ||"
जसा कुशल जवाहिर कोळशाच्या तुकड्यांमधून अनमोल हिरा शोधून काढतो त्याप्रमाणे बंकटलाल आगरवाल ह्याने त्यांचे महत्व ओळखले. त्याला महाराजांचे प्रथम दर्शन झाले ते असे,
"दंड गर्दन पिळदार| भव्य छाती दृषि स्थिर| भृकुटी ठायी झाली असे||"
जेव्हा बंकटलालाने त्यांना जेवणाविषयी विचारले त्यावेळी महाराजांनी नुसतेच शून्य दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले. कारण महाराज त्यावेळी तुर्या (जागृति म्हणजे जागे असणे, सुषुप्ति म्हणजे झोपणे आणि स्वप्नावस्था ह्या तीन अवस्थांच्या पलिकडील स्थितिस तुर्या अवस्था अथवा व्रह्मस्थिति अथवा सहजसमाधि असे म्हणतात) अवस्थेत होते. तत्काळ महाराज एक महान आणि असामान्य असे योगी आहेत ह्याची मनोमन खात्री पटली. महान भक्ताने त्यांचे श्रेष्ठत्व ओळखून त्यांना स्वगृही आणले. जेथे संतांचा वास तेथेच भगवंताचा निवास. ह्या उक्तिप्रमाणे,
"बंकटलालाचे घर| झाले असे पंढरपूर|
लांबलांबूनीया दर्शनास येती| लोक ते पावती समाधान||"
बंकटलालाचे घर भक्तांनी दुमदुमून् गेले. सद्गुरू अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे गजानन महाराजांचे सद्गुरू होते. त्यांच्याच मार्गदर्शनानुसार महाराजांनी नाशिकजवळील कपिलधारा तीर्थाजवळील घनघोर जंगलात बारा वर्षे कठोर तपश्चर्या केली व परमोच्च स्थितिस प्राप्त झाले. त्यावर असे सांगितले जाते की स्वामी समर्थांनी त्यांना नाशिकच्या देव मामलेदार (हे देखिल स्वामी समर्थांच्या श्रेष्ठ शिष्यांपैकी एक होते) ह्यांच्याकडे पाठविले. त्यांच्याकडे काही काळ राहून महाराज जगदोध्दाराकरिता शेगावला आले आणि भक्तांच्या प्रेमाग्रहाखातर तेथेच विसावले.
शेगांव येथे प्रकट होण्यापूर्वी महाराज अक्कलकोट येथे स्वामी समर्थांकडे काही दिवस मुक्कामास होते. स्वामीसमर्थांनी तारुण्यावस्थेतील गजानन महाराजांना आध्यात्मिक कार्याची दिशा दाखविण्यासाठी सटाणा येथील थोर सत्पुरूष श्रीदेव मामलेदार यांच्याकडे पाठवले. देव मामलेदारांनी महाराजांची अध्यात्मविषयक जाणीव समृद्ध केली आणि पुढील कार्याची दिशा व स्वरूप स्पष्ट करून सांगितले . त्यांच्याच सूचनेनुसार पुढे आपले कार्यक्षेत्र शेगांव येथे निश्चित केले.
"गण गण गणात बोते," हा त्यांचा आवडता मंत्र, ज्याचा ते अखंड जप करित. किंबहुना, त्यामुळेच त्यांना 'गिणगिणे बुवा' 'गजानन महाराज' अशी नावे पडली. वर्हाडातील भक्त त्यांना प्रेमाने 'गजानन बाबा' म्हणतात. दासगणूंनी ह्या संदर्भात लिहिले आहे,
"मना समजे नित्य|जीव हा ब्रह्मास सत्य|
मानू नको तयाप्रत|निराळा त्या तोची असे||"
ह्या मंत्राचा अर्थ असा आहे की जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत आणि त्यांना निराळे समजू नये.
शरीरयष्टी
सहा फुटी सडसडीत शरीरयष्टी , रापलेला तांबूस वर्ण , तुरळक दाढी व केस , वस्त्रविहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोचणारे हात यातून साकारते ती श्रीगजानन महाराजांची देहचर्या . लांब लांब पावले टाकीत सदानकदा घाईघाईत धावल्याप्रमाणे भासणारी चालगती , पाय अनवाणी आणि हाती असलीच तर एखादी चिलीम व त्यास छापी (कपडा) गुंडाळलेली .
अन्न सेवन
महाराजांची अशी मूर्ती लगबगीने एखाद्याच्या घरात घुसत असे किंवा अंगणात ओसरीवर मुक्काम ठोकीत असे. मग घरधन्याने भाकरतुकडा दिला तर खावे अन्यथा तो तसाच ठेवून पुढील मुक्कामी पळावे, अशी बालसुलभ वृत्ती .
महाराजांना झुणका भाकरीसोबतच मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठीसाखर अतिशय आवडत असे. कधी कधी अमर्यादपणे चित्रविचित्र खावे तर कधी तीन-चार दिवस उपाशी राहावे. भक्तांकडून येणारे पंचपक्वान्नाचे ताट असो वा कुणी कुत्सितपणे दिलेला वाटलेल्या मिरच्यांचा गोळा असो , प्रसन्नभावाने त्याचेही सेवन करावे. गरीबाघरी जे अन्न सहजपणे उपलब्ध होऊ शकेल अशाच प्रकारचे अन्न म्हणजे ज्वारीची भाकरी, अंबाड्याची भाजी, पिठलं असे पदार्थ महाराज आवडीने खात. म्हणूनच आजही महाराजांच्या भंडार्यासाठी इतर पक्वांनांव्यतिरिक्त ज्वारीची भाकरी, पिठलं आणि अंबाड्याची भाजी अवश्य करितात. कुठेही बेधडकपणे घुसून पाणी प्यावे , नाहीतर ओहोळातच ओंजळी ओंजळीने पाणी पिऊन तहान शमवावी .
मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठीसाखर हे पदार्थ कोणी आणून दिले की ते लहान बालकाप्रमाणे हरखून जात. मग या पदार्थांचे ढीग रचणे वा त्यांचे लहान लहान वाटे करणे यासारख्या बाललीलांमध्ये गुंग होऊन जात. महाराजांना चहाविषयी विलक्षण प्रेम होते. चांदीच्या मोठ्या वाडग्यातून मिळणारा गरमागरम चहा पाहून ते खुलत असत.
भक्त गण
हरी पाटील, बंकटलाल आगरवाल, पितांबर, बाळाभाऊ प्रभू, बापुना काळे, भाऊसाहेब कवर, पुंडलिक भोकरे, बायजाबाई, भास्कर पाटील हे महाराजांचे काही श्रेष्ठ भक्त होते. तेथून ते वेगाने निघून गेल्याने, बंकटलालाचे मन गुरुमहाराजांच्या भेटीकरिता तळमळू लागल्याने महाराज त्याला पुन्हा शिवमंदिराजवळ भेटले.
* श्रीधर गोविंद काळे - श्रीधर गोविंद काळे हे इंग्लिश शाळेत शिक्षण घ्यायला गेले पण मॅट्रिक नंतर इंटर नापास झाल्याने वर्तमानपत्रे वाचीत वेळ घालवित असताना त्यांनी टोगो आणि यामा ह्या जपानी व्यक्तिंच्या जीवनचरित्राविषयी वाचले आणि आपणही मायदेश सोडून विलायतेला जाऊन नाव आणि पैसा कमवावा असे त्यांना वाटू लागले. परंतु पैशाची व्यवस्था होईना त्यामुळे ते निराश झाले.
कोल्हापूरला जाताना वाटेवर शेगावला थांबून ते महाराजांना भेटायला गेले. सर्वज्ञ असलेल्या महाराजांनी त्यांचे मनोगत जाणले आणि परदेशी जाण्यापासून त्यांना परावृत्त केले. सरतेशेवटी महाराज त्याला म्हणाले, "कोठे न आता जाईयेई|." त्यानंतर महाराजांच्या कृपेने त्याची उत्तम भौतिक प्रगति झाली. त्याचवेळी महाराजांनी त्यांना बहूमोल उपदेश दिला की अतिशय पुण्य केल्याखेरीज भारतात जन्म होत नाही आणि योगापेक्षा अध्यात्मविचार श्रेष्ठ आहे. महाराजांच्या आशिर्वादाने ते बी.ए.एम्.ए. झाले आणि त्यांना शिंद्यांच्या राज्यातील शिवपुरी कॉलेजमध्ये प्रिन्सिपालच्या जागी नेमले.
* त्र्यंबक उर्फ भाऊ कवर - त्र्यंबकला घरी भाऊ असे प्रेमाने म्हणत असत, परंतु ही गोष्ट फक्त जवळच्या माणसांव्यतिरिक्त अन्य कोणालाही माहिती नव्ह्ती. जेव्हा महाराजांची कीर्ति सर्वदूर पसरली, कवरला त्यांना भेटण्याची तीव्र तळमळ लागली. त्याप्रमाणे त्याने तीनवेळा शेगावला भेटी दिल्या परंतु तिन्ही भेटींमध्ये सदगुरुमहाराजांनी त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले; कवर मनोमनी दु:खी झाला.
अखेरची एक भेट घ्यावी म्हणून कवर शेगावला गेला आणि भक्तांच्या गर्दीत जाऊन बसला. थोड्या वेळात महाराज सरळ त्याच्याकडेच आले आणि म्हणाले, "काय भाऊ, एकटाच चिकण सुपारी खातोस होय? तुझ्या खिशातली सुपारी दे बरं मला थोडी!" कवराला आश्चर्याचा धक्काच बसला. ह्यांना माझे नाव कसे कळले, ह्यांना कसे कळले की माझ्या खिशात चिकण सुपारी आहे? ह्या घटनेतूनच भाऊ कवराला महाराजांच्या दिव्यत्वाची प्रचिती आली आणि त्याची महाराजांवर असीम श्रध्दा जडली. त्या क्षणापासून भाऊ कवर त्यांच्या श्रेष्ठ भक्तांपैकी एक झाला.
तो त्यावेळी हैदराबादमध्ये डॉक्टरी शिकत होता. सुटीमध्ये घरी आला असता त्याला वाटले की महाराजांचे आवडीचे पदार्थ करुन घेऊन त्यांना जेवण नेऊन द्यावे. त्याप्रमाणे त्याने भाकरी, आंबाड्याची भाजी, हिरव्या मिरच्या, कांदे, लोणी असे पदार्थ बरोबर घेतले; पण तो स्टेशनवर येण्याअगोदर गाडी निघून गेली. कवराला अतोनात दु:ख झाले, गुरुमहाराज जेऊन घेतील आणि आपण आणलेली शिदोरी वाया जाईल या विचाराने तो व्यथित होऊन स्टेशनवर तसाच बसून राहिला. परंतु भक्तवत्सल महाराज त्या दिवशी आलेले सर्व नैवेद्य बाजूला सारून तसेच उपाशी बसले होते. शेवटी जेव्हा कवर चार वाजता शेगावच्या मठात आला, तेव्हा महाराज म्हणाले,
"तुझ्या भाकेत गुंतलो | मी उपाशी राहिलो | आण तुझी शिदोरी||"
त्यावेळी कवराला काय वाटले असेल ह्याची कल्पना एक भक्तच करु शकेल. इतर भक्त म्हणाले,
"भाकरीवर गुंतले चित्त कवराच्या स्वामींचे"
* बापुना काळे - बापुना काळे हे पाटलांच्याकडे हिशेबनीस म्हणून काम बघत होते कारण ते आकडेमोड आणि तोंडी हिशोबात तरबेज होते. त्यांनी उपनिषदांचा अभ्यासही केलेला होता. जेव्हा महाराज बापुना काळे आणि अन्य भक्तांसोबत आषाढी एकादशीला पंढरीला गेले तेव्हा स्नानाला गेलेल्या बापुनाला दर्शनाला जायला उशिर झाल्याकारणाने सबंध दिवसभर दर्शन मिळू शकले नाही. बापुनाचे विठ्ठलाकडे लागलेले मन, इतर भक्तांनी त्याची केलेली चेष्टा हे सर्व पहात असलेल्या महाराजांनी त्याला विठ्ठलाचे दर्शन करविले. बापुना खरोखर धन्य झाला. दासगणू म्हणतात,
"संत आणि भगवंत | एकरुप साक्षात |
गुळाच्या त्या गोडीप्रत | कैसे करावे निराळे?||"
ह्या विठ्ठलदर्शनावे फळ म्हणूनच की काय बापुनाला एक मुलगा झाला, ज्याचे त्याने नामदेव असे नामकरण केले. पुढे हा मुलगा प्रख्यात किर्तनकार बनला. बापुना दररोज न चुकता एक शेर धान्य दान करित. अशा ह्या महाराजांच्या थोर भक्ताने १९६४ला देह सोडला. मरणाच्या दारात असलेल्या कवठे बहादुरच्या वारकर्याला मरीच्या रोगापासून वाचविले. सोवळे ओवळे पाळणे, घडाघडा मंत्र म्हणून बराच वेळ देवपूजा करणे (एकंदरीत सांप्रदायिक कर्मकांडे करणे) म्हणजेच देवभक्ति करणे असे समजणार्या एका कर्मठ ब्राह्मणाचा, एक प्रहरापूर्वी मेलेल्या कुत्र्याला केवळ स्वतःच्या पदस्पर्शाने त्याच्या समोर जीवंत करुन, त्याचा कर्माभिमान गलीत केला. दासगणू म्हणतात,
"समर्थ साक्षात भगवंत | ऐसी प्रचिती आली तया ||"
* श्रीमंत गोपाळराव बुटी - श्रीमंत गोपाळराव बुटी हे नागपुरचा कुबेर म्हणवून घेण्याइतपत धनवंत होते; तेही महाराजांचे भक्त होते. नागपुरच्या सिताबर्डी ह्या भागात त्यांचा ५२ खोल्यांचा आलिशान आणि भव्य असा वाडा होता. त्यांच्या श्रीमंतीविषयीच्या अनेक कथा सांगितल्या जातात. ते सावकारी करीत त्यामुळे दरमहिन्याला त्यांना व्याज अथवा मुद्दलरुपात मिळणार्या धनाने भरलेल्या गोण्या लादलेल्या बैलगाड्यांची रांग त्यांच्या घरापासून कित्येक किलोमीटर दूरपर्यंत असे. अर्थात त्यांनी त्यांच्या पैशाचा संतसेवेकरिता योग्य असा विनियोग केला हेही तितकेच खरे आहे.
त्यांच्या आग्रहामुळे महाराज १९०८ला नागपुरच्या सीताबर्डी भागात त्याच्या आलीशान वाड्यात त्याच्या भावनांचा मान राखण्याकरिता गेले. महाराज त्याच्या वैभवाला भुलून मुळीच गेले नव्हते, ते तर अनेक भक्तांचा उध्दार करण्याकरिता तेथे गेले होते. महाराजांना तो महालात कोंडून ठेऊ शकला नाही; महाराज नागपुरात सर्वत्र हिंडून लोकोध्दार करित. शेवटी मनगटाच्या बळावर हरी पाटलांनी त्यांना परत शेगावी आणले.
* धार कल्याणचे रंगनाथ महाराज - धार कल्याणचे रंगनाथ महाराज त्यांना भेटायला आले, परंतु त्यांचे सांकेतिक भाषण समजण्यास कोणीच समर्थ नव्ह्ता. या संदर्भात दासगणूंनी लिहिले आहे,
धार कल्याणचा साधू रंगनाथ|
आला शेगावासी भेटावया|
उभयतांमाजी ब्रह्मचर्चा झाली|
ती ज्यांनी ऐकली तेच धन्य||"
"श्रीवासूदेवानंद सरस्वती |
जे प्रत्यक्ष दत्तमूर्ति |
ऐशा जगमान्य विभूति |
आल्या आपल्या दर्शना ||"
असे दासगणूंनी सार्थच म्हटले आहे. "तुम्हा दोघांचा मार्ग वेगळा असूनही तुम्ही दोघे भाऊ कसे?" ह्या बाळाभाऊच्या प्रश्नाला उत्तर देतानाच महाराजांनी 'ज्ञानाच्या गावी' जाण्याचे तीन मार्ग कोणते, त्या त्या मार्गांचे पालन कसे केले जाते आणि त्या मार्गाने जाऊन संतत्व प्राप्त केलेल्या आजवरच्या थोर विभूतिंची नावे इत्यादि गोष्टींवर सुंदर आणि रसाळ विवेचन केले. सरतेशेवटी महाराज म्हणाले,
"जो माझा असेल | त्याचेच काम होईल | इतरांची ना जरुर मला ||"
महाराजांचे म्हणणे आहे की व्यर्थ धार्मिक वादविवादात पडू नका, ते म्हणतात,
"कोणी काही म्हणोत | आपण असावे निवांत |
तरीच भेटे जगन्नाथ | जगदगुरु जगदात्मा ||"
* बायजा माळीण - मुंडगावच्या बायजा माळीणीचे लग्न एका नपुंसकाशी झाले होते, तिच्या थोरल्या दिराने तिला स्वतःच्या पापवासनेला बळी पाडायचे ठरविले. परंतु सच्छील बायजाबाई त्याच्या वासनेला बळी पडली नाहीच उलट तिने महाराजांना सदगुरु मानून अखंड भक्तित उर्वरित आयुष घालविले. मुंडगावचाच आणखी एक परमभक्त जो पुंडलिक भोकरे त्याच्यासोबत बायजा शेगावच्या वार्या करु लागली, तेव्हा समाजकंटकांनी तिच्या चारित्र्यावर शंका घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी तिच्यावर आलेले चारित्र्यहननाचा बालंट दूर् करून महाराजांनी तिला, 'जशी नामदेवाची जनी, तशीच माझी बायजा' असे सांगून तिच्या भक्तिचा आणि पावित्र्याचा गौरव केला.
तसेच महाराजांनी पुंडलिकाला सांगितले की बायजा ही त्याची पूर्वजन्मीची बहिण होती आणि त्याने तिला अंतर देऊ नये. महाराजांचे शब्द पुंडलिकाने अखेरपर्यंत पाळले. बायजाबाईच्या निर्वाणानंतर २८ वर्षांनी (म्हणजे १९६८ मध्ये) पुंडलिकाचे मुंबईत जरी निर्वाण झाले तरीदेखील त्याच्या शेवटच्या इच्छेनुसार त्याची समाधी मुंडगावी बायजाबाईच्या समाधीजवळच बांधली आहे. जिच्या आयुष्याचे महाराजांनी सोने केले त्या बायजाबाईने १९४० मध्ये पुण्यदिनी देह ठेविला. आज मोठ्या आदराने तिचा "सती बायजाबाई" असा उल्लेख करतात.
उपदेश
महाराजांनी कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे तीन मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करुन देतात असे व्यवस्थित सांगितले. त्यांनी गोविंदपंत टाकळीकर ह्या कीर्तनकारास उपदेश दिला की त्याने पोटभर्या कीर्तनकार होऊ नये.
अद्वैत आणि मंत्रदीक्षा
जेव्हा मुंडगावच्या भागीने भोळ्या पुंडलिकाला गजानन महाराजांनी त्याला कानमंत्र दिला नसल्याने ते योग्य सदगुरु नव्हेत असे सांगून् भ्रमित केले त्यावेळी गजानन महाराज त्याच्या स्वप्नात गेले आणि त्याला स्वतःच्या पादुका देऊन दुसर्या दिवशी पूजा करण्यास सांगितले. आश्चर्य हे की दुसर्या दिवशी महाराजांनी त्याला झ्यामसिंगाहस्ते पादुका पाठवून देऊन त्याला पथभ्रष्ट होऊ दिले नाही. महाराज हे अद्वैत सिध्दांतवादी असल्याने त्यांनी कोणालाही कधीच मंत्रदीक्षा दिल्याचा पुरावा नाही.
दांभिकतेचा तिरस्कार
महाराज हे ब्रह्मज्ञानी, महान योगी, भक्तवत्सल होते. परंतु दांभिकतेचा मात्र त्यांना खरोखरच फार तिरस्कार होता. विठोबा घाटोळ नावाच्या त्यांच्या सेवेकर्याने जेव्हा महाराजांच्या दर्शनाला आलेल्या भक्तांना घुमारे घालणे, अंगात आल्याचे नाटक करुन फसविणे असे प्रकार सुरु केले तेव्हा महाराजांनी त्याला एकदा धरुन काठीने चांगलेच बदडून काढले, जेणेकरुन त्याने मठ कायमचाच सोडून दिला. अखेर सदगुरुचे पाय लाभून देखील त्याच्या दुर्दैवाने दूर झाले.
लोकमान्य टिळकांना कैदेबद्दल भविष्यवाणी
लोकमान्य टिळकांनीही त्यांची भेट घेतली होती. अकोल्यात शिवजयंतीसंदर्भात झालेल्या एका सभेला, टिळकांबरोबर गजानन महाराजही व्यासपीठावर बसले होते. लोकमान्य आणि अमरावतीचे दादासाहेब खापर्ड्यांसमवेत ते अकोल्यातील प्रभू रामचंद्राच्या मंदिरात दर्शनालाही गेले होते. जेव्हा लोकमान्य टिळकांना कैद झाली त्यावेळी महाराजांनी कोल्हटकरांच्या हातून त्यांच्याकरिता भाकरीचा प्रसाद पाठविला आणि भविष्य वर्तवले की टिळकांना शिक्षा अटळ आहे तसेच त्यांना खूप दूरही जावे लागेल, परंतु ते तुरुंगात मोठी कामगिरी करणार आहेत. महाराजांच्या भविष्यवाणीनुसार ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात टिळकांनी 'गीतारहस्य' ही भगवदगीतेवर टीका लिहिली.
"गीतेचा अर्थ कर्मपर| लावी बाळ गंगाधर|
त्या टिळकांचा अधिकार| वानाया मी समर्थ नसे,"
अशा स्तुतिपर शब्दात दासगणूंनी टिळकांचा गौरव केला आहे.
विरक्ती
देवीदास पातुरकरांच्या अंगणात पक्वांनाचे ताट समोर आल्यावर महाराजांनी सर्व पदार्थ एकत्र करुन खाल्ले, आणि दाखवून दिले की ज्याने ब्रह्मरसाची माधुरी चाखली आहे त्याला पक्वांनाची काय चव? ह्याच ठिकाणी महाराजांनी सांगितले की शुध्द ब्रह्म हे निर्गुण असते आणि त्याच्यापासूनच हे जग निर्माण झालेले आहे.
भक्तांकडून साग्रसंगीत षोडशोपचारे पूजा करून घ्यावी तर कधी आंघोळीशिवाय कित्येक दिवस राहावे , तर कधी गळ्यात पडणारे हारही भिरकावून द्यावे अशी बालोन्मतपिशाच्च वृत्ती.
महाराज हे शुध्द ब्रह्म होते, एक परमहंस संन्यासी होते. ज्याला ब्रह्माचे पूर्णपणे ज्ञान झालेले आहे, जेथे जीव-शिवाचे मिलन झालेले आहे अशा जीवनमुक्तांना देहाचे भान राहात नाही असे असताना तो देह कपड्यात गुंडाळण्याकडे लक्ष तरी कुठे असणार? महाराज अशा पराकोटीचे जीवनमुक्त संत होते म्हणूनच ते बहुश: दिगंबर अवस्थेतच असत. नग्न राहतात अशा आरोपाखाली जेव्हा जठारसाहेबांनी त्यांना त्यांच्या दिगंबर अवस्थेबद्दल विचारताच महाराज म्हणाले,
"तुला काय करणे यासी| चिलिम भरावी वेगेसी|
नसत्या गोष्टीशी| महत्व न यावे निरर्थक||"
महाराजांना कपड्याचे आकर्षण वा सोस असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कोणी अंगावर शाल पांघरली तर मनात असेल तोपर्यंत ठेवत नाहीतर ती फेकून देत असत. पादुका, पादत्राणे त्यांनी कधी वापरलीच नाहीत. बरेचसे भक्त विकत आणलेल्या पादुका महाराजांच्या पायाला लावत आणि मग घरी त्यांची स्थापना करीत. मात्र महाराजांच्या नित्य वापरातल्या वस्तूंमध्ये पादुका नव्हत्या. इतकंच काय त्यांना चिलीम ओढण्याचीही फारशी सवय नव्हती. क्वाचितच ते चिलीम ओढीत असत. पण ३२ वर्षांच्या कालखंडात त्यांनी फार कमीवेळा चिलिमीला स्पर्श केला.
भ्रमंती
आपल्या अवतारकार्यातील ३२ वर्षांचा काळ त्यांनी संपूर्णपणे शेगांवमध्ये व्यतीत केला असला तरीही कारणपरत्वे महाराजांची भ्रमंती अकोला, मलकापूर, नागपूर, अकोट, दर्यापूर, अकोली-अडगाव, पिंपळगाव, मुंडगाव, रामटेक, नांदुरा, अमरावती, खामगाव या विदर्भातल्या प्रमुख भागांतल्या खेड्यापाड्यांतून झालेली आहे. उन्हापावसातून वस्त्रविहीन अवस्थेत भरभर चालणा-या महाराजांची चालगती गाठण्यासाठी त्यांच्या भक्तांना अक्षरश: धावावे लागे.
महाराज आपल्या भक्तांसोबत वारीच्या निमित्ताने दरवर्षी पंढरपूर येथे जात असत. त्याचप्रमाणे नाशिक-त्र्यंबकेश्वर येथेही नित्यनेमाने जात. नाशिक येथील कुशावर्त तीर्थाजवळील निलांबिका देवीचा डोंगर तसेच ब्रह्मागिरी पर्वतावरही ते आवर्जून जात असत. ब्रह्मागिरी पर्वताची उंची छाती दडपून टाकणारी आहे. सर्वसामान्य माणसास तिथे जाण्यापूर्वी दहावेळा विचार करावा लागतो. शे - सव्वाशे वर्षांपूर्वी तर ही स्थाने फारच दुर्गम होती. महाराज मात्र हा संपूर्ण पर्वत चढून जात असत. ब्रह्मागिरी पर्वतावरील गहिनीनाथांची गुंफा आणि निवृत्तीनाथांच्या मंदिराला महाराज आवर्जून भेट देत व तिथे काही क्षण घालवत. नाथसंप्रदायात नवनाथांनी जे चमत्कार केले त्यातलेच काही गजानन महाराजांनीही त्यांच्या अवतार कार्यात केलेले ढळतात .
समाधि
जेव्हा महाराजांना कळले की त्यांच्या अवतारसमाप्तीची वेळ येऊन ठेपली आहे त्यावेळी ते हरी पाटलासोबत पंढरीला गेले. असे म्हटले जाते की त्यांचा मानस पंढरीलाच समाधी घेण्याचा होता परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले व ऋषिपंचमीचा पुण्यदिनही ठरविला.
लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या समाधीप्रसंगी हजर होते. तत्पूर्वी महाराजांना सुवासिक द्रव्ये लावून अभ्यंग स्नान घालण्यात आले होते. अनेक सुवासिनींनी त्यांची पूजा करुन मंगलारती ओवाळली होती. सर्वत्र सनईचे सूर ऐकू येत होते. सूर्याची पहिली किरणे जमिनीला स्पर्शिली आणि महाराजांनी ब्रह्मरंध्रातून त्यांचे प्राण अनंतात विलिन केले. देहाचे चलनवलन थांबले आणि भक्तगण एकदम शोकसागरात बुडाले. लोकांना आकाश फाटल्यासारखे झाले, सर्वत्र दु:खाश्रुंचा पूर लोटला.
त्याचवेळी डोणगावच्या गोविंद शास्त्रींनी निर्वाळा दिला की जोपर्यंत महाराजांचे सर्व भक्त दर्शन घेऊन जात नाही तोपर्यंत महाराज त्यांचे प्राण मस्तकी धारण करतील. महाराजांच्या समाधीचा सोहळा हा अवर्णनीय असा झाला. लाखोंच्या गणनेने भक्त समाधीच्या मिरवणूकीत भागीदार झाले. लोकांनी शृंगारीत रथात ठेवलेल्या महाराजांच्या पुण्यमय देहावर अबीर, गुलाल, फुले, तुळशी आणि पैसे उधळले. संपूर्ण शेगावातून फिरुन पहाटे ती मंदिरात आली; तेथे महाराजांवर पुन्हा अभिषेक केला
त्यांचा देह शास्त्रात सांगितल्यानुसार उत्तराभिमुख असा समाधीच्या जागी ठेवला. अखेरची आरती ओवाळली आणि मीठ, अर्गजा अबीर ह्यांनी भरली. सर्व भक्तांनी एकच जयजयकार केला,
"जय गजानना |ज्ञानांबरीच्या नारायणा | अविनाशरुपा आनंदघना | परात्परा जगत्पते ||"
आणि शिळा लावून समाधिची जागा बंद केली. त्यानंतर दासगणूंनी म्हंटले आहे की सार्वभौम राजाचाही त्यांच्यापुढे पाड नाही.
अशा सदगुरुंविषयी परमपूज्य श्री कलावतीदेवी ह्यांनी स्वतः लिहिलेल्या 'गुरुस्तुति'मध्ये सांगितले आहे,
"अगा! निर्गुणा, निश्चला, सच्चिदानंदा |
अगा! निर्मला, केवला आनंदकंदा ||
स्थिरचररुपी नटसी जगी या |
नमस्कार माझा तुला गुरुराया ||१||
अगा! अलक्षा, अनामा, अरुपा |
अगा! निर्विकारा, अद्वया, ज्ञानरुपा ||
कृपाकरोनी अक्षयपद दे दासा या |
नमस्कार माझा तुला गुरुराया ||२||"
सदगुरुच्या स्वरुपाचे खरे वर्णन ह्या ओळींमध्ये सामावलेले आहे, महाराजांना हे वर्णन किती चपखल बसते आहे हे तर सर्वांना विदितच आहे. त्यांनी अनेक लोकांना दु:ख, संकटे, रोग यांपासून मुक्त करून सन्मार्गाला लावले. ते एक योगी होते.
अंतीम संदेश
देह त्याग करण्यापूर्वी महाराज म्हणाले,
"मी गेलो ऐसे मानू नका | भक्तित अंतर करु नका |
कदा मजलागी विसरु नका | मी आहे येथेच ||"
यावरुन महाराजांचे भक्तांवरील अपरंपार प्रेमच दिसून येते. महाराजांनी भक्तांना सांभाळण्याचे वचन दिले आहे; ते समाधी घेण्यापूर्वी म्हणाले,
"दु:ख न करावे यत्किंचित | आम्ही आहोत येथेच |
तुम्हा सांभाळण्यापरी सत्य | तुमचा विसर पडणे नसे ||"
देह त्यागून महाराज ब्रह्मिभूत झाल्याकारणाने ते आता जगदाकार झाले आहेत, ज्यामुळे लाखो भक्तांना आजही त्यांची कृपा, प्रेम, आशिर्वाद आणि मार्गदर्शन लाभत आहे.
संदर्भ : ग्लोबल मराठी
उर्वरीत भाग उद्या ...