मरीआईची कहाणी 2
राजाने विचारले, ''आई, माझे राज्य तुला आवडले नाही का?'' ''नाही रे, तितकेसे काही आवडले नाही. तुझे लोक फार स्वच्छतेने वागतात. घर स्वच्छ दिसले की माझे कपाळ उठते. त्या घरात मी शिरत नाही. या नगरात शिरले नि काय पाहिले? लेकीसुना घरी आलेल्या, घरेदारे स्वच्छ केलेली, रंगरंगोटी दिलेली; खाणेपिणे बेताने चालले होते. शिळेपाके कोणी खाईना. पाणी गाळीत व तापवून पीत. अशा घरी शिरावेसे मला वाटेना!'' राजा बोलला, ''मग, मरीआई, माझी इतकी माणसे कशी मेली?'' मरीआई म्हणाली, ''राजा, थोडी घरे माझ्या आवडीची सापडली, त्या घरांत मी गेले. दारातच उकिरडे होते. तेथे घाणीची रास साचलेली, माश्यांचे घोंघावणे चाललेच आहे. राजा, ह्या जागा मला फार आवडल्या. काही लोकांनी खाण्यात धरबंध ठेवला नव्हता. वाटेल तेव्हा, वाटेल तितके, हवेतसे खात होते. त्यांच्यावर मी कृपा केली.''
राजा बोलला, ''मरीआई, तुझी कृपया आणखी कोणावर होते?'' मरीआई म्हणाली, ''तरणीताठी मुले मला फार आवडतात. म्हातारीकोतारी, अशक्त दुबळी मला आवडत नाहीत. नियमित वागणारी व स्वच्छतेची भोक्ती माणसे, त्यांना भेटावयास मी मेल्ये तरी जाणार नाही. राजा, स्वच्छता मला आवडत नाही, लिंबाचा वास खपत नाही; जेवताना कोणी लिंबे खात असेल तर मी तेथून पळ काढते.''
राजाने मनात विचार केला - मरीआईला स्वच्छता का आवडत नाही ? - ठीक आहे. राजाने नगरात दवंडी पिटविली, ''घरेदारे स्वच्छ ठेवा; दारात उकिरडे करू नका; शिळेपाके खाऊ नका; माश्या अन्नावर बसू देऊ नका; पाणी गाळून तापवून घ्या; जेवताना लिंबाचा सढळ हाताने उपयोग करा.''
दवंडी लोकांनी ऐकली व लोक तसे करू लागले. मरीआई संतापली. रागाने खवळली, जशी नागीण. ती राजाकडे गेली व म्हणाली, ''राजा, मोठा रे कपटी आहेस तू; मला भुकेने मारतोस. मी तुझ्यावर कोपले आहे. तुझ्या राज्यात फिरून म्हणून येणार नाही.''
राजाला आनंद झाला. लोक सुखी झाले. तुम्ही आम्ही पण सुखी होऊया. अशी ही साठा उत्तरांची कहाणी, पाचा उत्तरी सुफल संपूर्ण.