तरी आईच! 1
एक गरीब विधवा होती. तिचा एकुलता एक मुलगा होता. त्या मायलेकरांचे उभयांवर फार प्रेम. एकमेकांवर विसंबत नसत. तो मुलगा लहानाचा मोठा झाला. तो आता तारुण्यात आला. तो एका तरुणीच्या नादी लागला. तिच्या नादी लागून त्या तरुणाचा सर्वस्वी नाश झाला. त्याची संपत्ती, त्याची बुध्दी, त्याची श्रध्दा, त्याचा चांगुलपणा, त्याचा स्वाभिमान, त्याची मातृप्रीती, सर्व-सर्व गेले. त्या तरुणाचे सर्वस्व हिरावून घेऊनही ती तरुणी तृप्त झाली नाही.
एक दिवस ती तरुणी त्या प्रियकरास म्हणाली, ''तुमचे प्रेम माझ्यावर आहे असे म्हणता, परंतु अजून माझी खात्री होत नाही. तुम्ही मला धन-द्रव्य जे जे मागितले ते ते दिले तरीही आपल्या मजवरीस प्रेमाबद्दल शंका आहे. जर आज मी जे सांगेन त्याप्रमाणे तुम्ही कराल तरच तुमचे खरोखर प्रेम मजवर आहे असे मी समजेन.'' तो वेडा व उल्लू तरुण म्हणाला, ''सांग, तुझ्यासाठी काय करू?'' ती म्हणाली, ''जा तर आणि स्वतःच्या आईचे हृदय कापून आणा.'' तो तरुण त्वरेने गेला. त्याने आपल्या आईस ठार मारले व तिचे काळीज कापून घेऊन ते त्या आपल्या प्रियकरणीस देण्यासाठी लगबगीने निघाला.
परंतु जाण्याच्या घाईत तो फरशी रस्त्यावरून पाय सरकून पडला. त्याच्या हातातील काळीज दूर पडले. परंतु ते काळीज त्या तरुणास हळूच कनवाळूपणे म्हणाले, ''बाळ, लागलं का रे तुला? कितपत लागलं माझ्या बाळाला!''
मुलांनो, आईच्या प्रेमास सीमा नाही. आईचे प्रेम हा अथांग सागर आहे. पृथ्वीवरील मातीचे कण मोजवतील व आकाशातील ता-यांचे गणन होईल; परंतु आईच्या प्रेमाची मोजदाद कोण करील? अशा आईला दुखवू नका हो ! आई हे दैवत आहे.