राम-रहीम 8
रहीम : काँग्रेसच्या स्वयंसेवकास मी दाणे घालीत होतो. इतर गरीब मुसलमान आयाबहिणींनी भिक्षा घातली. एका अम्माने पीठ घातले. परंतु मला बाबांनी दाणे घालू दिले नाही. ते खूप बोलले. म्हणाले, 'माझ्या घरातून चालता हो.' मी बाहेर पडलो. अल्लाच्या सेवकाला का फकीरच व्हावे लागते?
रामनेही त्याला हकीगत सांगितली. ते दोन गंगा-यमुनांचे प्रवाह होते, ती जोडी गुरू-शुक्रांची जणू युती होती. गुलाब व मोगरा यांची ती भेट होती. राम व रहीम यांची ती भेट म्हणजे भारतीय ऐक्याची नवीन पताका होती. आता ते दोघे रस्त्यातून हिंदू-मुस्लिम ऐक्याची गाणी गात. रस्ते झाडीत. जणू आकाशातील दोन देवदूत असे आयाबायांना वाटे. ते बाल-फकीर बनले. त्या गावाला ऐक्याची कुराण, प्रेमाचे उपनिषद ते आपल्या गीतांनी ऐकवीत. कोणी त्यांना भाकरी देई.
त्या दिवशी एकदम हिंदू-मुसलमानांचा दंगा सुरू झाला. लाठया-काठया, सुरे कृतार्थ झाले. रहीमचे वडील व रामचे वडील ह्यांच्या प्रयत्नांस यश झाले. ब्रिटिश सरकारला आनंद झाला. राम व रहीम धावत आले. ''नका भांडू, नका एकमेकांस मारू. नका, भाई हो नका.'' असे ते हात जोडून सांगत होते. परंतु हे काय ? रहीमने किंकाळी फोडली. रामनेही किंकाळी फोडली. रहीमच्या पित्याचा खंजीर रहीमच्या अंगात खुपसला गेला. शंकररावांची लाठी रामाच्या डोक्यावर बसली. ती दोन मुले रक्ताने न्हाऊन तेथे पडली. लोक थबकले. दंगा शांत होऊ लागला. पोलिसही आले.
राम व रहीम हॉस्पिटलमध्ये होते. त्यांच्या खाटा जवळजवळ होत्या.
''आमचे हात एकमेकांच्या हातात द्या.'' ते दोघे क्षीण परंतु गोड आवाजात म्हणाले.
''हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जय होवो, काँग्रेसचा जय होवो'' असे म्हणत त्यांनी प्राण सोडले.
त्या गावी 'राम-रहीम' या नावाची सुंदर इमारत बांधली गेली. हिंदु-मुस्लिम बंधु-भगिनी तेथे जातात. अश्रूंची फुले वाहतात व प्रेमाचा खरा धर्म शिकतात!