किसन 3
समुद्र आता हसेल, हसवील; पण मग बुडवील, रडवील. कोकरांप्रमाणे, लहान मुलांप्रमाणे दिसणारा हा समुद्र मग राक्षसासारखा खवळतो व चेंडूप्रमाणे गलबतें फेकून देतो, बुडवितो. नको, येथेच मीठ-भाकर खाऊ. आपली मुले कसलाही हट्ट धरीत नाहीत. मोठी गुणी आहेत माझी बाळे! पाहा, पाहा, त्यांना एका पांघरुणात निजविले आहे, प्रत्येकास निरनिराळे पाहिजे असा हट्ट धरून नाही बसली ती!'' असे म्हणून तिने सर्वांत लहान मुलाचा निजला असताच एकदम पापा घेतला.आईचे प्रेमाचे पांघरूण असल्यावर मुलांस अन्य काय पाहिजे! अमृतमय आईच्या दृष्टीचा वर्षाव असला म्हणजे आणखी काय खाऊ पाहिजे? आईचा मुखचंद्रमा असल्यावर दुसरी भिकारडी खेळणी काय कामाची! पण हे किसनला कोठे पटत होते? तो म्हणाला, ''तुम्ही बायका अशाच भित-या. तुम्ही उत्साह देण्याऐवजी पाय मागे ओढणा-या. वेडी आहेस तू. रडावयास काय झाले? हजारो व्यापारी जातात व श्रीमंत होऊन येतात. मी तुला सिलोनच्या समुद्रातील मोती आणीन. हिंदुस्थानातील हिरे आणीन. अगं, धाडस केल्याशिवाय कसे होणार?'' लिली काही बोलली नाही. परंतु तिच्या प्रेमळ व सात्त्वि दृष्टीला काही तरी अशुभ दिसत होते. शेवटी एक दिवस किसनने व्यापारास जाण्यासाठी निघावयाचे ठरविले. एक मोठे गलबत बंदरात आले होते. त्यावर किसन पण चढला. आपली मुले घेऊन लिली समुद्रावर त्याला पोचवण्यास आली होती. रडून अपशकुन होऊ नये म्हणून तिने आपला अश्रुपूर अडवून ठेवला होता. पतीने मुलांचे मुके घेतले, लिलीने प्रेमळ व डबडबलेल्या डोळयांनी पाहिले व गेला. तो पाहा गलबतात किसन चढला व बाजूस लिलीकडे तोंड करून उभा आहे.
गलबत हाकारण्यात आले. किसनचे तोंड अजून तेथेच बाहेर होते. लिलीस पिऊन टाकून तो आपल्या हृदयात साठवून ठेवीत होता का? गलबत लांब गेले; वळले. लिली माघारी वळली. दाबून ठेवलेला अश्रुपूर जोराने बाहेर पडला, परंतु मुलांस आपल्या रडण्याने कसेतरी होईल म्हणून तिने आपले रडे आवरले. डोळे पुसले, ''चला हां घरी.'' असे मुलांस म्हणून ती घरी आली.
तिचे मन कशात रमेना. मुलांना तिने जेवू-खाऊ घातले व मुले फुलपाखरासारखी बाहेर खेळण्यास गेली. लिलीला जेवण नाही, खाणं नाही. एकंदर काही बरे होणार नाही असे तिला वाटे. समुद्रावर काय कष्ट होतील, वारे सोसाटयाचे येतील, आजारी तर नाही पडणार! ना जवळ कोणी मायेचे. शेकडो दु:खद विचार तिच्या हृदयात उसळत व तिच्या डोळयांतून खळखळा पाण्याचे पूर येत.
परंतु काळ हा सर्व दु:खावेग कमी करणारा आहे. दु:खावर सर्वांत मोठे औषध काळाचे आहे. या क्षणीची दु:खाची तीव्रता पुढल्या क्षणी नसते. मोठमोठी दु:खे काळ विसरावयास लावतो. काळ अश्रूंना आटवतो. कोमेजलेले मुखमंडल काळ पुन्हा खुलवतो. भरलेले डोळे तो पुसून टाकतो.
लिलीचे दु:ख कमी झाले. दु:ख करावयास तिला वेळच नव्हता. या जगात कित्येक गरिबांस रडण्यास तरी कोठे अवकाश असतो! शेतातून व कारखान्यांतून कामे करावयास त्यांस डोळे पुसून जावे लागते.