अब्बूखाँकी बकरी 5
लांडगा जमिनीवर बसला होता. त्याने घाई केली नाही. आता कोठे जाणार ही पळून? असा त्याला विश्वास होता. बकरीने त्याच्याकडे तोंड केले. लांडगा म्हणाला, 'अब्बूखाँचीच बकरी, चांगली केली आहे धष्टपुष्ट!' त्याने आपल्या काळयासावळया ओठावरून आपली लाल जीभ फिरवली. चांदणीला कल्लू बकरीची गोष्ट आठवली. कल्लू उजाडेपर्यंत झुंजली, अखेर मेली. असे झुंजण्यात काय अर्थ? एकदम त्याच्या स्वाधीन का होऊ नये? असे चांदणीच्या मनात आले. परंतु पुन्हा म्हणाली, ''नाही, आपणास लढता येईल तोपर्यंत लढायचे.'' तिने शिंगे सरसावली. पवित्रा बदलला.
चांदणीला का स्वत:ची शक्ती माहीत नव्हती? लांडग्याशी आपण टिकणार नाही हे तिला का कळत नव्हते? कळत होते. पण ती म्हणाली, ''आपल्या शक्तीप्रमाणे आपण शेवटपर्यंत झगडणे हे आपले काम. जय वा पराजय हे देवाहाती. कल्लूप्रमाणे उजाडेपर्यंत मला टक्कर देता येते की नाही हे पाहण्याची इच्छा होती. आली आहे वेळ. झुंजू दे मला.''
लांडगा पुढे आला. चांदणीने शिंगे सावरली. लांडग्यावर तिने असे हल्ले चढवले की, तो लांडगाच ते जाणे! दहा वेळा तिने लांडग्याला मागे रेटले. मध्येच ती प्रभात होऊ लागली की नाही हे पाहण्यासाठी वर पाही.
एकेक तारा कमी होऊ लागला. चांदणीने दुप्पट जोर केला. लांडगाही जरा मेटाकुटीस आला होता. इतक्यात पहाटेची वेळ झाली. कोंबडयाने नमाजाची बांग दिली. खालच्या मशिदीतून 'अल्लाह अकबर' आवाज आला. चांदणी म्हणाली, ''देवा, पहाटेपर्यंत शक्तीप्रमाणे स्वातंत्र्यासाठी झुंजले. तुझे आभार. माझे काम मी केले. आता तुझी इच्छा प्रमाण.''
मशिदीतील शेवटचा 'अल्लाह अकबर' आवाज आला व चांदणी मरून पडली. तिचे गोरे गोरे अंग रक्ताने लाल झाले होते. लांडग्याने तिला फाडले, खाल्ले. उजाडू लागले. झाडावरील पाखरे किलबिल करू लागली. तेथील झाडावरील चिमण्या चर्चा करू लागल्या, ''जय कोणाचा? लांडग्याचा की चांदणीचा?'' पुष्कळांचे मत पडले 'लांडग्याचा.' परंतु एक म्हातारी चिमणुलीबाय म्हणाली, ''चांदणीने जिंकले.''