स्वतंत्रतादेवीची कहाणी 6
भाग्यबाईने त्यांना नमस्कार केला. देवता निघून गेल्या. भाग्यबाईच्या मनात श्रध्दा होती. भक्ती होती. तिच्या हृदयात आशा उत्पन्न झाली. तिने तेथे स्नान केले व पुन्हा माघारी घरी आली. तिने सर्व मुलांना एकत्र बोलाविले. सर्व मुले मातेच्या भोवती जमा झाली. भाग्यबाईने मुलांना ते व्रत सांगितले. त्यांनी ते व्रत करण्याचे ठरविले.
दरवर्षी मार्गशीर्ष या पवित्र महिन्यात, पवित्र विचार मनात आणून भाग्यबाईची बाळे स्वतंत्रतेची सुंदर मूर्ती करीत. तिला सद्गुणांची माळ घालीत. स्वावलंबनाचे लाडू सांगितल्याप्रमाणे करीत. अशा रीतीने पहिले वर्ष त्यांनी केले-तो गोरीबाई भिऊ लागली. ती म्हणू लागली, ''या रे भाग्यबाईच्या पोरांनो, हे घ्या तुकडे-'' परंतु व्रताचा ताबडतोब परिणाम लक्षात येताच त्या तुकडयांकडे भाग्यबाईच्या मुलांनी पाहिले नाही. त्यांनी पुन्हा व्रत केले. गोरीबाई फारच भिऊ लागली. गोरीबाई जसजशी भिऊ लागली, तसतशी भाग्यबाईच्या बाळांची श्रध्दा बळावत चालली. ते दुप्पट उत्साहाने व्रत करू लागले. शेवटी एक दिवस गोरीबाई म्हणाली, ''मी माझ्या देशात आल्ये तशी जात. ही घ्या तुमची सत्ता. ही घ्या तुमची मत्ता. मला काही नको. भाग्यबाई, मी तुला छळले पण मनात ठेवू नको. मी चुकल्ये, मी पापे केली. मी तुला नाडले, पाडले, छळले मारले, पोळले-क्षमा कर. तू थोर आहेस, तू खरी आमची अन्नदात्री. तू विद्यादात्री. त्या तुलाच कृतघ्नपणे आम्ही हीनदीन केले. मनात नको हो ठेवू हे. उदार मनाने आम्हांला क्षमा कर. माझी मुले-बाळे आली सवरली तर त्यांना हाकलून देऊ नको. ती आता सौजन्याने राहतील. करशील ना ही कृपा?''
भाग्यबाई म्हणाली, ''खुशाल तेथे राहताना! पण नीट राहू देत, मला आई मानून येथे राहू देत. मला त्यांनी परकी समजू नये म्हणजे मी त्यांना समजणार नाही. क्षमा हा माझा धर्म आहे. माझी सर्व मुले-हा मोठा मुलगा वसिष्ठ, हा लहानसा मोहनदास-पाहा किती क्षमावान आहेत. येऊ देत हो तुझी पण मुले. अग, त्यात काय जाते? येतील, एके ठिकाणी खेळतील, खातील, शिकतील, सवरतील, मोठी होतील. एकमेकांना साहाय्य करून जगात आनंदाने सर्वांनी राहावे, उन्मत्त होऊ नये, फसवू नये असे आपले मला वाटते.''
गोरीबाई मनाने चांगली होऊन निघून गेली. भाग्यबाई पुन्हा भाग्यवती झाली. जगाची मार्गदर्शक-तारक झाली; सुखी झाली. तसे तुम्ही आम्ही होऊ या. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण!