किसन 7
किसनला राजाने घरी जाण्याची परवानगी दिली. माझी मुले-माणसे घेऊन मी येथे परत येईन अशी त्याने कबुली दिली. किसन घरी जाणा-या गलबतावर चढला. आनंदाच्या शिखरावर चढला. घराची आठवण झाली. मुले सर्वत्र दिसू लागली. पत्नी डोळयांसमोर दिसू लागली. उत्कंठेचा आनंद-त्याचे वर्णन किती करणार? त्या लाटा जशा खालीवर होत होत्या, तसे किसनच्या मनाचे होई. माझी मुले सर्व सुखरूप असतील का? लिली कुशल असेल ना? या विचाराने मन खाली जाई, तर सर्व चांगले असेल या विचाराने मन वर जाई. समुद्रावरचा प्रवास संपत आला. किसनचा गाव, ती टेकडी दिसू लागली. किसन उभा राहून आनंदाने पाहू लागला. माझा गाव, माझी टेकडी-त्याचे हृदय उचंबळून आले. आठ-नऊ वर्षांनी तो परत मातृभूमीस आला होता. परदेशातील सुखांच्या राशीपेक्षा स्वदेशातील दु:खही गोड असते.
किसन किना-यावर उतरला. परंतु त्यास कोणी ओळखले नाही. त्याच्या चेह-यावर किती फरक दिसत होता. वादळाचा, समुद्राचा, हालअपेष्टांचा, चिंतेचा, परदेशीय हवेचा कितीतरी परिणाम त्याच्यावर झाला होता. किसन एकदम घरी गेला नाही. किना-यावरच्या एका खानावळीत तो गेला. ही खानावळ पूर्वीचीच होती. एका म्हाता-या बाईची ती खानावळ होती. किसनने त्या म्हातारीस ओळखले. किसनने आपले सामान तेथे ठेवले व खाटेवर बसला. म्हातारीने जेवण वाढले. किसनने म्हातारीस विचारले, ''बाई, या गावातील किसन, रतन यांची काही माहिती आहे तुम्हांला?'' म्हातारी म्हणाली, ''हो, आहे तर! गरीब दुर्दैवी किसन, लहानपणी कितीदा तो येथे खेळे. प्रवासास गेला, तो तिकडेच मेला. दहा वर्षे झाली, परत आला नाही. त्याची बायको, ती मुले कोण कष्टात! लिली तर मोजमजुरी करी, शेवटी एक वर्षांपूर्वी तिने रतनशी लग्न लावले. रतन त्यांचा लहानपणचा मित्रच. बरे झाले मुलाबाळांस. किसन मात्र गेला.'' हे सर्व ऐकून किसन काळवंडला. त्याच्या डोळयांतून अश्रू आले. म्हातारीने पाहिले. ती म्हणाली, ''रडून त्रास होणार, देव ठेवील तसे राहावे.''
किसनला पायांखालची सर्व सृष्टी बुडाली असे वाटले. समोरच्या समुद्रात उडी घ्यावी असे वाटले. लिलीकडे जाऊन तिला ठार मारू? छे; लिली प्रेमळ मनाची. 'मी तुमची दोघांची लहानशी बायको होईन हे शब्द त्याला आठवले. लिली, फुलासारखी कोमल लिली.' मी जाऊन तिच्या सुखावर निखारे ओतू? तिच्या कुसुमसम हृदयाची होळी पेटवू? छे:? रतन तरी माझा मित्रच, राहू दे. त्यांना सुखात राहू दे. मी आलो, जिवंत आहे हे त्यांस कळवू नये, आपण दूरदेशी निघून जावे.
परंतु दुस-या दिवशी किसनला झणझणून ताप आला. म्हातारीने त्याला अंथरून दिले. म्हातारीस तरी कोण होते? मुलाप्रमाणे म्हातारी त्याची शुश्रूषा करी. ताप कमी होईना. एक दिवस म्हातारी त्याच्या खाटेजवळ बसली होती. किसनने डोळे उघडले. त्याचे ओठ थरथरले. म्हातारी म्हणाली, ''मुला, तुला काही सांगावयाचे आहे?'' किसन म्हणाला, ''मन घट्ट करा, ऐका. मी किसन-'' म्हातारी चपापली. नीट न्याहाळून पाहू लागली, तो खरेच ओळख पटली. किसन याने थांबून थांबून सर्व हकीकत सांगितली व म्हणाला, ''म्हातारबाई-आजीबाई, माझे हे धनद्रव्य तुमचे, तुम्ही लिलीस काही कळवू नका; मला जगण्याची आशा नाही. मी आता मरणारच.'' म्हातारीच्या डोळयांतून अश्रू तिच्या सुरकुतलेल्या गालांवर आले. त्या दिवसांपासून किसन शुध्दीवर आला नाही.
म्हातारीने लिलीस ही गोष्ट कळवली. लिली, रतन, मुले सर्व म्हातारीकडे आली. परंतु किसनने कोणास ओळखले नाही. किसन या जगातून निघून गेला.
किसनचा थोरपणा लिली व रतन यांच्या मनावर कायमचा ठसला. त्याचा फोटो त्यांच्या दिवाणखान्यात आहे, त्याची ती रोज पूजा करतात.