राजा शुद्धमती 2
एके दिवशी सकाळी राजा उठला व आपल्या प्रजेसाठी आपणास जास्तीत जास्त काय करता यईल या गोष्टीचा विचार करीत होता. दुस-यास सुख देण्याचा विचारही किती सुखप्रद व उन्नतिकर असतो! विचार करता करता राजा मनात म्हणाला, ''मी गोरगरिबांस काही धनधान्य देतो यात विशेषसे काय करितो? सोने, चांदी, वस्त्रप्रावरण या बाह्य वस्तूच मी आजपर्यंत देता आलो. माझे स्वत:चे असे मी काय दिले आहे? हा देह माझा आहे. हा देह जर मला देता येईल, तर खरोखर मी माझे काही दिले असे म्हणता येईल. माझ्या प्रजेवर माझे जे अलोट प्रेम आहे ते दर्शित करण्यासाठी मी माझे प्राण देण्यास तयार असले पाहिजे. आज ज्या वेळेस मी भिक्षागृहात जाईन त्या वेळेस एखादा दीनदुबळा माणूस जर मला म्हणेल, 'महाराज, आपले काळीज मला कापून द्या.' तर मी आपले काळीज भाल्याच्या टोकाने कापून काढीन व एखाद्या शांत सरोवरातून कमळ खुडून आणून देवावर वाहावे त्याप्रमाणे माझे हृदयकमल त्या याचकाच्या पदरी मी अर्पण करीन! आज जर कोणी माझे रक्त व मांस मागेल तर मी आनंदाने देईन. 'माझे काम करण्यास कोणी नाही' अशी रड जर माझ्याजवळ कोणी गाईन तर मी त्यास साहाय्य करण्यास माझे सिंहासन सोडून जाईन. देवाने दिलेली सर्वांत मोठी देणगी म्हणजे जे हे दोन डोळे तेही जर एखाद्याने मागितले तर वृक्षावरची दोन फुले तोडून द्यावी, त्याप्रमाणे ही माझी नेत्रपुष्पे मी त्या याचकास देईन. माझ्या देहाचा अशा प्रकारे उपयोग करण्यास जर मला संधी मिळेल तर मला किती आनंद होईल!''
राजाचे मन प्रजेवरील प्रेमाने आज भरून आले होते. तो शुचिर्भूत झाला. त्याने स्नान केले. शृंगारलेल्या हत्तीवर बसून तो भिक्षागृहाकडे गेला. राजाच्या प्रशांत भालप्रदेशावर आज अलौकिक तेज दिसत होते. त्याचे नेत्रद्वयात प्रेमाची मंदाकिनी अवतरली होती. त्याच्या ओठावर फारच मृदू व रमणीय हास्य विलसत होते.
भगवान कैलासपती शंकर यांच्या मनात राजचे आज सत्त्व पाहावे असे आले. त्या राजाचा आज प्रात:काळचा निश्चय कसोटीस लावून पाहण्याचे शंकरांनी ठरविले. राजाचा हा खरा निश्चय आहे, की मनात हजारो सुंदर निश्चय येतात व मावळतात, तसेच हे लहरी विचार आहेत, हे भगवंतास पाहावयाचे होते. शंकरांनी पार्वतीस आपला मनोदय कळविला तेव्हा भक्तवत्सल पार्वती म्हणाली, ''प्राणप्रिया, असे कठोर वर्तन करू नये. आजपर्यंत अनेक भक्तांचा आपण अमानुष छळ केला. माझे मन त्या त्या वेळी कसे तिळतिळ तुटले. श्रियाळ, चांगुणा यास तुम्ही किती बरे छळले होते? भक्तमणींचा असा छळ करणे आपणांस उचित नव्हे.''
भगवान शंकर म्हणाले, ''वेडीच आहेस तू! अग सोने कसोटीस लावल्यावर मगच ते जवळ ठेवता येते. भट्टीत घालून सोने झगझगीत निघाले तरच त्यास मोल चढते. परीक्षा पाहिल्याशिवाय वस्तू घेतली व मागून फसलो तर आपल्यासारखे मूर्ख कोणीच नाही! भक्तांचा मी छळ करतो, परंतु मागून मी त्यांचा बंदा गुलाम होतो, अक्षय त्यांचा मी ऋणी राहतो. वा कसल्याही आघातांचा वारा मी त्यास लागू देत नाही.''