स्वतंत्रतादेवीची कहाणी 3
दु:खाने दु:ख वाढू लागते. दारिद्रय आले म्हणजे सर्व दुर्गुण पण येतात. भाग्यबाईंची मुले भाकरीसाठी भांडू लागली. गोरा धनी भाकरीचा तुकडा चौघांना दाखवी व लठ्ठालठ्ठी लावून देई. कधी पैसे देऊन स्वत:च्या बांधवांची तो हत्या करण्यास लावी. त्याचे नुकसान करण्यास लावी, गोरा धनी आपली स्तुतिस्तोत्रे कोणास गावयास लावी. आपली भाषा बोलण्यास लावी. गो-या धन्याने जाहीर केले, 'माझी भाषा शिका, माझा पोशाख करा. माझी संस्कृती उचला. जो असे करीत त्यास मी मान देईन. पैसा देईन.' बुभुक्षित भाग्यदेवतेची बाळे-भराभरा तसे करू लागली. येस, नो, येसफेस करू लागली, विजार-बूट पेहरू लागली. जो असे न करील त्या स्वत:च्याच बांधवास तुच्छ लेखू लागली! होता होता इतकी स्थिती झाली की, भाग्यबाईची ही विधुळी पोरे जर कधी कधी आईची आठवण होऊन घरी आली तर आईच्या भाषेत त्यांना बोलताही येत नसे. आईची भाषा विसरून गेले. आईला नमस्कार करण्याऐवजी म्हणत, 'गुड मॉर्निंग-बुट मारिंग' म्हणत. भाग्यबाई म्हणे, 'कोणाला बूट मारतोस, मला का?' असे तिने म्हणताच ते रागावत व म्हणत 'Old hag म्हातारडी कोठली.' अरेरे! स्वत:च्याच मातेची अशी विटंबना त्यांनी आरंभावी ना?
परंतु एक दिवस असा येतो की, ज्या वेळेस चुकलेल्यास चूक समजून येते, तसे भाग्यबाईच्या मुलांचे पण झाले; त्यांना आपल्या चुका कळल्या, किती झाले तरी हा धनी परका, त्याला का खरा कळवळा येणार आहे? प्रसंग आला की गोरा गो-याला मिळे व भाग्यबाईच्या मुलांचे वाभाडे निघत. गो-याची लावालावी. त्याची लफंगेगिरी, त्याचे डावपेच भाग्यबाईच्या बाळांना समजून येऊ लागले; गोरा जास्त जास्त पिळू लागला. दडपू लागला-तसतसा भाग्यबाईच्या मुलांचा स्वाभिमान जागृत होऊ लागला. तिची काही मुले मोठी गुणी निघाली. त्यांनी हा गो-यांचा दंगा उघड केला. गो-यांची सत्ता व्यापा-यावर आहे, त्यांचा व्यापार आपण बंद करू या; असे म्हणू लागली. परंतु सर्वांस पटेना. गो-याकडे दरवर्षी जाऊन आपली गा-हाणी सांगू व 'आमची सत्ता आम्हांला द्या' असे म्हणत जाऊ असे त्यांनी ठरविले.
दरवर्षी मार्गशीर्षाच्या महिन्यात भाग्यबाईची मुले एकत्र जमत व यंदा कशा त-हेने भीक मागण्यासाठी जावयाचे हे ठरवीत. परंतु भीक मागायला आले म्हणजे गो-या बाईचे उत्तर ठरलेले, ''वा रे वा, चावट कोठले! तुम्हाला रे काय देऊ? माझ्याच मुलांबाळांस पोटभर पुरत नाही. दासीवटकींना उरत नाही. माझ्याच मुलांत अजून बेकारी आहे, दारिद्रय आहे. चला चालते व्हा इथून.''
असे आपले दरवर्षी व्हावयाचे. गो-या मुलांची आई भाग्यबाईच्या मुलांस पाण्यात पाही. तिला भाग्यबाईचा पाणउतारा करावा असे पदोपदी वाटे. हा पाणउतारा करण्यास कोणी ग्रंथकार, कोणी ग्रंथकर्त्री तिला आपली मिळायची. म्हणतात ना, 'मोठे कुले तिकडे जग भुले.'
भाग्यबाईचे रडून रडून डोळे सुजले, लाल झाले. एक दिवस ती वैतागली व म्हणाली, ''जीव देते जाऊन. मला मुलांचे हाल पाहवत नाहीत. सतरा साथी, अठरा दुष्काळ, सर्व आपत्तींनी मुले खंगून गेली. डोळे खोल गेले, गाल बसले; मला नाही रे देवा हे पाहवत.'' असे म्हणून ती उठली व फाटक्या वस्त्रानिशी रानात निघाली. जिने भरजरी शालू नेसावे, जिने अलंकार घालावे, जी शिबिकेमध्ये नेहमी बसायची, भालदार-चोपदार जिच्यापुढे ललकारायचे-ती भाग्यबाई अनवाणी, निरलंकार, फाटक्या वस्त्रानिशी रडत चालली होती. सूर्याला ते पाहवले नाही. त्याने ढगाचे दाट वस्त्र आपल्या तोंडावर घेतले.