आई, मी तुला आवडेन का? 3
''देवा, मला ने व माझ्या आक्कास वाचव, ही माझी प्रार्थना तू ऐकलीस वाटते. मग फार काही वाईट नाही तर मी-'' विश्वनाथ वातात बोलत होता. ते शब्द ऐकून त्याच्या बहिणीच्या खोल गेलेल्या डोळयांतून मोत्यांसारखे घळघळ अश्रू येऊ लागले.
आज विश्वनाथ शुध्दीवर आला होता. तो आपल्या खोल गेलेल्या आवाजाने आईस म्हणाला, ''आई, घे ना माझे डोके तुझ्या मांडीवर! घे, हां. मी आता सांगतो तसे करा-मी की नाही माझे मृत्युपत्र करतो.'' विश्वनाथाने 'मृत्युपत्र' शब्द ऐकला होता, त्याच्या मास्तरांनी त्याचा अर्थ त्याला समजावून दिला होता.
''बाळ, नकोरे असे बोलू. माझ्या बाळाला देव उदंड आयुष्य देईल.'' ''छे, आई, आता मी बरा होणार नाही. मी की नाही देवाला प्रार्थनाच केली होती की मला ने. तो मला नेणार. आई, माझी रामाची तसबीर आहे ना, ती माझा मित्र नारायण आहे ना, त्याला दे.'' दम लागला म्हणून विश्वनाथ थांबला. पुन्हा क्षीण स्वराने तो म्हणाला,
''माझा पोपट त्या नामदेवास द्या. कारण तो प्रेमळ आहे. तो त्याला वेळच्या वेळी खावयास-प्यावयास देईल आणि माझा मोगरा, त्याला कोणीतरी पाणी घाला, नाहीतर तो सुकून जाईल. माझी चांदीची झारी शांतीला द्या. कोठे आहे ग शांती? ती पाहा हसते आहे गुलाम. शांते, आता रडत जाऊ नकोस, आक्कास त्रास देऊ नकोस, आता मी नाही हो तुला घेणार. आजोबा-बाबा-'' अडखळत सर्व प्राण कंठी एकवटून विश्वनाथ बोलत होता, ''आई, माझे सर्व मित्र बोलाव ना! अरे, हे तर आलेच आहेत, मग आत का नाही आलात? आई, आई, देवाने ऐकले म्हणून मी जातो-मी की नाही, चांगला होऊन येईल-आई-''
विश्वनाथ किती क्षीण स्वराने हे बोलत होता. जाणा-या जिवाची ती शेवटची शक्ती होती. विश्वनाथ मातेच्या मांडीवर मलूल होऊन पडला आणि दोन-चार घटकांत त्याचे प्राणोत्क्रमण झाले.