राम-रहीम 3
बाप : मुसलमान आमच्या आयाबहिणी पळवितात.
राम : पुष्कळ वेळा हिंदू गुंडही त्यांना त्या पुरवतात. शिवाय हिंदू समाजातील एखाद्या स्त्रीचे पाऊल तुमच्या दुष्ट रूढीमुळे वेडेवाकडे पडले तर तुम्ही तिचा सांभाळ करीत नाही. त्या स्त्रिया मग परधर्माचा आश्रय करतात किंवा मरणाला मिठी मारतात. आपल्या अनुदारतेचा हा परिणाम आहे. काही मुसलमान मुद्दाम हिंदू आयाबहिणींची कुचेष्टा करतात. त्यांचे शासन करावयास उभे राहिले पाहिजे. परंतु माझे म्हणणे की, सर्व समाजाला दोष देऊ नका. हिंदुस्थान हिंदूंचाच असे म्हणू नका.
बाप : तुम्हा भेकडांना असे म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही नका म्हणू. आम्ही म्हणणार.
राम : आम्ही भेकड नाही. इंग्रजांच्या गोळीबाराला न भिणारे, मरणाला न भिणारे लोक भेकड नसतात. राष्ट्राच्या मंगलाची महात्माजींसारख्यांस अधिक तहान आहे. मुलमानांना येथे स्थान नसेल तर तुम्हांसही नाही. तुम्हीही उत्तर धु्रवावरून आलात. वेदांत साम्राज्यवाद्यांच्या व येथील एतद्देशीय राजे मारून राज्य स्थापले, वगैरेंच्या कथा आहेत. मुसलान मक्केकडे तोंड करतात व आपण उत्तर दिशा पवित्र मानतो. खेडयापाडयातून गरीब मुसलमान भगिनी दळताना ज्या ओव्या म्हणतात त्यात सुंदर गंगा जमुनांची वर्णने आहेत. बंगाली मुसलमान कवींनी गंगास्तोत्रे लिहिली आहेत. हिंदु-मुसलमान गुण्यागोविंदाने राहण्यास शिकत होते. परंतु इंग्रज आले. त्यांनी विकृत इतिहास लिहिले. त्यांच्या 'फोडा-झोडा' धोरणाला आपण सुशिक्षित बळी पडत आहोत. इंग्रजांची नीती अप्रत्यक्षपणे आपण उचलून धरीत आहोत. बाबा, काँग्रेसच्याच मार्गाने जाऊ या, त्यायोगेच यश येण्याचा संभव तरी आहे.
बाप : ते काही नाही. माझ्या घरात काँग्रेस नको, मला बुध्दिवाद नको. तुला माझ्या घरात राहावयाचे असेल तर मी सांगेन त्याप्रमाणे वागले पाहिजे.
असे म्हणून बाप निघून गेला. रामाला आपल्या जीवनातून रामच निघून गेला असे वाटू लागले. परंतु त्याच्या हृदयातील प्रेम कोण मारणार? तेथील काँग्रेस कोण दूर करणार?
एके दिवशी शंकरराव मुलास म्हणाले, ''ती गांधी टोपी काढून टाक. काळी टोपी डोक्यावर घाल. खादी आजपासून बंद. खादीमुळे मुलमानांस धंदा मिळतो. सापांना पोसणे पाप आहे.''