किसन 5
लिलीने अश्रू पुसले. मुलांच्या अंगात ते नवीन अंगरखे घातले. त्यांना खाऊ दिला. ती मुलांस म्हणाली, ''ते तुमचेच आहेत हो. ते पुढील रविवारी येतील आणि माणकूला पाटी आणणार आहेत.'' ''आणि मला, आणि मला-,'' असे ती ओरडू लागली. ''तुम्हांस खाऊ, बरे का? जा आता खेळावयास, मला काम आहे.'' मुले सुंदर पोशाख करून बाहेर आली. त्यांस आज राजाप्रमाणे वाटत होते.
स्वाभिमानी माणसास दुस-याने आपली कीव करावी ही गोष्ट कधी आवडत नाही. लिलीसही आपण गरीब म्हणून रतनने येऊन ही सहानुभूती दाखवावी हे प्रथम आवडले नाही. परंतु रतनचे व आपले बालपणाचे संबंध तिला आठवले. लहानपणी आपण रतनची बायको होणार हे त्यास कसेसेच वाटे. त्याची भयंकर निराशा, आईबापांचे मरण या सर्व गोष्टींनी रतनच्या मनास किती कष्ट होत असतील हे तिला समजून ती रतनला नाही म्हणून शकली नाही. याच वेळेस किसनचे विचार येऊन तिचे मन पुन्हा भरून आले. आज सणाचा दिवस-आज ते कोठे असतील? एखाद्या दूर अनोळखी देशात, किंवा क्रूर समुद्राच्या भेसूर लाटांवर-का कोठे?
रतन दर रविवारी येई. मुलांस जवळ घेई. तो आता मुलांच्या ओळखीचा झाला होता. खाऊ देणा-यांची मुलांजवळ लौकर ओळख जमते. त्या मुलांस घेऊन तो समुद्रावर फिरावयास जाई. त्या टेकडीवर तो मुलांबरोबर पळत सुटे व अडखळला म्हणजे मुले हसत. ''मला हसता का रे गुलामांनो? पण मी लहान होतो तेव्हा तुमच्याहून जास्त पळत असे, आणि किसन तर-'' इतक्यात त्याने ओठ चावला. किसनच्या चपळाईची त्यास आठवण झाली, पण मुलांसमोर तो काही बोलला नाही. माणकू आता शाळेत जात असे. त्याला पाटील-पेन्सिल आणली होती. पाटी-पेन्सिलीचे हे सौभाग्य पाहून त्याला वाटे आपण केवढे मोठे झालो. रतन रविवारी आला म्हणजे माणकू म्हणे, ''दाखवू मी काढून 'गवताचा ग,' 'मगराचा म'-मला कितीतरी येते लिहावयास.''
किसनला जाऊन थोडेथोडके नाही, सहा वर्षांवर दिवस झाले. ना बोटभर पत्र, ना निरोप! समुद्राच्या लाटा व समुद्रावरचा वारा यांनीसुध्दा काही निरोप आणला नाही. किसनची काय बरे दशा झाली होती? किसन व्यापार करून संपत्ती घेऊन परत येत होता. परंतु दैव प्रतिकूल त्याला कोण काय करणार? आपण घरी जाऊन लिलीच्यापुढे हे द्रव्य ओतू व तिला सुखाच्या सागरात डुंबत ठेवू हे त्याच्या मनातले सुखमय विचार-पण क्रूर विधात्याला लोकांचे मनोरथ धुडकावून लावण्यात, चढणा-यास धुळीत मिळविण्यात आनंद वाटतो. किसनचे गलबत वादळात सापडले. सोसाटयाचा वारा व पर्वतप्राय लाटा आपले काळेकभिन्न जबडे पसरून खदखदा विकट हास्य करीत. त्या भीषण लाटा त्या गलबतास गिळंकृत करण्यास चौफेर धावून येत. गलबत वा-याने भडकले, खडकावर आपटले.
किसन पोहणारा पटाईत, समुद्राच्या लाटांशी तो दोन हात करीत होता. फुटलेल्या गलबताची त्याला एक फळी सापडली. तिच्या आधाराने तो किना-यास लागला. ओलाचिंब असा किसन किना-यावर आला. थंडीने तो काकडला; भुकेने कासावीस झाला. शेजारी लोक आहेत नाही हे पाहण्यास तो चालू लागला. किना-यापासून जवळच एक गाव होते. तेथील भाषा त्यास येत नव्हती; परंतु लोकांनी त्यास कपडेलत्ते दिले; खाण्यास अन्न दिले.