सत्य केव्हा तरी बाहेर येतेच 2
त्या वेळच्या कायद्याप्रमाणे त्या मुलीला गुन्हेगार ठरवून तिला फाशीची शिक्षा देण्यात आली. त्या निरपराध पोरीला फासावर मरण आले !
तिचा पवित्र आत्मा परमेश्वराजवळ जाऊन राहिला. त्या मुलीची प्रामाणिकता आंधळया जगास पटवून द्यावी असे परमेश्वराच्या मनात आले. एक भले मोठे प्रचंड वादळ उठले! पर्वतासही उडवील असा झंझावत सुटला; विजा चमचम चमकू लागल्या. प्रचंड मेघगर्जना होऊन विश्वाचे कान बधिर झाले! तो पाहा मुसळधार पाऊस पडू लागला. आजच प्रलय ओढवला असे भासले.
कडाड् कडाड-अरे बापरे, केवढा आवाज! तो पाहा विजेचा लोळ त्या पुतळयावर आदळला, पुतळा कोसळला! न्यायदेवतेच्या हातातील तो तराजू छिन्नभिन्न होऊन खाली पडला; त्यातील पाखरांची घरटी खाली कोलमडून पडली, आणि काय आश्चर्य! त्या एका पाखराच्या घरटयातून तो पाहा मोत्यांचा हार एकदम खळकन खाली पडला! पाखराने तो हार केव्हातरी चोचीत धरून नेला असावा व घरटयात ठेवून दिला असावा. पण त्याबद्दल त्या पोरीला फाशी जावे लागले.
त्या मुलीची निर्दोषिता जगास पटली, पण आता काय उपयोग? उपयोग नाही असे म्हणू नका. उपयोग हा की, सत्य हे बाहेर येते. सत्य लपत नाही - आज ना उद्या एवढाच प्रश्न.