Get it on Google Play
Download on the App Store

गुणांचा गौरव 3

प्रदर्शन उघडण्यात आले. तेथे नाना प्रकारची सुंदर कामे होती. तेथे मनोहर पुतळे होते; नक्षीकामे होती. मोठमोठया कलाविदांनी तयार केलेले उत्कृष्ट नमुने तेथे हारीने मांडलेले होते. परंतु त्या सर्व वस्तूंत एक मूर्तिसंघ अलौकिक ठरला; सर्वोत्कृष्ट ठरला. प्रत्यक्ष अपोला देवतेनेच तो घडवला असे सर्वांस वाटू लागले. त्या मूर्ती जिवंत होत्या; त्यांचे ओठ बोलत आहेत, मानेच्या शिरा उडत आहेत असे वाटत होते. त्या मूर्तिसंघाची सर्वांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. शिल्पज्ञांचा राजा जो फिडियस याने मोकळया व असूयारहित वृत्तीने सांगितले, ''हे काम दैवी आहे, मनुष्याच्या हातून काम होणे कठीण.''

त्या पुतळयास, त्या मूर्तिसंघास बक्षीस देण्याचे ठरले. परंतु कोणा अभिनव शिल्पकाराची ही उत्कृष्ट कृती? कोणाच्या हातांनी ही दैवी स्वर्गीय सौंदर्याची कृती घडली गेली? भालदार चोपदारांनी पुन्हा पुन्हा पुकारा केला, परंतु शिल्पकार पुढे येईना व कोणास माहिती दिसेना, सर्व लोक अधीर झाले. ''हे काम एखाद्या गुलामाचे तर नसेल?'' असा पेरिक्लीसने प्रश्न केला.

इतक्यात एका सुंदर मुलीला लोक ओढीत आणीत होते. सर्वांचे लक्ष तिकडे गेले. तिचे केस विस्कळीत झाले होते; परंतु लोकांचे लक्ष तिच्या करुण स्थितीकडे नव्हते. त्या मुलीस अध्यक्षांसमोर आणून उभे करण्यात आले. सर्वांचे डोळे तिच्याकडे लागले. ती काय बोलते, काय प्रकरण आहे याबद्दल उत्कंठा वाढत होती. सर्व प्रेक्षकसागर हेलावत होता, गर्दीमुळे पुढेमागे होत होता. सरकारी अधिकारी ओरडून म्हणाला, ''या मुलीस त्या शिल्पकाराचे नाव माहीत आहे; परंतु ही हट्टी, उर्मट पोर ते सांगत नाही.''

पेरिक्लीसने परोपरीने त्या मुलीस प्रेमळपणाने, धमकीने विचारले. परंतु ती मुलगी स्तब्ध राहिली. ती शिल्पकाराचे नाव सांगेना. तिच्या डोळयांत अढळ व अभंग निश्चय होता. मरणाची बेपर्वाई तिच्या चेह-यावर दिसत होती. ती पण एका पुतळयाप्रमाणे स्तब्ध उभी आहे हे पाहून पेरिक्लीस संतापला व म्हणाला, ''कायदा कठोर आहे. कायद्याप्रमाणे मला वागले पाहिजे. या मुलीला कारागृहात घेऊन जा. तिला हातकडया अडकवा.''

पेरिक्लीसचा हुकूम. अधिकारी क्लिऑनला तुरुंगात घालण्यासाठी ओढीत नेणारा तोच, तो पाहा एक तरुण गर्दीतून पुढे आला. त्याचा देह कृश झाला होता; परंतु त्याचे ते डोळे पाहा-त्या डोळयांत सर्व सौंदर्यदेवताच अवतरल्या आहेत असे वाटत होते! किती तेजस्वी, सुंदर ते दोन डोळे! तो तरुण पुढे आला व म्हणाला, ''महाराज, या निरपराध मुलीस क्षमा करा; तिचा अपराध नाही. ती माझी प्रेमळ बहीण आहे; खरा अपराधी मी आहे; या मूर्ती ज्या हातांनी घडविल्या, ते हे माझे हात-हे गुलामाचे हात आहेत!''


अमोल गोष्टी

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
गुणांचा गौरव 1 गुणांचा गौरव 2 गुणांचा गौरव 3 गुणांचा गौरव 4 राजा शुद्धमती 1 राजा शुद्धमती 2 राजा शुद्धमती 3 राजा शुद्धमती 4 मातेची आशा 1 मातेची आशा 2 किसन 1 किसन 2 किसन 3 किसन 4 किसन 5 किसन 6 किसन 7 स्वतंत्रतादेवीची कहाणी 1 स्वतंत्रतादेवीची कहाणी 2 स्वतंत्रतादेवीची कहाणी 3 स्वतंत्रतादेवीची कहाणी 4 स्वतंत्रतादेवीची कहाणी 5 स्वतंत्रतादेवीची कहाणी 6 अब्बूखाँकी बकरी 1 अब्बूखाँकी बकरी 2 अब्बूखाँकी बकरी 3 अब्बूखाँकी बकरी 4 अब्बूखाँकी बकरी 5 आई, मी तुला आवडेन का? 1 आई, मी तुला आवडेन का? 2 आई, मी तुला आवडेन का? 3 राम-रहीम 1 राम-रहीम 2 राम-रहीम 3 राम-रहीम 4 राम-रहीम 5 राम-रहीम 6 राम-रहीम 7 राम-रहीम 8 समाजाचे प्राण 1 समाजाचे प्राण 2 तरी आईच! 1 खरा सुगंध 1 सत्य केव्हा तरी बाहेर येतेच 1 सत्य केव्हा तरी बाहेर येतेच 2 बुद्ध आणि बेटा 1 'मुलांनो, सावध!' 1 पहिले पुस्तक 1 योग्य इलाज 1 चित्रकार टॅव्हर्निअर 1 मरीआईची कहाणी 1 मरीआईची कहाणी 2 कृतज्ञता 1 श्रेष्ठ बळ 1 चतुर राजा 1 सभाधीटपणा 1