राजा शुद्धमती 3
पार्वतीची समजूत घालून मृत्युंजयाची स्वारी मर्त्यलोकी येण्यास निघाली. शंकरांनी एका कुश्चळ अंध अतिथीचा वेष धारण केला आणि काठी टेकीत टेकीत व रस्ता विचारीत राजाच्या भिक्षागृहाजवळ ते पोचले.
अंध ब्राह्मणास राजाने हात धरून सिंहासनावर बसविले, मग हात जोडून राजा म्हणाला, ''भगवान, किमर्थ येणे झाले? आपली काय वांछा आहे कृपा करून सांगावी. आपले मनोरथ पूर्ण करण्याचे भाग्य मला लाभेल का?''
अंध ब्राह्मण राजास म्हणाला, ''हे थोर कीर्तिमान राजा, या विस्तीर्ण पृथ्वीतलावर असे एकही स्थळ नाही, की जेथे तुझ्या थोर सदय अंत:करणाची कीर्ती पसरलेली नाही. राजा, सांगू नये पण सांगतो; मागू नये पण मागतो. मी तरी काय करू? गरजवंतास अक्कल नसते. राजा, मी आंधळा आहे, या पृथ्वीवरचे व वरील गगनातील ईश्वराने निर्माण केलेले सौंदर्य मी कधी पाहिले नाही. नद्या, झरे, उत्तुंग पर्वत, रमणीय वनराजी, चंद्रसूर्य, नील नभाचा चांदवा, त्यातील लक्षावधी लुकलुकणारे तारे-या सर्वांचे वर्णन मी कानांनी ऐकतो, पण दृष्टीने पाहण्याचे भाग्य माझ्या नशिबी नाही. राजा मी आंधळा आहे. तू आज या विश्वाची सौंदर्यशोभा पाहण्याची संधी मला देशील काय? राजा, तू आपला एक डोळा मला दे, म्हणजे आपले दोघांचेही काम होईल.''
आपल्या मनात सकाळी जे विचार आले, त्याची परिपूर्णता इतक्या लवकर होईल असे राजाला वाटले नव्हते. राजास फार आनंद झाला. अंत:करणात झालेला आनंद बाहेर व्यक्त न करता राजा म्हणाला, ''हे विप्रवरा, तुम्हाला या भिक्षागृहात मजकडे येण्यास कोणी सांगितले? मनुष्याजवळ जी अत्यंत मौल्यवान वस्तू आहे तीच तर तुम्ही मजजवळ मागत आहात; परंतु हे पाहा, ती वस्तू देणे कठीण आहे असे नाही तुम्हांस वाटत?''
त्या अंध ब्राह्मणाने उत्तर दिले, ''स्वप्नात परमेश्वराने येऊन तुजकडे येण्यास मला सांगितले, म्हणून मी आलो; तू देत नसशील व तुला कष्ट वाटत असतील तर मी आल्या वाटेने परत जातो.''
राजा म्हणाला, ''आपली विनंत मी आनंदाने मान्य करतो. आपण एकच डोळा मागता, परंतु मी दोन्हीही देण्यास तयार आहे.''
राजा अंध ब्राह्मणास आपले सुंदर डोळे काढून देणार ही वार्ता सर्व नगरात लौकरच पसरली. राजाला या वेडया निश्चयापासून परावृत्त करावे या हेतूने सेनापती व दुसरे अधिकारी राजाकडे आले. हजारो नगरवासी तेथे जमा झाले. ते राजास म्हणाले, ''महाराज, कोणत्याही गोष्टीस मर्यादा असते. औदर्यासही काही सीमा आहे. द्रव्य, रत्ने, माणिकमोत्यांच्या राशी, भरजरी वस्त्रांनी व मौल्यवान अलंकारांनी शृंगारलेले हत्ती, वायुवेगाचे वारू, हे सर्व काही ब्राह्मणास द्या पाहिजे तर; परंतु आपण आपले हे सुंदर कमलसम डोळे देता हे काय? महाराज, हा थोडा अविचार नाही का होत?''