७७ दिव्य दृष्टी
कांही वर्षांपूर्वी मी गंगाद्वारला गेलो होतो.गोदावरी मातेला दक्षिण गंगा असे म्हणतात.ब्रह्मगिरीच्या डोंगरावर पश्चिम बाजूला गोदावरीचा उगम होतो.तिथे ती गुप्त होते.त्यानंतर पूर्व बाजूला ती प्रगट होते.पुढे निरनिराळ्या कुंडात ती प्रगट होते.त्यानंतर कुशावर्त तीर्थ,त्र्यंबकेश्वर व पुढे तिला नदीचे रूप प्राप्त होते.
नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर क्षेत्री ब्रह्मगिरी डोंगरामधून पूर्व बाजूला गोदावरी जिथे खडकातून प्रगट होते त्याला गंगाद्वार असे म्हणतात
मातेचे दर्शन घेतल्यावर तीर्थ घेतल्यावर मी त्या डोंगराला असलेल्या एका पायवाटेवरून चालत जात होतो.चालत जात असताना मला ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ त्यांची भावंडे आणि आईवडील यांची आठवण झाली.तेही प्रदक्षिणा घालीत असताना अकस्मात एक वाघ समोर आला.त्यामुळे घाबरून सर्वांची चारही दिशांनी धावाधाव पळापळ झाली.त्यामध्ये निवृत्तिनाथ एका गुहेमध्ये शिरले.अर्थात त्यावेळी ते नुसते निवृत्ती होते.गुहेतून बाहेर पडले तेव्हा ते निवृत्तीनाथ झाले.
गुहेमध्ये नाथपंथीय गैनीनाथ तपश्चर्या करीत बसले होते.त्यांच्या पायाजवळ आधाराने निवृत्ती बसले होते.गैनीनाथ समाधीवस्थेतून जागृतावस्थेत आले.त्यांनी निवृत्तीना अभय दिले. अनुग्रह दिला.
ब्रह्मगिरीचा डोंगर डाव्या बाजूला ठेवून पायवाटेवरून प्रवास करीत असताना मला या कथेची आठवण झाली.एवढ्यात मला डाव्या बाजूला एक गुहा दिसली.मी त्या गुहेमध्ये शिरलो.प्रकाशातून एकदम कमी प्रकाशात आल्यामुळे मला कांही काळ कांहीच दिसत नव्हते.नंतर हळूहळू मला गुहेतील अंतर्भाग दिसू लागला .तिथे एका चबुतऱ्यावर एक जटाधारी पुरुष बसलेले होते.ते अर्धोन्मलीत नेत्रानी माझ्याकडे पाहात होते.
त्यांच्या दर्शनाने, त्यांच्याबद्दल आदरभाव माझ्या मनात निर्माण झाला.मी त्यांना साष्टांग प्रणिपात केला.
बाबा :तुला काय पाहिजे,
मी : कांहीही उद्देशाने मी आलेला नाही.कोणत्याही उद्देशाने मी नमस्कार केला नाही.
बाबा :तरीही मला तुला कांहीतरी द्यावे असे वाटते.
मी :तुम्हाला काय हवे ते द्या.
बाबा :तुला दिव्यदृष्टी द्यावी असा माझा विचार आहे.
मी :दिव्य दृष्टीचा कोणता प्रकार आपण देणार आहात?
बाबा :मी समजलो नाही. दिव्यदृष्टी म्हणजे दिव्यदृष्टी, तुला दिव्य दृष्टीचे कोणते प्रकार आहेत असे वाटते?
मी :मला दिव्य दृष्टीचे पुढील प्रकार संभवतात असे वाटते.
१)समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चालले आहे ते जाणण्याची शक्ती.मनकवडा.पर-मन-दर्शी
२)वर्तमान काळात कुठे काय घडत आहे ते जाणण्याची शक्ती. वर्तमान-दर्शी
३)एखाद्या व्यक्तीच्या, समूहाच्या, राष्ट्राच्या किंवा जगाच्या भविष्यकालात काय होणार आहे ते जाण्याची शक्ती.भविष्य-दर्शी
४)एखाद्या व्यक्तीच्या, समूहाच्या, राष्ट्राच्या किंवा जगाच्या, भूतकाळात काय घडले ते जाणण्याची शक्ती. भूत-दर्शी.
५) भूत वर्तमान भविष्य जाणण्याची शक्ती.त्रिकाल-दर्शी
६)अपारदर्शक पडदा असताना,भिंत, तिजोरी, त्याच्या पलीकडे काय आहे ते जाणण्याची शक्ती. अार-पार-दर्शी
७)स्वतःच्या मनाच्या अंतर्भागात प्रगट मनात व सुप्त मनात काय काय दडलेले आहे ते जाणण्याची शक्ती. स्व-मन-दर्शी
८) वरील सर्व एकाचवेळी जाणण्याची शक्ती.सर्व-दर्शी
कदाचित यापेक्षाही एखादी वेगळी दिव्य दृष्टी असू शकेल
बाबा : तुला कोणती दृष्टी असणे आवडेल?
मी :तुम्हाला मी अगोदरच सांगितले आहे की मी कोणत्याही हेतूने येथे आलेला नाही.माझी क्रिया निर्हेतूक आहे.वाटेवरून चालता चालता मला गुहा दिसली.सहज आत डोकवावे असे वाटले.मी आंत आलो. तुम्ही दिसलात.मला तुम्हाला नमस्कार करावा असे वाटले मी नमस्कार केला.
बाबा :मी तुला दिव्यदृष्टी दिली तर तू त्याचे काय करशील?
मी : ते मी आता सांगू शकणार नाही.या जगात स्थिर असे कांही नसते.सर्व गतिमान असते.माझा आजचा विचार उद्या टिकेलच असेही नाही.परिस्थितीनुसार,बाह्य़ आघातानुसार विचार बदलतात.सतत बदल गतिमानता हे तर या सृष्टीचे वैशिष्टय़ आहे.
बाबा :ठीक आहे तू म्हणतोस ते सत्य आहे.परंतु तुला आता दृष्टी मिळाली तर आत्ता तू काय करशील ते तर सांगू शकतोस.
मी :अवश्य
बाबा :मी तुला कोणती दृष्टी देणार आहे ते नंतर सांगतो.त्यापूर्वी मला तुझ्याकडून एक हमी पाहिजे.
मी :कोणती?
बाबा :दिलेल्या शक्तीचा तू चांगल्या कामासाठी उपयोग करशील.
मी:चांगले आणि वाईट हे ठरवणार कोण?
या जगात चांगले किंवा वाईट असे कांही असते का याबद्दल मला संशय आहे.
धारणेनुसार, मनावरील संस्कार संग्रहानुसार एकाला जे चांगले वाटते ते दुसऱ्याला वाटत नाही.
एका ठिकाणी एका समाजात जे चांगले समजले जाते ते दुसऱ्या समाजात समजले जाईलच असे नाही.
एका प्रदेशात एका कालखंडात जे चांगले समजले जाते ते त्याच प्रदेशात दुसऱ्या कालखंडात समजले जाईलच असे नाही.
अफगाणिस्तान पाकिस्तान या ठिकाणी पूर्वी हिंदू समाज होता.त्यांच्या कांही चालीरीती पध्दती होत्या.त्या त्यांना चांगल्या वाटत होत्या.
मुस्लीम धर्म आल्यावर वेगळ्या पद्धती रीती आल्या.प्रतिमा पूजा योग्य समजली जात होती. आता समजली जात नाही.
पाश्चात्त्य समाजात स्त्री पुरुष समानता आहे .एकूण पौर्वात्य समाजात ती नाही.
संयुक्त कुटुंब पद्धती एकेकाळी चांगली योग्य समजली जात असे.हल्ली विभक्त कुटुंबपद्धतीचे प्रमाण वाढताना आढळून येते.कदाचित हळूहळू तेच योग्य असे समजले जाईल.किंबहुना तसे समजून घ्यायला हळूहळू सुरुवातही झाली आहे.
बुरखा योग्य की अयोग्य,मुस्लीम तलाक पद्धती योग्य की अयोग्य,स्त्री स्वातंत्र्य योग्य की अयोग्य,सक्तीने धर्मांतर योग्य की अयोग्य,कोणता धर्म श्रेष्ठ व कोणता कनिष्ठ,सर्वत्र मतांतरे आहेत.मतभिन्नता होती आहे आणि असेल.
समाजाच्या निरनिराळय़ा कालखंडात बहुपत्नीत्व, बहुपतीत्व, विवाहा शिवाय स्त्री पुरुष संबंध, याबद्दल निरनिराळ्या कल्पना आढळतात.
कोणीही मनुष्य स्वत:ला जे वाईट,अयोग्य, चूक वाटते ते करणार नाही.
आतंकवादी, दहशतवादी, यांना त्यांच्या मनोरचनेनुसार ते करतात ते योग्य वाटते.
खून केला तर फाशीची शिक्षा होते.युद्धभूमीवर दुसऱ्या राष्ट्राच्या सैनिकाचा वध केला तर त्यासाठी गौरव केला जातो.
व्यक्तीमध्ये बदल होतो त्यानुसार त्याच्याही योग्य अयोग्य, चांगले वाईट,हितकर अहितकर,स्वीकारार्ह व अस्वीकारार्ह, याबद्दलच्या कल्पना बदलत जातात.कायदे बदलतात.समाजाच्या ल.सा.वि. नुसार कायदे निर्माण होतात.कायद्यानुसार समाजातही हळूहळू बदल होतो.सर्व परिवर्तनीय आहे.सर्व परिवर्तनक्षम आहे.
ज्यावेळी चित्रसेन गंधर्वाने कौरवांशी युद्ध करून त्यांना बंदिवान केले तेव्हा महाभारतात धर्मराज म्हणतात,आम्ही पांच(पांडव) व तुम्ही शंभर(कौरव),परंतु बाहेरील कुणी असेल तर आपण एकशेपाच.ही दृष्टी कुटुंब,गाव,समाज राज्य,राष्ट्र,जग, अशा प्रत्येक ठिकाणी दिसून येते.ही स्व-विस्तार प्रक्रिया आहे.योग्य अयोग्य, चांगले वाईट, समर्थनीय असमर्थनीय, पारखण्याची हीही एक दृष्टी आहे.
दिव्य दृष्टी ही सापेक्ष आहे.निरपेक्ष असे जगात कांहीही नाही.सर्वसाधारण मानवाना जी शक्ती नाही,ती दिव्यदृष्टी अशी साधी सोपी आपली व्याख्या आहे.
या अफाट अनंत विश्वात एखादा किंवा अनेक ग्रह तारे असे असू शकतील कि तिथे वर वर्णन केलेल्या सर्व दृष्टी किंवा कांही दृष्टी,सर्वसाधारण जिवांना अवगत असतील.तिथे ती सामान्य दृष्टी असेल.असा समाज असेल अशी कल्पना करणेही कांही जणांना जड जाईल.
बाबा :मी तुला दृष्टी देण्याऐवजी तूच मला जगाकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली आहेस.
ही दृष्टी निरनिराळ्या लोकांना पटेलच असे नाही.ती गोष्ट त्यांच्या दृष्टीवर म्हणजेच मनोरचनेवर,संस्कार संग्रहावर, धारणेवर अवलंबून राहील.
शेवटी बाबांकडून कोणतीही दृष्टी न घेता मी गुहेतून बाहेर पडलो.
४/९/२०२१©प्रभाकर पटवर्धन