54 रिकामपणाची बडबड
हल्ली सर्वत्र अंतर्मुखतेपेक्षा बहिर्मुखता वाढलेली आढळून येते .मनुष्याला वेळ घालवण्यासाठी उपलब्ध असलेल्या साधनांची संख्या भरमसाठ वाढलेली आहे .टीव्हीचे अनेक चॅनेल्स त्यांमध्ये न्यूज चॅनेल्स वेगवेगळ्या सीरियल्स असंख्य वर्तमानपत्रे त्याशिवाय निरनिराळ्या राजकीय पुढाऱयांच्या मुलाखती व त्यांची भाषणे मोबाईल व त्यावरचे व्हॉट्सअॅप फेसबुक ट्विटर यासारखी अनेक अॅप्स ,इंटरनेट त्यात उपलब्ध असलेला खजिना व त्यावरचे मुक्त सर्चिंग अनेक खेळ व त्यावरच्या चर्चा यामुळे अनेक विषयांवरची अनेक मते कानावर सारखी आदळत असतात .मनुष्याला पूर्वीहीआपण ज्ञान संपन्न व माहितीपूर्ण आहो असे वाटत असे व आता तर प्रश्नच नाही.
राजकारण समाजकारण अर्थकारण कौटुंबिक प्रश्न इत्यादी प्रत्येक गोष्टीवर आपली मते अत्यंत ठामपणे मांडली जातात .वादाला सुरुवात होते. मी बरोबर दुसरा चूक असा एकूण अविर्भाव असतो .त्याचप्रमाणे मोदींनी काय केले पाहिजे राहुल कसा चुकीचा आहे किंवा याच्या उलट ट्रम्प ने काय केले पाहिजे अशा प्रकारच्या सल्ल्यांना व वादाना मी रिकामपणची बडबड असे म्हणत आहे .आपल्यालाच सर्व कळते आपणच ज्ञानसंपन्न आहोत अशा विश्वासामुळे आपली संवेदनशीलता हरवते. दुसरा काय म्हणत आहे हे आपण समजू शकत नाही.आपण बहिरे नसूनही बहिरे होतो. दुसऱ्याचे बोलणे आपल्या मनावर आदळते परंतु आपण आपल्याच मनातून निर्माण झालेल्या संवेदना अनुभवीत असतो अशा तर्हेच्या बडबडीमुळे वृत्तीमुळे दुसरा काय म्हणत आहे हे आपल्याला कधीच कळू शकत नाही .अश्या बडबडीमुळे सर्वत्र कोलाहल भरून राहिलेला आहे सर्वच इतरांना शहाणपण शिकवत आहेत असे वाटू लागते.
जर आपल्याला दुसऱ्याला समजून घ्यावयाचे असेल म्हणजेच खऱ्या अर्थाने ऐकावयाचे असेल तर प्रथम अापण स्वतःला समजून घेतले पाहिजे .आपण स्वतःला समजून घेतले नाही तर दुसऱ्याला आपण कधीच समजू शकणार नाही .यासाठी अंतर्मुख झाले पाहिजे दिवसातून काही वेळ स्वस्थ बसून मनाचे निरीक्षण साक्षीत्व केले पाहिजे .अश्या जागृतीतून मनाचे गूढ व्यापार कळू लागतील .दुसरा बोलत असताना आत तरंग कसे उठ तात व ते का उठतात हे कळू लागेल. आपल्या धारणेतून हे तरंग उठत आहेत असे लक्षात येईल .स्वाभाविक दुसरा बोलत असताना जागृततेमुळे आपली धारणा लक्षात येऊ लागेल .आपला दुसऱ्याच्या बोलण्याला विरोध किंवा संमती ,ठामपणे मते मांडणे इत्यादी गोष्टी थांबतील .रिकामपणच्या बडबडीमुळे ज्ञानसंपन्नता वाढते लोक जास्त शहाणे होतात असे मला वाटत नाही. आपली समज उलट कमी होते असे मला वाटते. सर्वत्र कोलाहल माजलेला आहे .कुणीच कुणाला खऱ्या अर्थाने समजून घेत नाही .प्रथम स्वतःला समजून घ्या म्हणजे जगालाही तुम्ही समजू शकाल.
२१/५/२०१८ ©प्रभाकर पटवर्धन