4 आनंदाची गुरुकिल्ली
दुःख दोन प्रकारचे असते एक शारीरिक दुसरे मानसिक .शारीरिक दु:ख उपलब्ध आर्थिक परिस्थिती व वैद्यकीय संशोधन यानुसार दूर करण्याचा प्रयत्न केला जातो .इथे आपण अर्थातच मानसिक दुःखाबद्दल विचार करणार आहोत .हे दुःख संबंधमयतेतून निर्माण होते.उदाहरणार्थ आईवडील मुलांबद्दल त्यांचे शिक्षण यश आर्थिक उत्कर्ष याबद्दल काही अपेक्षा स्वाभाविकपणे बाळगतात.जर त्या पूर्ण झाल्या नाहीत तर दुःख निर्माण होते . मुले म्हातारपणी आपली काळजी घेतील अशी खात्री वाटत असते .आपल्या कल्पनेनुसार जर त्यांचे वर्तन नसेल तरीही दुःख निर्माण होते .मुलांच्याही आई वडिलांबद्दल काही अपेक्षा असतात उदाहरणार्थ त्यांनी आपल्याला पॉकेट मनी किती द्यावा आपल्याला स्कूटर मोटार सायकल उंची मोबाईल कपडे वगैरे घेऊन द्यावे जर त्यांच्या अपेक्षेप्रमाणे आई वडिलांकडून वस्तू कपडे इ.दिले गेले नाहीत तरीही दुःख होते .पतीच्या पत्नीकडून ,पत्नीच्या पतीकडून , मित्रांकडून किंवा मैत्रिणीकडून ऑफिसातील किंवा कारखान्यातील सहकाऱ्यांकडून किंवा वरिष्ठांकडून त्याच प्रमाणे कनिष्ठाकडून किंवा भागीदारांकडून स्वाभाविकपणे विशिष्ट अपेक्षा असतात .जिथे जिथे व्यक्तीचे इतरांशी संबंध येतात त्या त्या ठिकाणी परस्परांकडून काही ना काही अपेक्षा निर्माण होतात व जर त्या पूर्ण झाल्या नाही तर दुःख निर्मिती होते .या दुःखाची तीव्रता अपेक्षेच्या तीव्रतेनुसार कमी जास्त असते .
मी केंद्रस्थानी असतो मी आणि माझे दुःख असा विचार असतो .मी हे दुःख सहन करीत आहे हे दुःख दूर करण्यासाठी मी काय करू असा विचार सुरू होतो .मग कुणी सांगतो अमके तमके बाबा आहेत ते सर्व दुःख परिहार करतात .मग आपण त्यांच्याकडे धाव घेतो .कुणी सांगतो सत्यनारायण कर कुणी सांगतो पोथी वाच.कुणी म्हणतो इतका इतका अमक्या तमक्याचा जपकर म्हणजे दुःख परिहार होईल .कुणी म्हणतो अमक्या तमक्याला नवस कर आणि नवस केला जातो .कुणी अमक्यातमक्या देवस्थानला जा यज्ञयाग कर मला असा अनुभव आला वगैरे सांगतो आणि आपण ते करण्याला उद्युक्त होतो .धर्मानुसार संस्कारानुसार गुरुद्वारा चर्च मस्जिद पीर बाबा वगैरे ठिकाणीही जाण्याचा सल्ला दिला जातो . जो तो आपल्या धारणेनुसार उपाय सुचवितो व आपण आपल्या धारणेनुसार त्या त्या उपायांचा अवलंब करतो .एका उपायाने मन: शांती मिळाली नाही तर दुसरा उपाय नंतर तिसरा उपाय असे चक्र चालू राहते .केव्हा केव्हा दुःख परिहार झाल्यासारखे वाटते आणि नंतर पुन्हा दुसरे दुःख उफाळून येते.एखादा मित्र पत्ते दारू वाचन भटकंती किंवा आणखी काही यांमध्ये मन रमवण्याचा प्रयत्न करतो .थोडक्यात दुःख का निर्माण झाले त्याच्या मुळाशी जाण्यापेक्षा त्यावर काही ना काही मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला जातो. तुझे आहे तुजपाशी परंतु तू जागा चुकलाशी या उक्तीप्रमाणे दुःखाचे मूळ स्वतः जवळ आहे अाणी त्याचा विचार करण्यापेक्षा इतर उपाय योजले जातात.
एखाद्या गोष्टीचे स्वरूप जर आपल्याला समजून घ्यावयाचे असेल तर त्यापासून दूर पळून जाऊन ते समजणे शक्य नाही त्या ठिकाणी आपण राहिले पाहिजे जेव्हा अापण त्यातच असू तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला त्याची समज व उकल होईल .मी म्हणजेच संबंधमयता मी म्हणजेच अपेक्षा व त्या अपेक्षांचा भंग आणि दुःख म्हणजेही मीच असे लक्षात येऊ लागेल. भावनांना आपण चिठ्ठी लावतो त्यांना आपण लेबल लावतो भावनांचे शब्दीकरण केल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही .शब्दीकरणातून आपल्याला व दुसऱ्याना भावना कळल्या असे वाटते परंतु तोही एक भास असतो असे मला वाटते .भावनांचे शब्दीकरण न करता त्या त्या भावना राग लोभ मोह प्रेम मत्सर इत्यादी अनुभवता आल्या पाहिजेत .अशा अनुभवातून त्या भावना दुःख क्लेश वगैरे आपोआप विरघळेल.