57 शांततेचे महत्त्व (आजोबा व त्यांचा नातू )
आजोबा व आजी आपल्या गावी राहात असत .मुले व मुली शिकल्या मोठ्या झाल्या त्यांची लग्ने झाली ती सर्व आपापल्या नोकरीच्या ठिकाणी राहात असत .आजोबांचे शेत होते .नोकरांच्या साह्याने ते शेती करत .त्यांचे नातू व नाती सुट्टीमध्ये गावाला येत असत .जसे जमेल तसे मुले मुली येत .आजोबा आजींना मुले मुली सुना नातू नाती आल्या की खूप आनंद वाटे.
दिवाळीच्या सुट्टीमध्ये असेच सर्व गावाला आले होते. दिवाळीच्या सुटीतच त्यांच्या एका नातवाचा वाढदिवस येत होता.आजोबा मुलांबरोबर मूल होऊन वाढदिवसाची तयारी मोठ्या थाटात करीत होते .नेहमी अडगळीच्या खोलीत असणारे सामान या निमित्ताने त्यांनी बाहेर काढले होते.तरीही बरेच सामान खोलीत होते .त्याच खोलीत एका बाजूला गवताच्या पेंढ्याही रचून ठेवलेल्या होत्या.अडगळीच्या खोलीत नावाप्रमाणे बरीच अडगळ होती.
कामांच्या गर्दीत हातावरचे घड्याळ केव्हातरी कुठेतरी पडून गेले .आजोबांच्या ते लक्षात आले नाही .आजोबांच्या पंचाहत्तरीला आजीने त्यांना ते भेट म्हणून दिले होते .ते घडय़ाळ बहुधा अडगळीच्या खोलीत पडले असावे असा सगळ्यांचाच कयास होता .
दुसर्या दिवशी सकाळी आजोबांना आपले घड्याळ हरवल्याचे आढळून आले.ते घड्याळ आजीने दिलेले असल्यामुळे शिवाय त्यांना ते लकी आहे असे वाटत असल्यामुळे ते फार दुःखी झाले.घड्याळ शोधून काढण्यासाठी त्यांनी एक मोहिम काढली .त्यांना घडय़ाळ काही सापडले नाही .मुलांना नातवांना आजोबा काय शोधीत आहेत ते कळत नव्हते .त्यांच्या हातावर घड्याळ नाही हे कुणाच्याच लक्षात आले नव्हते .
शेवटी एका नातवाने त्यांना आजोबा तुम्ही काय शोधीत आहात म्हणून विचारले.त्यांनी माझे आजीने प्रेझेंट दिलेले आवडते लकी घड्याळ हरवले आहे म्हणून सांगितले .मग सर्वच नातवंडे जिकडे तिकडे घरात घड्याळ शोधू लागली .घड्याळ कुठेही सापडले नाही .अडगळीच्या खोलीत घड्याळ असेल असे वाटले होते परंतु तिथेही ते सापडले नाही .
शेवटी एका नातवाने सर्वांना अडगळीच्या खोलीबाहेर जाण्यास सांगितले .सर्वांनी कां कां म्हणून कल्ला केला .तो नंतर सांगतो म्हणाला .सर्वांना शांतता राखण्यास त्याने सांगितले. खोलीत स्तब्ध बसून श्वास रोखून तो नीट ऐकू लागला .थोड्याच वेळात त्याला घडाळ्याची टिकटिक ऐकू आली .लगेच त्याने जिथे घड्याळ होते तिथून उचलले.
आजोबांना त्यांचे आवडते घड्याळ परत मिळाल्यामुळे अत्यानंद झाला त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले .
*********************************
शांतता ही सर्वत्र उपयुक्त महत्त्वाची आहे .अभ्यास वाचन लेखन चिंतन मनन भजन पूजन सर्वत्र शांतता महत्त्वाची आहे.मन एकाग्र होण्याला व मन जिथे एकाग्र झाले असेल ते टीपकागदाप्रमाणे टिपून घेण्याला शांतता आवश्यक आहे . केवळ घडय़ाळाची टिक टिक ऐकण्यासाठीच नव्हे तर आपल्या मनात काय चालले आहे ते जाणून घेण्यासाठीही आवश्यक आहे .आपण नेहमीच बाह्यवर्ती असतो . प्रत्येकाची समस्या आपला वेळ कसा घालवावा ही असते. आपल्याला आपली भाकरी मिळवण्यासाठी काही वेळ निश्चित खर्च करावा लागतो .ते अपरिहार्य आहे .काही वेळ भाकरी खाण्यासाठी खर्च करावा लागतो .बाजारातून जिन्नस आणणे भाजीबाजारातून भाजी आणणे इत्यादीसाठी म्हणजेच भाकरी मिळविण्यासाठी खर्च करावा लागतो . उरलेला वेळ आपण मोबाइल टीव्ही रेडिओ म्युझिक सिस्टीम मित्र आपण सदस्य असलेल्या असंख्य संघटना यामध्ये खर्च करीत असतो .वेळ पुरत नाही मला माझा म्हणून वेळ पाहिजे अशीही वरती तक्रार करीत असतो .
जर आपण आत्मपरीक्षण केले तर आपल्याला असे निश्चित आढळून येईल की अनेक संघटनांचे सदस्यत्व ही केवळ सबब असते .बराचसा वेळ आपण वेळ घालवण्याची युक्ती (निरनिराळ्या संघटनांचे सदस्यत्व )म्हणून वापरीत असतो.रिकाम्या वेळाचे काय करावे ही आपली प्रमुख समस्या असते.
आपण रिकामा वेळ वाचन चिंतन मनन भजन पूजन कीर्तन इत्यादी अनेक तथाकथित धार्मिक आणि तथाकथित मन उन्नतीसाठी आवश्यक अशा गोष्टींमध्ये घालवीत असतो .
म्हणजेच आपण बाह्यवर्ती जसे आपल्याला सतत गुंतवून ठेवीत असतो त्याचप्रमाणे अंतरवर्तीही स्वतःला गुंतवून ठेवीत असतो .
आपण जरा रिकामे असलो की काहीतरी करीत राहावे असे वाटत असते .आणि त्याप्रमाणे अापण काहीतरी करीत असतो .जेव्हा आपण स्वस्थ असतो म्हणजेच बाहेर काहीही करीत नसतो त्या वेळीही मनात असंख्य वेडेवाकडे विचार तरंग उठत असतात .काही विचार तरंगांना सूत्र असते तर काही विचार तरंग विस्कळीत असतात.अापण बाह्यवर्ती वेळ घालवीत असतानाही अंतरंगात मनाची बर्याच वेळा सतत हालचाल चालू असते.
मला शांतता म्हणजे बाहेर आणि आत शांतता काहीही न करणे अशी स्थिती अभिप्रेत आहे.अशी स्थिती प्राप्त होणे बिकट आहे. योगी व्यक्तीला ती शक्य आहे.अापण योगी होऊ शकतो हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे .
एकदा ही गोष्ट लक्षात आली म्हणजे मन आपोआपच ती लक्षात ठेवते .जागृतता आहे नाही आहे नाही अशी स्थिती प्राप्त होते.मन कुठे तरी प्रवाही झाल्यावर मनाचाच एक भाग त्यांच्यावर आसूड ओढून त्याला शांत करतो .
मन म्हणजेच विचारतरंग, मन म्हणजेच हालचाल, जर तरंग नसतील हालचाल नसेल तर मन नसेल .जर आपण शांत राहिलो तरच आपल्याला आपल्या मनाची हालचाल कळू शकेल.त्याच वेळी मन कार्य कसे करत आहे ,मन स्वसंरक्षणासाठी काय काय युक्त्या योजते ,ते सर्व लक्षात येईल .
मनाचाच एक भाग मनापासून वेगळा होउन मनावर लक्ष ठेवीत असेल .यालाच साक्षीत्व असे म्हटले जाते .साक्षित्व म्हणजे सतत जागृतता.सतत सावधानता .ही जागृतता निवड रहित असते .म्हणजेच मन अस्तीपक्षी किंवा नास्तिपक्षी जे काही चालले आहे त्यात भाग घेत नाही यातूनच मन केव्हा तरी निस्तरंग होईल असे सांगता येईल. त्यावेळी काय होते ते ज्याचे मन शांत झाले आहे त्यालाच कळेल .ते शब्दाने वर्णन करता येणार नाही .
मला अभिप्रेत असलेली शांतता व त्याचे महत्त्व असे आहे .