27 दृष्टिकोन - काका कालेलकर
काका कालेलकर उच्च कोटीचे चिंतक, लेखक होते. त्यांची विचारक्षमता प्रत्येक विषयात खोल आणि व्यापक होती. एकदा काका आजारी पडले. त्यांच्या आजारपणाची वार्ता प्रसिद्ध होताच अनेक मित्रमंडळी आणि शुभचिंतक त्यांना भेटायला आले. काका सर्वांशी मोठ्या आत्मीयतेने भेट देत असत. एके दिवशी काकांना भेटायला त्यांचे काही मित्र आले होते. चर्चेदरम्यान दुस-या एका मित्राचा फोन काकांना आला. त्याने काकांना विचारले,’’आपण आजारी असल्याचे मी ऐकले आहे, आता कसे वाटते आहे’’ काका म्हणाले,’’ होय, थोडा आजारी पडलो होते मात्र जेव्हापासून मी नव्याने तपासणी केली आहे तेव्हापासून मला बरे वाटायला लागले आहे’’ हे ऐकताच मित्राने नव्या तपासणीविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
तेव्हा काका म्हणाले,’’ मी आजाराबाबत विचार करणेच सोडून दिले आहे आणि हा पर्याय माझ्या आजारावर उपाय म्हणून सिद्ध झाला आहे. एखादा पाहुणा चांगला पाहुणचार केल्यामुळे जास्त दिवस मुक्काम करतो तेच त्याच्याशी उलटपक्षी वागले असता म्हणजेच घरातल्यांशी जसे वागतो, तशी साधी वागणूक मिळाली, विशेष पाहुणचार न मिळाल्यास तो अशा घराचा रस्ता धरतो जिथे चांगले आदरातिथ्य केले जाईल. आजाराबाबतीतही माझा हाच विचार आहे.’’ काकांच्या नव्या उपचार पद्धतीवर मित्रांसह सर्वच लोक सहमत झाले.
(संग्रहित )
मला सुचलेले काही विचार :
काकांनी जे सांगितले ते सर्वांनाच जमेल असे नाही, आणि समजले असे वाटले तरी ते समजेलच असे नाही ,असे मला वाटते .काकांचे बोलणे जे मला समजले ते वेगळ्या पद्धतीने थोड्या विस्ताराने मी मांडीत आहे .
आजाराची चिंता करण्याचे आपण थांबलो म्हणजे आजार नक्की बरा होईलच असे म्हणता येत नाहीं. चिंता झाली नाही तर आजार वाढण्याचा तरी संभव नाही आणि बराच कमी होण्याचा संभव आहे असे म्हणता येईल .कित्येक लोकांचा काळजी करण्याचा स्वभाव असतो ते कशाचीही काळजी करीत बसतात आणि त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर वाईट परिणाम होतो .प्रत्येक व्यक्ती केव्हाना केव्हा आणि कांहीना काही काळजी अपरिहार्यपणे करीत असते. जो चिंता करीत नाही त्याचा आजार वाढणार नाहीं .चिंतेमुळे वाढलेला आजार जर अशी व्यक्ती चिंता करण्याचे थांबली तर निश्चितपणे किती तरी कमी होईल .काळजीमुळे भीतीपोटी एखादा मनुष्य मृत्यूसुद्धा पावू शकेल ."सजिवं दहते चिंता निर्जिवं दहते चिता" असे सुप्रसिद्ध वचन आहे .
चिंता करू नये असे सांगणे फार सोपे आहे परंतु जेव्हा वेळ येते त्या वेळेला चिंता ( स्वाभाविक) न होणे हे फार कठीण आहे .चिंता करू नको असे म्हणण्यापेक्षा(कारण त्याचा विशेष उपयोग नाही) आपण चिंता का करतो ते खोलवर तपासणे आवश्यक आहे .प्रकृती व्यवसाय धंदा नोकरी किंवा आणखी काही एका विशिष्ट प्रकारे व्हावे असे आपल्याला वाटत असते .त्याच वेळेला ते तसे झाले नाही तर अशी सुप्त भीती आपल्या मनामध्ये असते .जर ही भीती अस्तित्वात नसेल तर ?जेव्हा आपल्याला विशिष्ट प्रकारेच एखादी गोष्ट झाली पाहिजे असे वाटत नसेल तेव्हा भीती नसेल.एका विशिष्ट प्रकारे गोष्ट व्हावी असे स्वाभाविकच प्रत्येकाला वाटत असते ते तसे असू नये असे म्हणणे अस्वाभाविक आहे .जर एखादा अश्या अस्ती किंवा नस्ती पक्षी वाटण्याच्या म्हणजेच भीतीच्या मुळापर्यंत खोलवर गेला,तर त्याला त्याची भीती आपोआपच नष्ट झालेली आढळून येईल.यासाठी निवड शून्य जागृतता पाहिजे .मनाचे निरनिराळे व्यापार अलिप्तपणे पाहिले गेले पाहिजेत.अशी जागृतता केवळ योग्य समजा मधूनच येईल.समज काळजी कां करतो या समजामधून येईल .काळजी भितीमधून निर्माण होते .भीती एखादी गोष्ट आपल्या मनासारखी होणार नाही यामधून निर्माण होते.अापण नेहमी सुखाचा शोध घेत असतो .सुखासाठी एखादी गोष्ट अशा विशिष्ट प्रकारे झाली पाहिजे असे आपल्याला वाटते.सुखाची कल्पना आपल्या धारणेवर अवलंबून असते .धारणा आपल्या पूर्व संस्कारावर अवलंबून असते.या सर्वांमध्ये एक अपरिहार्यता आहे. ही गोष्ट ही सर्व प्रक्रिया जेव्हा आपल्या खरेच लक्षात येईल ,त्या वेळी निवड शून्य जागृतता आपोआपच अस्तित्वात येईल .चिंता अलिप्तपणे पाहिली जाईल .त्यामुळे चिंता नष्ट झालेली आढळून येईल.चिंता करू नये असे म्हणून चिंता नष्ट होणार नाही तर जर आपण त्या चिंतेमध्येच राहिलो म्हणजेच चिंतेचे सर्व अंगांनी सर्व बाजूंनी निरीक्षण केले तर चिंता आपोआपच नष्ट झालेली आढळून येईल
२/१२/२०१८ प्रभाकर पटवर्धन
.