६८ साधू व विंचू
परवा वाचनात एक गोष्ट आली.
एकदा एक साधू नदीवर स्नानासाठी गेला होता स्नान झाल्यावर त्याने सूर्याला अर्घ्य देण्यासाठी ओंजळीत पाणी घेतले .
त्यामध्ये एक विंचू होता. त्याने त्या साधूला डंख मारला.
साधूने त्याला पाण्यात अलगद सोडून दिले. पुन्हा ओंजळीत अर्घ्य देण्यासाठी पाणी घेतल्यावर त्यात तो विंचू आला.
त्याने साधूला पुन्हा डंख मारला. असे अनेक वेळा झाले.
हे पाहून दुसऱ्या एकाने विचारले की महाराज तुम्ही त्या विंचूला मारत का नाही?
त्यावर साधू म्हणाला की जर विंचू त्याचा दुष्टपणा सोडू शकत नाही तर मी तरी माझा चांगुलपणा का सोडावा ?
यावर एखादा म्हणेल की साधू मूर्ख आहे. त्याने जशास तसे वर्तन केले पाहिजे होते .
शठम् प्रती शाठ्यं हीच जगाची खरी रीत आहे .अनाठायी चांगुलपणा घातक होय .त्यामुळे कोणाचेही हित साधत नाही .
ज्याला हृदय आहे त्याचेच ह्रदय परिवर्तन होऊ शकते.
हा ज्याचा त्याचा दृष्टिकोन आहे .कोण बरोबर कोण चूक हे अंतिम सत्याच्या दृष्टीने ठरविता येणार नाही .
काही लोकांचे चांगले किंवा वाईट वर्तन आकलनापलीकडील असते. ज्याची त्याची धारणा भिन्न असते .जन्मापासून अनेक दिशांनी सतत सातत्याने अनेक संस्कार आपल्यावर होत असतात .आपल्या त्या त्या वेळच्या संस्कार संग्रहानुसार ते संस्कार रूपांतरित करून आपण संग्रहित करीत असतो.हा जो संस्कार संग्रहाचा साठा त्याला धारणा असा शब्द वापरलेला आहे .
धारणेप्रमाणे, संस्कार संग्रहानुसार ,जो तो आपले मतप्रदर्शन करीत असतो. यासाठी एक सुंदर उपमा देता येईल .एकच चेंडू सारख्याच जोराने एकाच कोनातून निरनिराळया पृष्ठभागावर मारल्यास त्या चेंडूंची उसळी कमी जास्त असेल. उडण्याची दिशाही भिन्न असेल किंवा मुळीच नसेल .प्रतिक्रियांचेही तसेच आहे.धारणा हा पृष्ठभाग .घटना हा चेंडू .कमी जास्त किंवा मुळीच नाही ही प्रतिक्रिया .
विशिष्ट सामाजिक चौकटीत जरी काही योग्य व काही अयोग्य असे असले, तरी अंतिम सत्याच्या दृष्टीने सर्वच बरोबर असे काही जण म्हणतात.
काळाच्या ओघाबरोबर योग्य काय आणि अयोग्य काय याचे मापदंड एकाच समाजात निरनिराळ्या कालखंडात निरनिराळे असतात.
एकाच काळात परंतू निरनिराळ्या प्रदेशात,निरनिराळ्या समाजात ,निरनिराळया राष्ट्रात हे मापदंड भिन्न असतात .अशा वेळी योग्य अयोग्य इष्ट अनिष्ट हे सर्व सापेक्ष असतात.
एकाच गोष्टीकडे पाहण्याचे निरनिराळे दृष्टिकोन असू शकतात. अापण सर्वांचा आदर केला पाहिजे.या दृष्टीने,स्वतःच्या व इतरांच्या, प्रतिक्रियांकडे पाहिल्यास खरी समज प्राप्त होईल .
स्वतःच्या प्रतिक्रिया सदैव पाहात राहिल्यास, आपली धारणा कशी आहे, आपण कसे आहोत, त्याचा उलगडा होईल.
हे स्व-ज्ञान जगाकडे व स्वतःकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी देते.
या अश्या पाहण्याला निवडशून्य जागृतता असे म्हणतात .
१५/४/२०१८ © प्रभाकर पटवर्धन
pvpdada@gmail.com