42 बदल
एक राजा होता.राज्याची स्थिती कशी आहे,लोक सुखी आहेत की नाहीत ते पाहण्यासाठी तो वेष बदलून राज्यात फिरत होता.अनवाणी फिरत असताना त्याच्या पायाला खडे काटे टोचले.पाय रक्तबंबाळ झाले.राजवाड्यात परत आल्यावर त्याने प्रधानाला बोलाविले .त्याने फर्मान काढले .लोकांना चालताना खूप त्रास होतो तेव्हा सर्व रस्ते कातड्यानेआच्छादून टाका .प्रधान बुचकळ्यात पडला .एवढी जनावरे ठार मारायची त्यांची कातडे कमवून नंतर रस्ते आच्छादित करावयाचे.कातडी फाटतील.लोक कातडी चोरतील.परंतु राजाला कोण सांगणार. नेहमी गोष्टीत राजे लोक चक्कर का दाखविले जातात ते कळत नाही .राजे बादशहा खरोखरच इतके मूर्ख असतील का ?असो.
राज्यात एक चतुर मनुष्य होता .त्याला बिरबल तेनाइमल किंवा आणखी काही म्हणा.त्याचे राजा ऐकत असे.त्याला बोलाविण्यात आले .त्याने चुटकीसरसा प्रश्न सोडविला .जर कातड्याचे जोडे करून पायात घातले तर काटे खडे टोचणार नाहीत .
राजाला ही सूचना आवडली त्याने ती ताबडतोब अंमलात आणली
*********************************
बोधकथा ही नेहमी बोधकथा असते .उपमा ही नेहमी उपमा असते .ती केव्हाही पूर्णोपमा नसते .काही लोक अशा गोष्टींवर निष्कारण कोरडे ओढीत असतात .तर्कशुद्ध पद्धतीने हे सर्व कसे मूर्खपणाचे आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतात.अशा गोष्टीतील भाव लक्षात घ्यायचा असतो .गोष्टीतील नव्हे तर कुणीही मनुष्य बोलत असताना त्यांचे शब्द घ्यायचे नसून त्यातील भाव कळला पाहिजे .भाव तात्पर्य सहज अंत:करणाला भिडले पाहिजे.
आपण नेहमी लोकांनी बदलावे असे म्हणत असतो .इतरांचे दोष चुका काढीत असतो .कुणी काय करावे कसे वागावे याचे सल्ले देत असतो . आपल्या विशिष्ट मनोवृत्तीनुसार आपल्याला काही योग्य व काही अयोग्य वाटत असते .हा संस्कार संग्रह म्हणजेच धारणा .ही आपली फूटपट्टी असते.अशा प्रकारे प्रत्येकाचे मापन साधन किंवा मापन एकक निरनिराळे असते.आणि त्यातून आपण कुणी काय करावे हे सांगत असतो .कोण कसा चूक आहे.कोण कसा दोषी आहे . कोण कसा मूर्ख आहे.कोण कसा अविचारी आहे. माकड आहे. पप्पू आहे. नकल्या आहे . प्रॉम्प्टिंग करतो . शिकवलेले बोलतो . इत्यादी ताशेरे झाडीत असतो .ज्यावेळी अापण लोक पोपटासारखे बोलत आहेत असे म्हणत असतो त्याच वेळी आपण स्वतः पोपटासारखे बोलत असतो हे आपल्या ध्यानीमनीही नसते .नेहमी आपण बरोबर व दुसरे चूक असा आपला नारा असतो . अशी आपली ठाम भूमिका असते . जरी आपण चुकू शकतो हे मान्य केले असले तरीही आतून आपण कधीही चुकत नाही असे आपल्याला ठामपणे वाटत असते .
ही जी लोकांनी बदलले पाहिजे अशी आपली भूमिका असते त्याऐवजी आपण स्वतःच बदलले पाहिजे अशी भूमिका असली पाहिजे .त्यासाठी अापण असे का बोलतो ते लक्षात आले पाहिजे.त्यासाठी आपल्या अंतरंगामध्ये अवगाहन केले पाहिजे .मी म्हणतो तेच खरे हा अहंकार सोडून जर आपण खरेच निवडशून्य पद्धतीने अंतरंगात डोकावले तर आपल्याला बऱ्याच काही गोष्टी कळून येतील .
आपला संस्कार संग्रह लक्षात येईल .आपण विशिष्ट पद्धतीने विचार का करतो ते लक्षात येईल .आपले बोलणे त्यामुळे कसे एकप्रकारे अपरिहार्य आहे तेही लक्षात येईल .
आपल्याप्रमाणेच लोकांचेही संस्कार संग्रह व पार्श्वभूमी निरनिराळी असते हे आपल्या सहज लक्षात येईल.एकूणच जीवनाची अपरिहार्यता जाणवेल.यातून आपल्यामध्ये मूलगामी बदल घडून येईल .
आपण बदलले पाहिजे म्हणून बदलता येणार नाही .बदल आपल्यात झाला पाहिजे लोकांच्या नव्हे हे कदाचित समजेल परंतु उमजणार नाही.लोकांना जसे आपण आपल्या सारखे करू शकत नाही त्याचप्रमाणे आपणही बदलू शकत नाही.
या वस्तुस्थितीची खरी जाणीव आपोआपच मूलभूत बदल घडवून आणेल .खऱ्या अर्थाने अंतरंगात डोकाविल्याशिवाय अंतरंग उलगडणार नाही.अंतरंग उलगडेल तेव्हा मनोव्यापार समजतील.यातून खरी समज प्राप्त होईल .
अशा समजातून योग्य तो बदल आपोआप घडून येईल .
थोडक्यात जग बदलण्याच्या सुधारण्याच्या भानगडीत न पडता प्रथम स्वतःमध्ये बदल होणे गरजेचे आहे .
योग्य अंतर्दृष्टी(निवडशून्य जागृतता हे सर्व स्थूल समजातून सूक्ष्म समजाकडे जाणे आहे)योग्य समज अस्तित्वात आणिल.योग्य समज योग्य बदल घडवून आणील .योग्य बदल योग्य क्रिया अस्तित्वात आणिल.
स्थूल समजातून हे सर्व आपोआप होईल ही यातील गंमत आहे .आपण जाणीवपूर्वक काहीही करण्याची गरज नाही .एकदा अंतरंगात स्थूल समजाचे बीज पडले की त्याचा हळूहळू वृक्ष होईल .स्थूल समजाचे बीज अशाच वाचनातून चर्चेतून केव्हातरी पडेल .
स्व-बदल आवश्यक आहे शक्य आहे आणि तो आपोआप होणार आहे .ही यातील आनंदाची गोष्ट आहे .आपण काही करायचे नाही हे सुद्धा करायचे नाही.पाहा जमले तर पटले तर कळले तर!