25 दिवा स्वप्न व कठोर परिश्रम
**
एक गरीब भिक्षुक होता. भिक्षुकी करून तो आपला उदरनिर्वाह भागवित असे. तो विशेष शिक्षित नसल्यामुळे त्याला याज्ञिकी करण्यासाठी फार बोलावणी येत नसत.एक दिवस तो सत्यनारायणाची पूजा सांगण्यासाठी एका गवळ्याकडे गेला होता. त्या गवळ्याने त्याला जवळजवळ दहा लिटर दूध असलेले एक मातीचे भांडे दक्षिणा म्हणून दिले.
घरी आल्यावर त्याने त्यातील काही दूध प्याले. काही दूध दुसऱ्या दिवसासाठी म्हणून तापून ठेविले.उरलेल्या दुधाला त्याने विरजण लावले. त्याची खोली लहान होती.विरजण लावलेल्या मडक्यावर झाकण ठेवून तो भिंतीला टेकून बसला. विरजण लावल्यावर तयार होणार्या एवढ्या दह्याचे काय करावे असा विचार त्याच्या मनात होता. पुढील प्रमाणे त्याची विचार मालिका सुरू झाली.
उद्या दही लागल्यावर मी त्याचे ताक करून लोणी काढीन.लोण्याचे तूप करीन.
ते तूप बाजारात नेऊन विकीन.त्यापासून मला बरेच पैसे मिळतील.
त्या मिळणार्या पैशातून मी एखादी गाय विकत घेईन.गायीचे दूध विकून मला पैसे मिळतील. ताक लोणी तूप ज्याला ग्राहक असेल ते ते मी विकीन.त्यातून मला खूप पैसे मिळतील. हळूहळू माझ्याकडे गायीचे एक खिल्लार असेल. दूध दुभते विकून खोंड विकून मला खूप पैसे मिळतील. त्या पैशांतून मी जवाहिऱ्याच्या व्यवसाय सुरू करीन.सोने चांदी रत्ने विकून मला खूप पैसे मिळतील. राजाकडे रत्ने दागिने विकण्यासाठी माझी नेहमी ये जा असेल माझी श्रीमंती माझे रूप बघून राजकन्या माझ्या प्रेमात पडेल. राजकन्येशी माझे लग्न होईल. मला दोन मुलगे होतील. माझी उठबस येणे जाणे धनवान लोकांमध्ये असेल. माझ्या मुलाने जर अभ्यास नीट केला नाही. इतरांच्या खोडय़ा काढल्या. तो गरिबांमध्ये जास्त मिसळला,तर ते मला सहन होणार नाही. त्याला नीट शिस्त लावण्यासाठी मी काठी घेऊन त्याला झोडून काढीन. अशा दिवास्वप्नामध्ये असताना त्याने शेजारील काठी अनवधानाने उचलली. व मुलाला जोरात मारली. आपण भिंतीला टेकून बसलेले आहोत. शेजारी विरजण लावलेले मडके आहे. अापण स्वप्नरंजन करीत आहोत. हे सर्व तो विसरून गेला होता. ती काठी शेजारील मडक्याला जोरात लागली. व दुधाचे मडके फुटून गेले.दूध सर्वत्र सांडले.
अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत. कधी बाई दुधाचे मडके किंवा काचसामान किंवा आणखी काही डोक्यावरून नेत असते स्वप्नरंजनामध्ये ती आपले डोके हलवते आणि सर्व काचसामान फुटून जाते.दूध सांडून जाते थोडक्यात सर्व नुकसान होते.कधी शेख महंमद काचसामान घेऊन विक्रीसाठी रस्त्याच्या कडेला बसलेला असतो. स्वप्नरंजनामध्ये तो लाथ मारतो आणि काच सामान फुटून जाते. शेवटी गोष्टीचे तात्पर्य असे सांगितले जाते.दिवास्वप्नात गुंतून जाऊ नका. कठोर परिश्रमाला पर्याय नाही. स्वप्नरंजनापेक्षा कठोर परिश्रम तुम्हाला वैभव मिळवून देतील. अशा प्रकारच्या बाळबोध तात्पर्याशी मी असहमत आहे. स्वप्ने पाहिल्याशिवाय,स्वप्ने रंगविल्याशिवाय, आपला उत्कर्ष होणे शक्य नाही.निद्रित होऊन नुसती छानछान स्वप्ने पाहू नयेत. स्वप्न म्हणजे नियोजन होय. नियोजन हे एक प्रकारचे स्वप्नच असते. व्यक्ती गट उद्योग व्यापार राज्य राष्ट्र प्रत्येक पातळीवर, कुठल्याही पातळीवर, भविष्यकालीन प्रगतीचा आराखडा काढल्याशिवाय पुढे जाणे शक्य होणार नाही. कोणत्याही पातळीवर आपल्याजवळ साधन संपत्ती कोणती आहे व त्याचा आपण निरनिराळ्या मार्गांनी कसा वापर करू शकतो हे पाहिल्याशिवाय कोणता मार्ग स्वीकारावा कोणता मार्ग जास्त फलदायी आहे हे ठरविता येणार नाही. स्वप्नरंजन अत्यावश्यक आहे. दिवा स्वप्न प्रत्येकाने जरूर पाहिले पाहिजे.फक्त स्वप्न हे स्वप्न पातळीवरच न राहता ते वास्तवात कसे येईल ते पाहिले पाहिजे. लेनिन व स्टॅलिन यांनी साम्यवाद असलेले राज्य स्थापन करण्याचे स्वप्न पाहिले आणि रशिया एक महान शक्ती म्हणून उदयाला आला. अब्राहम लिंकनने दक्षिणेकडील व उत्तरेकडील राज्यांचे एकत्रीकरण करण्याचे व एकत्रित यूएसए स्थापन करण्याचे स्वप्न पाहिले आणि आजचा अमेरिका महान शक्ती म्हणून उदयाला आला मावत्सेतुंगने साम्यवादी चीन स्थापन करण्याचे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्ष आज आपण अनुभवित आहोत. नेल्सन मंडेलांनी दक्षिण आफ्रिका स्वतंत्र करण्याचे स्वप्न पाहिले आणि दक्षिण आफ्रिका स्वतंत्र झाली. शिवबाने हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न पाहिले आणि महाराष्ट्र धर्म जिवंत राहिला. राणा प्रतापने स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले आणि मेवाड स्वतंत्र राहिला.
महात्मा गांधींनी स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहिले आणि खंडित का होईना भारत अस्तित्वात आला. जो स्वप्न पाहतो त्याच्या बरोबर असंख्य लोक असतात. संघटन चळवळ सहकार्याशिवाय या गोष्टी शक्य होणार नाहीत. स्वप्न पाहणारा दिसतो. त्याच्या मागून जाणारे त्याला साहाय्यभूत होणारे असंख्य अनाम लोक असतात तेव्हाच स्वप्न सत्य होते हे विसरून चालणार नाही. अशी जगात असंख्य उदाहरणे देता येतील. शंकराचार्यांनी धर्ममार्तंडानी राज्यकर्त्यांनी मोठमोठ्या पुढाऱ्यांनी जर स्वप्ने पाहिली नसती तर आज राष्ट्रे धर्म आहेत त्या स्थितीत आपल्याला दिसले नसते. टाटा बिर्ला अंबानी महिंद्र अशा मोठमोठ्या उद्योगपतींनी प्रथम लहान असताना स्वप्ने पाहिली आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. देशातील व परदेशातील अशी अनेक उदाहरणे देता येतील. कठोर परिश्रम अनेकजण करीत असतात. शारीरिक किंवा बौद्धिक कष्टाची कामे अनेक जण अनेक ठिकाणी करताना आढळून येतात. ते श्रीमंत होत नाहीत. प्रथितयश उद्योगपती व्यापारी व्यावसायिक पुढारी इ. म्हणून ओळखले जात नाहीत. प्रत्येक व्यक्ती लहान किंवा मोठी काहीतरी स्वप्ने पाहत असते. काही तरी नियोजन केल्याशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही. स्वप्न काय आहे व तुमच्यामध्ये ते स्वप्न पूर्ण करण्याचे सामर्थ्य किती आहे यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात.
*भव्यदिव्य स्वप्ने जरूर पाहिली पाहिजेत.*
* नुसती स्वप्ने उपयोगाची नाहीत *
* त्याला व्यवहाराची जोड पाहिजे.*
* केवळ कठोर परिश्रम उपयोगाचे नाहीत*
* स्वप्न (नियोजन) व परिश्रम यांची सांगड पाहिजे*
याची चर्चा करताना मला आणखी एक महत्त्वाची गोष्ट सुचविणे गरजेचे वाटते. नियोजन व परिश्रम यांची सांगड ज्यांच्याजवळ आहे त्यांना यश शंभर टक्के नेहमी मिळेलच असे सांगता येत नाही.
अनेक प्रेरणा,घटक काम करीत असतात. नियोजन करताना सर्व प्रेरणा,घटक लक्षात येतील असे नाही. काही घटक आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. ते अनुकूल असतील तर आपल्याला यश मिळेल जर प्रतिकूल असतील तर अपयश पदरात पडेल.
या सर्व गोष्टींचा विचार करताना आणखी एक बाब लक्षात घेतली पाहिजे. या सर्वातून सुख मिळेलच असे नाही.
*सुख व आनंद ही मानसिक स्थिती आहे. *
*एखादा अत्यंत गरीबीत असूनही विशिष्ट मानसिक स्थितीमुळे आनंदात असेल.*
*तर एखादा खूप श्रीमंत असूनही तो सुखी आनंदी असेलच असे नाही*
*पैसा सत्ता आर्थिक सामर्थ्य यांची सांगड सुखाशी घालता येणार नाही*
*प्रचंड सत्ता प्रचंड आर्थिक सामर्थ्य असूनही अशी व्यक्ती सुखी आनंदी असेल असे नाही*
*बऱ्याच वेळा अशा व्यक्ती असमाधानी दु:खीअसण्याचा संभव आहे.
*तर यातील काही नसूनही एखादा साधू फकीर सामान्य व्यक्ती आनंदी असू शकेल *
*सत्ता राजकीय व आर्थिक सामर्थ्य या भौतिक गोष्टी आहेत. तर सुख आनंद ही मानसिक स्थिती आहे*
*सुख सुख म्हणजे काय असते आनंद आनंद म्हणजे काय असतो हा स्वतंत्र चर्चेचा,अभ्यासाचा,विचाराचा,व अनुभवण्याचा विषय आहे.*