23 तुझे रूप चित्ती राहो तुझे मुखी नाम
देह प्रपंचाचा दास सुखे करो काम तुकारामांच्या
अभंगातील या ओळीचा अर्थ अगदी स्पष्ट आहे .तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठला तुझे स्वरूप माझ्या मनात सदैव असो म्हणजेच तू सदैव माझ्या मनात रहा.आणि तुझे नाव सदैव माझ्या मुखांमध्ये असूदे देह हा संसाराचा व्यवहाराचा दास आहे तेव्हा देहाला त्यांच्या स्वभावाप्रमाणे कामे करू .
देत
या ओळींंचा मला जाणवलेला गर्भित अर्थ पुढील प्रमाणे .------
विठ्ठलाच्या स्वरूपाने आपले मन भरून गेलेले असले म्हणजे दुसऱ्या कोणत्या विचारांना तेथे स्थान मिळणार नाही म्हणजेच मन विठ्ठल चरणी विलीन असेल स्तब्ध होईल अलिप्त राहील. साक्षीभूत असेल.विचार रहित असेल व्यावहारिक जगाकडे अलिप्तपणे त्रयस्थपणे पाहील .
विठ्ठलाचं नाव जिभेवर असल्यावर व्यर्थ बडबड करण्यात आपली ऊर्जा खर्च होणार नाही .बऱ्याच वेळा आपण नको तेव्हा नको तिथे नको त्या विषयावर चुकीच्या जागी उगीच बडबड करुन आपली ऊर्जा व्यर्थ खर्च करीत असतो.त्याच त्याच विचारांचा मोठ्याने किंवा मनात उच्चार करून त्याचे द्दढीकरण होत असते.त्यामुळे मन स्तब्ध होणे आणखी कठीण होत जाते .चित्त विचलीत होते. साक्षीत्व अस्तित्वात येणे कठीण होते.
देह त्यांच्या धर्माप्रमाणे काम करीत असतो त्यावर फक्त लक्ष ठेवावे त्याचे कौतुक करण्याचे किंवा विरोध करण्याचे कारण नाही .त्याला आपल्याकडून उर्जा मिळत नसल्यामुळे तो अयोग्य मार्गाने जाणार नाही.योग्य मार्गावर राहील. आपले त्यांच्यावर लक्ष असेलच .अश्या व्यक्तीचे लौकिक व्यवहार नेहमीप्रमाणेच होत असतील .मानसिक पातळीवर तो कशातही गुंतलेला नसेल केवळ विठ्ठल चरणी लीन असेल.म्हणजेच तो अलिप्त निवड रहित जागृत असेल .