30 द्वेष मत्सर असूया राग इत्यादी विषयी-
आपल्यापेक्षा निरोगी ,श्रीमंत ,सुंदर, यशस्वी, पराक्रमी ,लोकमान्य ,राजमान्य, इत्यादी व्यक्तीविषयी आपल्याला एक विशिष्ट भावना असते.क्वचितच ती कौतुक, अभिमान ,प्रेम ,आनंद ,अशा स्वरूपाची असते .बर्याच वेळा ती मत्सर ,असूया, द्वेष, राग, इत्यादी प्रकारची असते.बर्याच वेळा आपल्या जवळ जे नसते परंतु दुसऱ्याजवळ असते अश्या गोष्टीमुळे अापण अस्वस्थ होतो व तो अस्वस्थपणा आपल्याला छळू लागतो . जे आपल्याजवळ असावेसे वाटते, ते जर दुसऱ्या जवळ असेल ,तर आनंद वगैरे होण्या ऐवजी मत्सर वाटतो .जे आपल्या बरोबरचे आहेत त्यांच्या बद्दल तसे घडल्यास प्रथम असूया ,नंतर मत्सर, द्वेष वाटू लागतो . .दुःख ,अस्वस्थता ,---,राग द्वेष इत्यादी बद्दल नाही तर आपण अस्वस्थ होतो याबद्दल असते.आपण ढवळले जातो याबद्दल अस्वस्थता असते.
मग असूया द्वेष राग इत्यादींचा त्याग करण्याचा आपण प्रयत्न करतो. हे कसे चूक आहे ते आपल्या मनाला पटवून देण्याचा प्रयत्न करतो .हे सर्व सोडले पाहिजे असे आपण म्हणतो .असा प्रयत्न करून हे सर्व सुटेल काय ?निरनिराळ्या प्रसंगी आपल्या मनात निरनिराळ्या भावना निर्माण होतात .नंतर त्यावर अपरिहार्यपणे विचार केला जातो.मग हे बरोबर ते चूक असे ठरवले जाते .मग त्या भावनांना शब्दरूप दिले जाते .भावनांना असे लेबल लावणे कितपत योग्य आहे .लेबल लावल्यामुळे त्या भावना आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे समजू शकतात का ?
आपण त्या भावनातच राहिलो तर?आपण आपल्या मनातील भावना जास्त चांगल्या प्रकारे समजू शकू का ? शब्दीकरण न करता जर भावना अनुभवता आल्या तर ? त्या आपल्या भावना नसून, प्रत्यक्षात त्या भावना म्हणजेच मी आहे हे लक्षात येईल का ?.राग द्वेष असूया इत्यादीपासून आपल्याला खरेच दूर पळताि येईल का ?जर आपण त्यातच राहिलो तर ?मी म्हणजेच प्रेम आपुलीक जिव्हाळा ममत्व असूया द्वेष राग मत्सर हे लक्षात आले तर आपोआपच निवड रहित जागृतता निर्माण होईल ती केव्हा होईल हे सांगता येणार नाही परंतु ही सर्व प्रक्रिया लक्षात घेणे आवश्यक आहे .धरतो म्हणून काही धरता येणार नाही. सोडतो म्हणून काही सोडता येणार नाही.मनाचे खेळ आश्चर्यचकित करणारे आहेत .
केवळ पाहणे हे सुद्धा आपल्या हातात नाही .शब्द भावनांचे पूर्णरित्या वहन करीत नाहीत.परंतु आपल्याजवळ त्याशिवाय दुसरे काही साधन नाही .त्यांच्या साहाय्याने काही सांगण्याचा प्रयत्न .
प्रत्येक व्यक्ती नेहमीच कुणाचातरी द्वेष किंवा तिरस्कार करीत असेल असे नाही परंतु आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकजण केव्हा ना केव्हा या स्थितीतून गेला असण्याची शक्यता आहे .जो अशा स्थितीमध्ये आनंद घेत असेल त्याचा प्रश्नच नाही परंतु असा आनंद घेणारे थोडेच .जेव्हा मन द्वेषपूर्ण व तिरस्कारपूर्ण असते त्यावेळी त्या व्यक्तीला त्रास होत असतो .जेव्हा व्यक्ती अशा स्थितीत असते तेव्हा त्या व्यक्तीला द्वेष व तिरस्कार यातून बाहेर पडावयाचे नसते तर त्यामुळे जो त्रास होतो तो नको असतो .मी यातून बाहेर कसा पडू? काय केले असता माझा आंतरिक द्वेष व तिरस्कार नाहीसा होईल.कितीही तीव्र इच्छा असली तरी असे कसे बाहेर पडता येईल .
आपण हॉटेलात गेल्यावर राहण्यासाठी व जेवण्यासाठी किंवा नुसते जेवण्यासाठी कितीतरी रुपये खर्च करतो.परंतु जेव्हा टीप देण्याची वेळ येते तेव्हा फारच कमी पैसे देतो .एरवी काहीजण वाटेल तेवढे पैसे खर्च करतील परंतु जेव्हा एखाद्या अनाथाश्रमाला किंवा तत्सम संस्थेला देणगी देण्याची वेळ येते त्यावेळी मात्र हात आखडता घेतील .हा क्षुद्रपणा नाही काय ?द्वेष मत्सर तिरस्कार क्षुद्रपणा हलकटपणा इत्यादींनी आपण केव्हा ना केव्हा ढवळून निघतो .हे ढवळून निघणे ही अस्वस्थता आपल्याला नको असते .त्या स्थितीपासून जेवढे दूर जाण्याचा आपण प्रयत्न करू तेवढे ती स्थिती आपल्याला जास्त जास्त चिकटून राहील.आपण त्या स्थितीतच राहिले पाहिजे .म्हणजे मी कसा आहे त्याचा आपल्याला उलगडा होऊ लागेल .मी कुणी वेगळा नसून मी म्हणजेच हे सर्व आहे असे लक्षात येईल .या स्तब्धतेतून या जागृतीतून मी कसा आहे त्याचे पदर उलगडत जातील. मी असा का हे लक्षात येईल. मी कसा घडलो हे लक्षात येईल .ही नव्या जीवनाची सुरुवात असेल .समस्येपासून पळून नव्हे तर समस्येमध्ये राहून आपण त्यापासून मुक्त होऊ शकू .समस्या सोडवण्याचा मार्ग म्हणजे त्यापासून पलायन नव्हे तर त्या मध्येच राहून समस्या म्हणजे मी कसा आहे त्याचा उलगडा होत जाईल. मी ढवळून निघालो पाहिजे .मी असा असण्याचे कारण म्हणजे वेळोवेळी लहानपणापासून असंख्य मार्गानी गोळा झालेले संस्कार होय.या पाहण्यातून मीचे अनेक पदर हळूहळू उलगडत जातील .मी कसा या समाजा मधून हळू हळू एक एक पदर गळून पडतील. त्यांची तीव्रता कमी होत जाईल .यातूनच मी पासून मुक्त होण्याची शक्यता आहे