63 सत्य व असत्य
थोडक्यात सांगायचे झाल्यास अनुभव सत्य असतो व त्याचे शब्दीकरण असत्य असते .समजा आपण समुद्रावर सूर्यास्त पाहिला तर तो एक अनुभव असेल.आपण जेव्हा त्याचे शब्दीकरण करण्याला सुरुवात करतो, मनात किंवा आणखी कुणाजवळ तरी, किंवा लेखन रूपाने, त्या वेळेला तो अनुभव येतो का पाहा .तो अनुभव त्या वेळेपुरता असतो. त्याचे कितीही शब्दीकरण केले किंवा न केले,स्मरण केले न केले , तरी तो अनुभव पुन्हा येणे शक्य नाही .ज्यावेळी पुन्हा सूर्यास्त पाहू त्यावेळी आपल्याला अनुभव येईल .तो स्वतंत्र अनुभव असेल परंतु क्षणार्धात आपल्या मनात त्याचे शब्दीकरण होईल व त्याची तुलना पूर्वीच्या अनुभवाच्या शब्दीकरणाशी सुरू होईल .ही तुलना शब्दीकरण झाल्याशिवाय शक्य नाही .शब्दी करणामुळे येणारी समज, सत्याचा भास असेल, प्रतिमा असेल ,परंतु सत्य नसेल . कोणताही अनुभव घ्या तो त्या वेळेपुरता असतो. आपण त्याला लगेच शब्दरूप देण्याला सुरुवात करतो. अनुभवाचे रूपांतर शब्दात करताना व त्याचे रूपांतर पुन्हा समजामध्ये करताना कितीतरी तफावत पडते .अनुभव ज्याच्या त्याच्या पुरता असतो .मी उदाहरण म्हणून सूर्यास्ताचे उदाहरण घेतले .समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा ,मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात अविरत पडणारा पाऊस ,हिमालयाचे जमिनीवरून किंवा आकाशातून विमानातून होणारे दर्शन ,लहान मुलांचे हास्य किंवा रस्त्यांवरील आपण पाहिलेला भीषण अपघात, कुठे तरी चाललेली मारामारी ,क्षणोक्षणी आपण सतत काही ना काही अनुभव घेत असतो .परंतु कोणताही क्षणोक्षणी येणारा अनुभव त्या वेळेपुरता असतो .नंतरचे वर्णन हे भासरूप प्रतिमारूप असते. आपण जागृत अवस्थेमध्ये अनुभवांची एक मालिका जगत असतो .यालाच सत्य क्षणोक्षणी प्रगट होत असते व नित्यनूतन असते असे म्हणता येईल .तुम्ही स्तब्ध बसा, विचार करा, आणि अनुभव पुन्हा तसाच घेता येतो का पाहा .अनुभव नित्य नूतन असतो . शब्दी करण, भासरूप, प्रतिमारूप, असत्य असते .
मला जाणवणारा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी मी आणखी एक उदाहरण घेतो .प्रेम करूणा दया लोभ क्रोध इत्यादी कोणतीही एक भावना घ्या .आईचे मुलांबद्दल असलेले प्रेम ,अपंग गरीब मुलांकडे बघून वाटणारी करुणा, अत्याचार बलात्कार खून यामुळे मनात निर्माण होणारा क्रोध क्षोभ, आपल्याला दुसऱ्या सारखी संपत्ती मिळावी म्हणून निर्माण होणारा लोभ,प्रतिस्पर्ध्याच्या पुढे जाण्याची इर्षा, इत्यादी भावनांमधील अनुभव हा शब्दात मांडता येणे शक्य नाही .
अनुभव सत्य असतो व त्याचे शब्दात रूपांतर असत्य असते .
शब्दात रूपांतर केल्यामुळे आपल्याला समजले असे वाटते परंतु खऱ्या अर्थाने समज यथातथ्य येणे,अनुभव पुन्हा अनुभवता येणे शक्य आहे का ?अनुभवाचे शब्दरूप ,सत्य नसते .
असत्याची मांडणी दुसर्या एका कोनातून करता येईल .आपल्या मनात अनेक विरोध असतात .आपण गरीब असतो ,आपल्याला श्रीमंत बनावयाचे असते .आपण निष्प्रेम असतो ,आपल्याला प्रेमळ बनावयाचे असते. अापण क्षणा क्षणाला चिडत असतो, रागावत असतो ,आपल्याला शांत बनावयाचे असते .आपण आईवडिलांकडे , मुलांकडे, नातेवाईकांकडे, पतीकडे किंवा पत्नीकडे, व्यवस्थित लक्ष देत नाही ,आपल्याला जास्त लक्ष द्यायचे असते . आपण कदाचित दुष्ट क्रूर आपमतलबी स्वार्थी लबाड फसवे असतो.आपल्याला प्रेमळ निस्वार्थी प्रामाणिक इत्यादी बनावयाचे असते.या सर्वाला मी अंतर्विरोध म्हणत आहे . आपल्याला सतत काही तरी बनवायचे असते .मी असा असा आहे आणि मला तसे तसे बनावयाचे आहे ,असे आपले सूत्र असते .आपण अप्रसिद्ध असतो, आपल्याला प्रसिद्धी मिळवायची असते .आपण सुंदर नसतो, आपल्याला सुंदर बनावायचे असते .आपण दुर्लक्षित नगण्य असतो ,आपल्याला लोकांचे लक्ष वेधून घ्यावयाचे असते . आपल्याजवळ वक्तृत्व नसते, आपल्याला उत्तम वक्ता होण्याची इच्छा असते .सतत काही तरी बनण्याची इच्छा असणे ,आणि त्यासाठी सातत्याने धडपडत असणे ,असे आपल्या जीवनाचे स्वरूप आहे .त्यासाठी आपण सतत धावत असतो .प्रत्येक वेळी जी भावना असते ती मीच असतो हे आपल्या कधी लक्षात येणार .ही बनणे प्रक्रिया असत्य असते आणि मी जसा आहे तसा त्याचा स्वीकार करणे म्हणजे सत्य होय .याचा अर्थ आपण बनणे थांबवणे असा नव्हे तर ही प्रक्रिया समजून घेणे व त्रयस्थपणे पाहणे होय .ज्यावेळी आपण धावण्याचे थांबू, त्या त्या अनुभवा मध्ये राहू , धावण्याच्या अनुभवाचा त्रयस्थपणे अनुभव घेऊ त्रयस्थपणे सर्व प्रक्रियेचे अवलोकन करू , तेव्हा क्रांती अस्तित्वात येईल .यासाठी आपण काही करावयाचे नाही कारण तीही एक बनणेप्रक्रिया असेल .आपोआप समजातून साक्षित्व अस्तित्वात येईल .बनणे व न बनणे दोन्हीही अंतर्विरोध दर्शवतात .यांच्या पलीकडील स्थिती म्हणजे बनणे किंवा न बनणे जे काही असेल ते अनुभवणे होय . शब्दीकरणाच्या जंजाळात न गुंतता ,काहीतरी बनण्याच्या प्रक्रियेत न गुंतता, आपल्याला प्रत्येक वेळी जी जी भावना असेल ती ती भावना अनुभवता आली पाहिजे.
या सगळ्याचा असा अर्थ नव्हे की असा मनुष्य निष्क्रिय होईल .आणि झाला तरी हरकत नाही ,कारण आनंदासाठीच सर्व काही चालले आहे .तो कर्म करीत राहीलच , परंतु प्रत्येक ठिकाणी तो साक्षीभूत असेल,त्याची मानसिक स्थिती वेगळी असेल , म्हणजेच निवड शून्य जागृत असेल .त्याचा अंतर्विरोध मावळलेला असेल . कदाचित सदैव , किंवा मधूनमधून, निदान काही वेळा, आयुष्यात तो अनुभव अनुभवित असेल .जनक राजा पूर्ण पुरुष असूनही राज्य सक्षमपणे चालवीत होता .कृष्ण कुठेही गुंतून न पडता संपूर्ण आयुष्यात कार्यरत होता .शंकराचार्यांनी सर्वत्र मठांची स्थापना करून बौद्ध धर्मामुळे जी हिंदू धर्माला ग्लानी आली होती ती दूर केली .त्यासाठी सर्व हिंदुस्थानचा प्रवासही केला .केरळमध्ये जन्म घेऊन समाधी हिमालयात केदारनाथ मंदिराशेजारी घेतली . विवेकानंदांनी आर्यधर्माची जागतिक धर्म परिषदेमध्ये सक्षमपणे ध्वजा उभारली .रामकृष्ण मठांची स्थापना करून जनसेवेचे कार्य सतत होत राहील याची काळजी घेतली .ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषा प्रचलित नाही म्हणून प्राकृत भाषेत गीतेचे सार सर्व जगाला सांगितले .पंढरपूर वारीची प्रथा सुरू करून भागवत धर्माची ध्वजा उंचावली .तुकोबांनी संसार करता करता अक्षरश हजारो अभंग लिहिले .रामकृष्ण परमहंसांनीही आपली शिष्यपरंपरा निर्माण केली .अलीकडच्या काळातील जगन्मान्य तत्त्वज्ञ जे कृष्णमूर्ती यांनी स्वस्थ न बसता आपल्या व्याख्यानातून व प्रश्नोत्तरातून सत्य काय व मनुष्याची अंतिम धडपड कशासाठी आहे हे सांगितले .
थोडक्यात सत्यज्ञान झालेला मनुष्य निष्क्रिय बनेल असे नाही .आपापल्या भागधेयाप्रमाणे तो निश्चितपणे कार्यरत राहील .फक्त त्याची मानसिक बैठक निराळी असेल .