59 शिस्त
प्रत्येक धर्म शिस्तीचे कठोर पालन उन्नतीसाठी आवश्यक आहे असे सांगतो.जर आपल्याला परमेश्वर प्राप्ती करून घ्यावयाची असेल तर आपल्यामध्ये जे जे वाईट अमंगळ हिडीस कुरूप आहे ते टाकून दिले पाहिजे .लोभ क्रोध मोह मद मत्सर इत्यादी अनेक रिपू सांगितले जातात .या सर्वांवर विजय मिळविल्याशिवाय त्याना ताब्यात ठेवल्या शिवाय किंवा त्यांचा संपूर्णपणे त्याग केल्याशिवाय परमेश्वर प्राप्ती अशक्य आहे असे सांगितले जाते. मी अधाशी आहे या आधाशीपणाचा मला त्याग करावयाचा आहे असे म्हणणे अधाशीपणा नव्हे काय ?संत सांगतात की त्यानी काही विशिष्ट शिस्तीचे पालन करून परमेश्वर प्राप्ती करून घेतली आहे. जे वाईट आहे ते मी टाकतो असे म्हणून ते टाकले जाईल का ?जग हे द्वंद्वाने भरलेले आहे.चांगले वाईट लोभ निरिच्छपणा गर्व निर्गर्विपणा क्रोध शांती ही सर्व द्वंद्वे पाठीला पाठ लावून येतात.एकाचा त्याग करून दुसरे शिल्लक राहणे शक्य नाही .मी आणि हे माझे सद्गुण व दुर्गुण असा प्रकार नसून सर्व बरेवाईट म्हणजे मी आहे हे लक्षात आले पाहिजे.
मी कसा आहे हे एकदा लक्षात आले की पुढे काय करावयाचे ते मीला आपोआपच कळेल .ज्ञानाला शेवटी कक्षा आहेत जे कक्षेच्या बाहेरचे आहे ते ज्ञानातून कळणे शक्य नाही .अनादी अनंत चे मोजमाप अापण कितीही प्रयत्न केला तरी सांत स्थितीतून ते कळणे शक्य नाही .सौजन्य हे आणावयाचे म्हणून आणता येत नाही आपल्याला अापण दुर्जन आहोत हे खऱ्या अर्थाने कळले कि आपोआपच ते येते .शिस्तीमधून धारणांमध्ये बदल घडवून आणला जातो .एका धारणे ऐवजी दुसरी धारणा आणण्याचा प्रयत्न केला जातो .शिस्तीतून आपण जे काही आणण्याचा प्रयत्न कराल ते येईलही शिस्तीमधून यम नियम यामधून कठोर परिश्रमातून आपण ज्याची कल्पना केली ते येईलही परंतु ते अंतिम सत्य नसेल.प्रत्येक धर्म कठोर शिस्तीची चौकट आखतो व त्याचे कठोर पालन करण्याची अपेक्षा करतो तुम्ही ज्याची इच्छा करता ते तुम्हाला मिळेलही परंतु ते अंतिम सत्य असेलच असे नाही.