40 प्रेम
प्रेम म्हटले म्हणजे बहुदा प्रियकर व प्रेयसी यांमधील प्रेम डोळ्यासमोर उभे राहते. प्रत्यक्षात पती पत्नी, प्रियकर प्रेयसी आई मुल ,आई वडील व मुले मित्र मित्र ,भाऊ बहिण, भाऊ भाऊ, असे अनेक व्यक्ती किंवा गट डोळ्यासमोर येतात .देशप्रेम भाषाप्रेम समाज प्रेम मानवता प्रेम धर्म प्रेम अशा आणखीही काही गोष्टी डोळ्यासमोर येतात .प्रेम करणे या वाक्प्रचाराचा इंग्लिश अर्थही डोळ्यासमोर येतो .
सर्वसाधारणपणे प्रेम म्हणजे निरपेक्ष प्रेम असे आपण समजतो .प्रेम देणे जाणतो, घेणे नाही अशीही समजूत आहे .पूर्ण प्रेम खरोखरच निरपेक्ष असते का? जर प्रियकर प्रेयसी एकमेकांच्या मनाविरुद्ध वागत असतील तर प्रेम टिकेल का ? जर पती पत्नी एकमेकांच्या मनाविरुद्ध आचरण करीत असतील, पती पत्नीला मारीत असेल , इतरांसमोर अपमान करीत असेल ;या उलट पत्नी पतीशी अयोग्य वर्तन करीत असेल तर प्रेम टिकेल का ?भाऊ भाऊ आपसात संपत्तीवरून भांडतात आणि त्यावरूनच भाऊबंदकी हा शब्द वाक्प्रचारात आला. संपत्तीतील जास्त वाटा किंवा सर्वच संपत्ती बहिणीला दिली तर भाऊ बहीण प्रेम टिकेल का ? मुलानी आई वडिलांचा योग्य प्रतिपाळ केला नाही ,त्यांना लुबाडून घराबाहेर काढले ,तर आई वडिलांचे प्रेम टिकेल का ?मित्र मित्राला तू असा वाग किंवा असा वागू नकोस असे वारंवार सल्ले द्यायला लागला तर? आई वडिलांनी मुला मुलांमध्ये भेदभाव केला त्याचप्रमाणे संपत्ती वाटपामध्ये समानता ठेवली नाही तर ?थोडक्यात व्यक्तीच्या व्यक्तीकडून एका गटाच्या दुसऱ्या गटाकडून काही ना काही अपेक्षा असतात. अपेक्षा भंग झाला की प्रेम संपते व भांडण सुरू होते. आई मुलाच्या प्रेमाबद्दल फारच गोडवे गायले जातात परंतु खरेच तिथेही निरपेक्ष प्रेम किती ठिकाणी असते ?
इथे वाचलेली एक गोष्ट आठवते बहुधा रामकृष्ण परमहंस किंवा विवेकानंद यांनी सांगितलेली असावी .एकदा एका प्रेयसीने प्रियकराकडे तुझे माझ्यावर खरे प्रेम असेल तर आईचे काळीज काढून मला आणून दे असे सांगितले. त्याप्रमाणे आईला ठार मारून तिचे काळीज काढून प्रियकर लगबगीने प्रेयसीकडे जात असताना त्याला ठेच लागली. त्या काळजामधून म्हणजे हृदयामधून आवाज आला बाळा तुला लागले तर नाही ना ? असे निरपेक्ष प्रेम कथा कादंबऱ्या काव्य यामधूनच आढळते किंवा अपवादात्मक स्थितीमध्ये आढळते सर्वसाधारणपणे अपेक्षा असतात व अपेक्षा भंग झाल्यास प्रेमही आटते व दोघामध्ये वितुष्टही येते.
२७/५/२०१८© प्रभाकर पटवर्धन