Android app on Google Play

 

सुवर्णयुग

 

भावना आणि कल्पनांना अभिव्यक्त करणारा एक सशक्त कवितासंग्रह - 'सुवर्णयुग'खरं म्हणजे, मा‍झ्या थोडीफार जगाची संवेदना असणार्‍या मनाला 'सुवर्णयुग' हा प्रा. शिवाजीराव गणपतराव केंद्रे यांचा काव्यसंग्रह जोरात स्पर्श करून गेला. प्रा. केंद्रे हे बीड जिल्हा, मराठवाडा, महाराष्ट्रा मधल्या एका उच्चमहाविद्यालयात भौतिक शास्त्र या विषयाचे प्राध्यापक आणि त्यांच्या काव्यातून समोर आलेले मानवी समाजाशी त्यांचे संवेदनांनी ओतप्रोत भरलेलं नातं यांचा काही मा‍झ्या मनाला मेळ लागेना.

डॉ. सुनील दादा पाटील, प्रकाशक - कवितासागर पब्लिशिंग हाऊस, जयसिंगपूर यांनी तर मला प्रा. शिवाजीराव गणपतराव केंद्रे यांच्या 'सुवर्णयुग' या काव्यसंग्रहासाठी प्रस्तावना लिहिण्याची गळ घातली होती.

अलीकडचं जग हे भौतिक सुखाच्या मागे एखाद्या पिसाटासारखं लागलेलं असतांना भौतिक शास्त्राचाच प्राध्यापक एवढा संवेदनशील आणि भावना प्रधान कसा काय असू शकतो? हा माझ्या मनाला पडलेला प्रश्न होता.

पण या जगात जे जे उत्कट आणि तुलनेतून प्रभावी असते तेच आपल्या मनावर राज्य करते या उक्तिनुसार, प्रा. शिवाजीराव केंद्रे यांना त्यांच्या भौतिकशास्त्र या विषयाहून तुलनेने अधिक उत्कट व प्रभावी असे त्यांच्या अनुभवात आलेले सामाजिक प्रसंग असतील तर त्यांच्या काव्यात्मक मनातून हेच प्रसंग कवितांच्या रूपाने बाहेर पडणे ही एक आपसूक घडणारीच बाब आहे हे माझ्या लक्षात आले.

मी एक-एक कविता वाचत गेलो आणि मी आजपर्यंत कधीही न पाहीलेले प्रा. शिवाजीराव केंद्रे कल्पनेतून माझ्या समोर उभे राहत गेले.

प्रत्येक कवितेच्या वेळी त्यांची वेगळी प्रतिमा दिसली, प्रत्येक कवितेच्या वेळी वेगळा चेहरा. कधी रागाने बघणारा तर कधी डोळ्यातून आसवे गाळणारा. कधी भांबावलेले तर कधी आश्चर्य चकित झालेले; असे विविध भावनांचे विविध चेहरे दाखविणारे प्रा. शिवाजीराव केंद्रे माझ्या कल्पनेच्या विश्वात माझ्या चक्षुपटलासमोर उभे राहत गेले.

माझ्या आईचं मनं,
सागराहून आहे मोठं
डोंगरा एवढं दु:ख
तिच्या मनामध्ये साठं, तिच्या मनामध्ये साठं.

या त्यांच्या 'फुंकर' या कवितेतील ओळी किंवा,

आदर राख गुरूजनांचा, बेशिस्तपणे वागू नको,
अभ्यासात मग्न रहा तू, रोडरोमिओ बनू नको.

या 'फटका' या कवितेतल्या ओळी, त्यांच्या वेगवेगळ्या 'मूड' चाच परिचय करून देतात.


प्रा. शिवाजीराव केंद्रे यांनी त्यांच्या भौतिकशास्त्र विषयाच्या अभ्यासात एक सिद्धांत काव्य रूपाने मांडलेला वाचला. तो सिद्धांत त्यांना आवडला, समजला व पटकन कायम स्मरणातही राहिला. याचा अर्थ, कोणतीही अवघड, क्लिष्ट वाटणारी गोष्ट जर काव्यरूपाने आपल्या समोर मांडली गेली तर ती सोपी होते व मनात टिकून राहते असे त्यांचे मत बनले आणि विज्ञानाचा भौतिकशास्त्र विषयाचा प्राध्यापक कवी बनला.

त्यांना कवितांचे वेड लागले आणि मुळातच असलेले त्यांचे कविमन जागे झाले आणि समाजातल्या प्रत्येक व्यवहारात त्यांना जर एखादी उत्कट भावव्यथा दिसली तर त्यावर त्यांनी काव्य करण्याचा प्रयत्न केला आणि अशा अनेक कविता तयार झाल्या आणि काव्यसंग्रह बाहेर पडले.

'सुवर्णयुग' या काव्यसंग्रहाचे वाचन करताना विरह, प्रेम, भक्ती, आसक्ती, नाती, संतांची थोरवी, पंढरीचा विठ्ठल, सीमावाद, वारकरी, राजकारण व राजकारणी, विडंबन, सत्ता, विरक्ती असे अनेक विषय त्यांनी हाताळलेले आहेत असे दिसते.

 'मोह' या कवितेतील -

नडला मोह सिकंदराला,
हात हलवीत 'वर' गेला
या मोहापायी दुर्योधन
सर्वनाशास कारण ठरला.

या सारख्या काव्यपंक्तीतून समाजाच्या संवेदनेवर आसूड ओढणारे काव्यही त्यांच्या लेखणीतून उतरले.

'खुर्चीची व्यथा' आणि 'लोकशाही दरबार' या कवितांतून त्यांनी लोकशाहीची विटंबना, राजकीय सत्तेची लालसा या व अशा अनेक अत्यंत गंभीर अशा विषयाला हात घातला आहे. 'मतदाराचे मनोगत' ही कविता तर निवडणुकीचा काळ, तरुण मुलांची घालमेल आणि सगळा मायेचा बाजार हेच चित्र डोळ्यासमोर आणते.

कॉलेजचे विश्व आणि कॉलेज तरुणांचे वर्तन या महाविद्यालयीन वातावरणाचा अनुभव आणि विद्यार्थ्यांच्या वर्तनावर आधारित योग्य आणि अयोग्य यातला फरक प्रा. शिवाजीराव केंद्रे यांनी त्यांच्या कवितांमधून अत्यंत मार्मिकपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवला आहे.

शेतकर्‍यांची व्यथा, त्यांची कथा आणि शेती व्यवसायातील त्यांची रडगाथा या विषयांनाही त्यांनी त्यांच्या काव्यामधून वाचा फोडली आहे.

 आमचं कर्नाटकी रानं, महाराष्ट्रवादी मनं,

आमच्या जीवावर बेतला तो आयोग 'महाजन'.

या ओळीतून 'सीमावासीयांची व्यथा' या कवितेतून त्यांनी सीमावासीयांच्या ज्वलंत व्यथांना, भावनांना वाट करून दिली आहे. एखाद्या सामाजिक व्यथेचं, आप्पा, आबा, रामदास आणि कदम नावाची राजकीय माणसं कसं राजकीय भांडवल करून त्या व्यथेपेक्षा स्वत:लाच कसं पुढं करतात हे ही त्यांच्या कवितांमधून दाखविले गेले आहे.

प्राध्यापक शिवाजीराव गणपतराव केंद्रे यांच्या 'सुवर्णयुग' बद्दल एवढंच लिहून थांबणं मला अवघड जात आहे. माझ्या डोळ्यासमोर आणखी काही वेगळे प्राध्यापक शिवाजीराव गणपतराव केंद्रे मला दिसत आहेत. त्यांचे काही चमत्कारिक भाव त्यांच्या न दिसणार्‍या पण त्यांच्या आणखी काही कवितांमधून डोकावणार्‍या चेहर्‍यावरून मला खुणावत आहेत. कुटुंब आणि कौटुंबिक नाती, पती-पत्नी मधील भावविश्व, माहेर व सासर यामधला पत्नीच्या मनातला धागा यांचं ही वर्णन प्राध्यापक शिवाजीराव गणपतराव केंद्रे यांनी त्यांच्या कवितांमधून काव्यरुपाने मांडलेले आहे.

मानवी मनाचे कंगोरे, मनाचा प्रवास, प्रवासातील वळणे, वळणावरचे अपघात जसे घडतात तसे, अगदी नेमके तसे मानवी मन घावत असते. या मनाचा लगाम किंवा ब्रेक जर ढिला पडला तर नुसते कविता करून चालणार नाही तर कादंबर्‍या लिहाव्या लागतात. एवढे हे मानवी मन बेताल आहे. पुढील काही कवितांची उदाहरणे पहा...

 'तू हवी होतीस पहायला' या कवितेत -

सोडून भरला संसार, तू नको होते जायला,
हे आनंदाचे गोकुळ तू हवी होती पहायला.

या काव्यपंक्तितून त्यांनी एखाद्या पतीची, त्याची पत्नी त्याचा संसार सोडून निघून गेलेली असेल तर काय मानसिक अवस्था होते हे दाखवून दिले आहे.

'कदाचित' या कवितेत तर प्रेमाची विफलता आणि तारुण्याची काळाच्या ओघात झालेली अवकळा यांचे वर्णन मोजक्या व तरल शब्दांत मांडलेले आहे. या खाली दिलेल्या काव्यपंक्ती वाचकांनी वाचून समजून घ्याव्यात –

ध्यानी मनी नसताना,
एकदम दिसलीस म्हणून
सहज डोळे भरून पाहीलं,
गव्हाळ वर्णी, सतेज कांती,
तशीच आहे का म्हणून,
थोडं अवलोकन केलं, तेव्हा...
तरुणपणाचा शेलाटी बांधा,
पार वाकलेला पाहून
मनात विचार आला,
एवढं भारी असतं का हो संसाराचं ओझं?
अकाली पांढरे झालेले केस पाहून
मन मात्र खायला उठलं आणि
अविवाहित राहिल्याचं त्यातल्या त्यात
समाधान वाटलं...

किती उत्कट आणि खोल भावना मांडल्या आहेत कवीनं पहा ही कविता पुढे नक्कीच वाचा. फार छान आहे.

 'पाहिजे' या कवितेतून भारताची अखंडता, बेकार तरुणांची फौज, भारताचा ढोंगी शेजारी या विषयाला कवीने हात घातला आहे. अगदी समर्पक काव्यपंक्ती रचल्या आहेत. बळीराजाची आत्महत्या हा ही विषय छेडला आहे.

'यशस्वीतेचं गुपित' ही कविता शाळेतल्या मुलांना उपदेश करणारी असून, आई-वडीलांचे महत्त्व, बेशिस्त वागणे, मोबाईल मैत्री, सिगारेट, गुटखा वेड इत्यादी विषयांवर ही उपदेशात्मक काव्यपंक्तीतून कवीने आपले मन तरंगते ठेवले आहे. "मुलांनो जा तुम्ही वर्गावर" ही काव्यपंक्ती आपणाला आपले शाळेतले दिवस आठवून देणारी आहे.

प्राध्यापक शिवाजीराव गणपतराव केंद्रे यांनी सामान्य पती-पत्नींनी मांडलेला संसार आणि तो यशस्वी करण्यासाठीची दोघांची कसरत यावरही प्रकाश झोत टाकलेला आहे. 'आठवडी बाजारात' या कवितेतून प्रत्येक वाचकाला आपला संसार डोळ्यासमोर आणावाच लागेल असे भाव मांडले आहेत.

डोळ्यात आले पाणी, भुकेलं गं पोरं
जीव आला घायकूतीला, कसा सांभाळू संसार?
गालावरून ओघळतो आसवांचा पूर
'पर्स'मधले पैसे मोजून, सुटला गं धीर...

ही सगळी कविता वाचा. 'सुवर्णयुग' खरेदी करा मित्रांनो!

प्राध्यापक शिवाजीराव गणपतराव केंद्रे यांनी जाता जाता पत्नीची छेड काढायचे ठरवलेले दिसते. 'बदल' या कवितेत त्यांनी पत्नीला माहेरची माणसं कशी जवळची वाटतात आणि दीर, नणंद, सासू यांच्याबद्दलचा कोरडेपणा कसा असतो यावर टोमणे वजा काव्यपंक्ती तयार केल्या आहेत.


वाढदिवस बहि‍णीचा,
डोक्यामध्ये तुझ्या कसा घट्ट बसतो
आणि नणंदेला पाहताच
पोटामध्ये तुझ्या कसा गोळा उठतो...

या ओळीतून, आता जरी पत्नीवर्ग काही बदलेला असला तरी पत्नीच्या मनाला उपदेश होईल असा थोडासा खट्याळपणा दाखविला आहे.

हा थोडासा आलेला कडवटपणा घालवून देण्यासाठी, की काय जणू कवीने संग्रहातील शेवटची कविता 'कशाला' ही पत्नीचे किंवा प्रेयसीचे मन सांभाळणारी अशी केलेली आहे.

हसरा हा चेहरा तुझा, सदैव असता सोबतीला
अपयश माझ्या सावलीला, थांबेल तरी कशाला?

या ओळीतून कवी हा काहीसा खुषमस्कर्‍याही असल्याचा भास होतो. प्रेमात आणि युद्धात सर्व क्षम्य असते. पत्नीला ताणले काय किंवा तिला मानले काय सर्वकाळ ती पतीलाच सोबत करत राहणार. प्राध्यापक शिवाजीराव गणपतराव केंद्रे यांनी केलेल्या 'सुवर्णयुग' मधल्या सर्व कविता ह्या मानवी जीवनाच्या सर्व कोपर्‍यांना स्पर्श करणार्‍या आहेत.  

प्राध्यापक शिवाजीराव गणपतराव केंद्रे यांनी त्यांच्या महाविद्यालयातील कला शाखेतल्या विद्यार्थ्यांना जर या कविता दाखविल्या असतील तर निश्चितच त्यांचे कौतुक कॉलेजभर होईल अशा या कवितांचासंग्रह 'सुवर्णयुग' मला तर भावला, आवडला.

सूड, द्वेष आणि मत्सर,
उच्चाटनास होऊनी निर्भर
जे असती सदा अग्रणी
वंदन माझे तया चरणी.

या त्यांच्याच काव्यसंग्रहातील 'सुवर्णयुग या काव्य रचनेने सुरू होणार्‍या या 'सुवर्णयुग' काव्यसंग्रहास माझ्या लाख-लाख शुभेच्छा. प्रा. शिवाजीराव केंद्रे यांच्याकडून असे अनेक टोचरे, बोचरे, समाजाभिमुख काव्यसंग्रह बाहेर पडोत अशी प्रार्थना करून माझी प्रस्तावना इथे संपवितो.

- आबासाहेब मारुती सूर्यवंशी,
ज्येष्ठ लेखक - समीक्षक - संपादक
संपर्क - ९४२१५४७४३०

 
  कवितासंग्रह - सुवर्णयुग
  कवी - प्राध्यापक शिवाजीराव गणपतराव केंद्रे
  ISBN - 978-93-87127-19-7
  पृष्ठे - 104
  मूल्य - 160
  प्रकाशक - डॉ. सुनील दादा पाटील
  प्रकाशन - कवितासागर पब्लिशिंग हाऊस, जयसिंगपूर
  संपर्क - 02322 225500, 09975873569, 08484986064
  ईमेल - sunildadapatil@gmail.com