Get it on Google Play
Download on the App Store

संपादकीय

श्रावण महिना आणि मराठी साहित्याचे पिढ्यानपिढ्याचे ऋणानुबंध आहे. जसे बळावर योग्य संस्कार व्हावे यासाठी गर्भवती स्त्रीसाठी जसे वातावरण असावे लागते, तसेच एखाद्या साहित्यिकाला लिहिण्यासाठी पोषक वातावरण असावे लागते. श्रावण महिन्यात निसर्ग स्वतः यासाठी पुढाकार घेतो आणि विचारांना पांग फुटू लागतात, साहित्यिकाच्या लेखणीतून आपोआप शब्द उमटू लागतात.

पावसाच्या सारी, ते निसर्गाने ओढलेलं हिरवंगार पांघरून, पाखरांची किलबिलाट आणि झऱ्याचा तो मंद आवाज माणसाला वेड लावतं. अशा या निसर्गावर एखाद्याने लिहिलं नाही, तर तो साहित्यिक कसला? या विषयावर बोलू तितके शब्द कमी पडतील. आणि म्हणूनच 'श्रावण सरींची बरसात' हा विषय सलग दोन महिने सुरु असणार आहे. ज्या साहित्यीकांना सदर अंकामध्ये आपले साहित्य प्रकाशित करता आले नाही, किंवा ज्यांच्या साहित्याची निवड सदर अंकामध्ये झाली नाही, त्यांना साहित्य पाठविण्यासाठी अजून एक महिना आहे. तर whatsapp वर आपले साहित्य forward न करता ते आपल्या नावासह आम्हाला पाठवा. किंवा वर्तमानपत्र, ब्लॉग, इतर मासिकामध्ये प्रकाशित करा, कारण ते साहित्य तुमचे आहे याचा तुमच्याकडे पुरावा राहील.

हल्ली whatsapp वर दिवसातून १० तरी कविता पाऊस आणि श्रावणावर येतातच. मला पुन्हा सांगावेसे वाटते, कृपया whatsapp वर आपले साहित्य अशाप्रकारे forward करू नका. आपण शब्दांची योग्य सांगड घालून आपले साहित्य लिहिले असते आणि काही तासांनंतर एखाद्याने ते एडीट करून स्वतःच्या नावावर खपवून घेतलेले असते. असे प्रकार सर्रास चालतात आणि मूळ साहित्यिक कुठेतरी हरवतो.

आपल्यासारख्या प्रतिभावंत आणि नवोदित साहित्यिकांचे साहित्य प्रकाशित करण्यासाठीच आरंभ हे मासिक सुरु करण्यात आले आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्या साहित्याला एखादे व्यासपीठ मिळते तेव्हा ते व्यासपीठ तुम्हाला मिळालेले असते.

लोभ असावा.

धन्यवाद!

अभिषेक ज्ञा. ठमके
संपादक