दारुड्याची डिस्कवरी
- शैलेंद्र बेंडाळे
श्रावण महिना होता. नुकताच पाऊस पडून गेला होता. सगळी धूळ धुऊन गेली होती. वातावरण एकदम प्रसन्न होतं. सगळी सृष्टी छान न्हाऊन निघाली होती. झाडं अधिकच हिरवी वाटत होती, वारा अधिकच गार वाटत होता, घरं अधिकच रंगीत वाटत होती, रस्ता अधिकच काळा वाटत होता....
मी आणि माझा मित्र विजू त्याच्या नव्या Yamha वरून नरुटवाडीला निघालो होतो. सगळीकडे प्रसन्नता ओतप्रोत भरली होती..आनंद ओसंडून वाहत होता. आमचाही मूड एकदम झक्कास होता... गप्पा छान रंगल्या होत्या. विम्याच्या कामानिमित्त आम्ही नेहमीच फिरायचो, भरपूर फिरायचो. आणि गप्पाही भरपूर मारायचो. विजू माझ्या टीम मधला एक विमा प्रतिनिधी होता पण माझा एकदम जिगरी दोस्त ही बनला होता.
गार वारा, स्वच्छ वातावरण, एकदम लख्ख रस्ता, नवी कोरी yamaha, हिरवागार परिसर आणि जोडीला गप्पीष्ट मित्र... अहाहा!! सगळंच कसं छान जुळून आलं होतं. आम्ही गप्पा मारत मारत अगदी सावकाश रमतगमत निघालो होतो.
दूरवर दुधाच्या कूलर जवळ आम्हाला अचानक गर्दी दिसली. आम्ही लगेच गाडीचा स्पीड वाढवला आणि झटक्यात गर्दीपर्यंत पोहोचलो. गाडी बाजूला लावली आणि नेमकी का गर्दी झालीय हे पाहायला घुसलो गर्दीत..
माणसाचा स्वभावच आहे हा, कितीही घाई असली तरी आपण गर्दी जमलेली दिसली की आपोआपच आपली घाई विसरतो आणि गर्दीचा अंदाज घेऊ लागतो. लोकांना विचारतो, टाचा वर करून करून पाहायचा प्रयत्न करतो, एखाद्या उंचवट्यावर चढून बघतो किंवा गर्दीत घुसून पुढे जाऊन का गर्दी झालीय हे पाहायचा प्रयत्न करतो. आम्हीही आपसूकच गर्दीत घुसलो.
दगडांच्या खाली एक मोठा साप गेल्याचं समजलं. आणि वाडीतलाच एक दारुडा दगडं वर खाली करून त्या सापाला हुडकत होता. लोकंही इकडे तिकडे त्याला साप पाहू लागत होती. तितक्यात त्याला सापाची शेपटी दिसली, त्यानं लगेच शेपूट पकडले आणि दुसऱ्या हाताने दगड भराभर बाजूला करू लागला, तो-तो साप अजूनच आत आत घुसत होता. शेवटी एकदाचा अख्खा साप लागला त्याच्या हातात.
काळाशार, अंदाजे 5-6 फूट लांब, मनगटासारखा जाड, लालभडक जीभ आतबाहेर करत होता. लोक आ वासून पाहत होते. आम्हालाही घाम फुटला होता. एव्हाना लोक दारुड्याला म्हणत होते, " सोड त्याला पटकन, टाकू ठेचून दगडानं", "टाक खाली त्याला, चावल बिवल",
"जहाल इशारी वाटतुय", वगैरे वगैरे...
पण दारुडा काय ऐकायला तयार नव्हता. आता त्यानी सापाचा पूर्ण control घेतला होता. तो त्या सापाच्या चमकदार डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, "का सोडू? मुकं जनावर हाय राव. न्हाय चावत. म्या रोज बघतूय डीस्कोरी वर, असंच धरायचं असतंय हे जनावर." तितक्यात त्या सापानं जोरात फुत्कारून चांगली इतभर फडी काढली... तो साप साधा साप नव्हता चांगला काळाशार नाग होता नाग.. आमची सर्वांचीच बोबडी वळाली, विजू दारुड्याला म्हणाला, "भावड्या, टाक त्याला खाली, विषारी नाग हाय, चावल बिवल लका".
दारुडा त्या नागाच्या फणीवरून हात फिरवत म्हणाला,"न्हाय राव चावत शेठ, मुकं जनावर हाय, म्या रोज बघतूय डिस्कोरीवर.."
तितक्यात नागाने झटक्यात मान वळवली आणि तो ज्या हाताने फणी कुरवाळत होता त्या हाताला डसला...
दारुडा चिडला, म्हणाला, "मला चावतुय व्हय? टीवीतच बरा रोज गप गुमान धरू देतूय शूटिंग करताना, आन हित आमच्याच गावात यिवून आम्हालाच चावतुय व्हय?", दारुडा काही नाग सोडायला तयार होईना. थोड्याच वेळात पडला दारुडा चक्कर येऊन, लोकांनी नाग मारला, दारुडा न्हेला जीबड्यात टाकून दवाखान्यात पाणबुड्याच्या. गर्दी पांगली. मी आणि विजूही नरूटवाडीला निघून गेलो. 2-4 दिवसानी विजूच्या दुकानात बसलो होतो, मला अचानक दारुड्याची आठवण आली. विजूला विचारलं, तेव्हा समजलं दारुडा वाचला होता. डिस्चार्ज घेऊन घरी गेला होता, सत्तरहजार बिल करून दवाखान्याचं!!!
डिस्कवरी channel च्या मूक्या जनावराचा नाद तब्बल सत्तर हजारात पडला होता त्याला..!