तो श्रावणही जळतो तिच्यावर
- निलेश मधुकर लासुरकार
ज्या श्रावणाची सुंदरता
दिसते अनेक लेखणीत
तोच श्रावण लाजला आज
पाहून तिला उन्हात...
कोवळ्या उन्हात उभी ती
सोनेरी किरणांनी सजली
तिच्या कोमल पावलाच्या स्पर्शाने
हिरवळ श्रावणातली लाजली...
जळला श्रावण मनात
घात असा तो झाला
उन्ह कोवळे असतांना
पाऊस अचानक आला...
चिंब भिजलेल्या कपड्यात ती
अधिक मादक दिसली
खेळी निसर्गाची कशी
पुन्हा अजून फसली...
त्या हवेतल्या गारव्याने
तिची काया रोमांचित झाली
तिच्या उष्ण श्वासाने
गार हवेत उष्णता आली...
तिच्या ओठावरती पावसाचे थेंब
दिसती ते मोत्यापरी
कधी निसर्ग शिरजोर
कधी वरचढ ही सुंदरी...
हरला श्रावण हरला निसर्ग
सौंदर्य ते भारी पडले
लेखणी लिहिते आज स्वतःच
काय त्या दोघात घडले...