Get it on Google Play
Download on the App Store

माध्यमांतर: एपिक चॅनल- धर्मक्षेत्र

कर्ण एपिसोड (शेवटचा भाग)

- निमिष सोनार
पुणे

कर्णाने ते वचनाप्रमाणे काढून दिले.

इंद्र, "तू आपल्या दानशूर या कीर्तीला सार्थ ठरवलेस! आता मी सुध्दा काही निर्दयी देव नाही. मी त्या बदल्यात तुला अशी शक्ती देतो की तू माझे नाव घेतलेस तर साधा बाणसुध्दा माझे अस्त्र बनेल, इंद्रास्त्र! ज्याचा सामना कुणीही करू शकणार नाही!"

कर्ण, "कुणीही नाही? अर्जुन सुध्दा नाही?"

इंद्र, "नाही, अर्जुन सुध्दा नाही!"

कर्ण, "ठीक आहे, जाण्याआधी एक विनंती आहे तुम्हाला. आपल्यातील ही भेट कुणाला सांगू नका. कारण ज्याप्रमाणे एका दरिद्री ब्राम्हणाचा वेष घेऊन तुम्ही माझ्याशी कपट केले त्याप्रमाणे यापुढे कुणी दानशूर व्यक्ती मग अशा प्रकारच्या याचकावर विश्वास ठेवणार नाही."

ठीक आहे असे म्हणून इंद्रदेव निघून गेले.

(पुन्हा चित्रगुप्तचे धर्मक्षेत्र)

गांधारी, "याला चांगले इंद्रास्त्र मिळाले होते, त्याचा देखील याने उपयोग केला नाही. पण मी म्हणते तू तुझे कवच का दिलेस? नाही दिले असतेस तर काय बिघडले असते?"

कर्ण, "मग माझी दानशूर ही उपाधी काय कामाची? मला माझ्या कीर्तीला जागायचे होते, शब्दाला जागायचे होते!'

गांधारी, "अरे पण तू विचार केलास का जेव्हा तू हे कवच कुंडले दान केले तेव्हा दुर्योधनाच्या मनावर किती आघात झाला?"

(फ्लॅश बॅक सुरू)

युद्ध सुरू असते त्या दरम्यान दुर्योधनाच्या तंबूत -

दुर्योधन गांधारीला आणि दुःशासनला सांगतो की आज कर्णाने असं काही केलं आहे की तुम्ही हस्तिनापूर सोडूनच निघून जाल.

मग ते दोघे जण विचारतात की नेमकं काय झालं तेव्हा दुर्योधन सांगतो की कर्णाने आपली कवचकुंडले देऊन टाकली तेव्हा गांधारी म्हणते की हे मला माहिती होतं तो तुझ्याशी एकनिष्ठ नाही आणि हा तुझा मित्र काहीच कामाचा नाही.

पण दुर्योधनाला अजूनही कर्णावर विश्वास आहे. तो म्हणतो की मी कर्णाशी मैत्री फक्त तो अजिंक्य आहे यासाठी नव्हती केली. केवळ त्याचेकडे कवच कुंडले आहेत या कारणासाठी मी त्याच्याशी मैत्री केली नव्हती.

पण तरीही गांधारी म्हणते की त्याच्याशी मैत्री तोड. तेव्हा दुर्योधन सांगतो की मग काय त्याला जाऊन सांगू की तू माझ्या काही कामाचा राहिलेला नाही म्हणून मी तुझ्याशी मैत्री तोडतो आहे? ते काही नाही. तो माझा मित्र आहे आणि मित्रच राहणार.

(फ्लॅशबॅक समाप्त)

चित्रगुप्ताच्या दरबारात मग गांधारी पुढे कर्णाला सांगते की मी एवढे सांगून सुद्धा दुर्योधनाने तुझ्याशी मैत्री तोडली नाही. तुला माफ केलं.

कर्ण म्हणतो, "हो मला माहिती आहे की दुर्योधनाने मला माफ केलं. पण पण आपणा सगळ्यांना हेसुद्धा माहिती आहे किती मी मुद्दाम केले नव्हते तर माझ्याशी कपट करून ती कवच-कुंडले काढली गेली ती माझ्या दानशूरपणाचा फायदा घेऊन! पण मला जन्मभर याचा सल बोचत राहिल की मी माझ्या मित्राच्या उपयोगी पडू शकणार होतं असं काहीतरी दानात देऊन टाकलं. दुर्योधन, मला माहिती आहे की तू मला माफ करून टाकले होते पण आज पुन्हा मी येथे तुझी क्षमा मागतो!"

दुर्योधन म्हणतो, "अरे मैत्रीमध्ये क्षमा मागू नये. अर्जुन आणि त्याच्या वडिलांनी आपल्या सोबत कपट केले आहे. पांडवांना मारू शकतील असे बाण अर्जुनाने मागून घेतले आणि त्याचे वडील इंद्र यांनी तुझी कवच-कुंडले मागून घेतली. हे पांडव आपल्याला घाबरत होते. आपल्या सामर्थ्यालाला घाबरत होते म्हणूनच कपटाचा वापर यांना करावा लागला. आपल्या या जन्मात आपण पांडवांकडून भरपूर काही शिकलो जे आपल्याला पुढच्या जन्मी कामास येईल!"

मग पुढे दुर्योधन चित्रगुप्ताला सांगतो की महाराज माझा मित्र कर्णावर लागलेला हा आरोप असत्य आहे आणि हेसुद्धा सांगतो की माझ्या मित्राने माझ्यासोबत कसलाही विश्वासघात केलेला नाही.

मग चित्रगुप्त फैसला सुनावतात की दुर्योधन आणि कर्ण यांची मैत्री स्वार्थावर आधारलेली नव्हती आणि कर्णाने दुर्योधनाचा कोणत्याच प्रकारचा विश्वासघात केलेला नव्हता.

मग करण्यावर पुढचा आरोप लावण्यासाठी परशुराम येतात. सगळे उठून उभे राहतात. ते कर्णाला मात्र त्यांचा नमस्कार करण्यास मज्जाव करतात.

परशुराम स्वतःची ओळख करून देतात.

"मी रेणुका आणि जमदग्नीचा पुत्र असून, महादेव शंकराचा शिष्य आहे. तसेच द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य यांचा मी गुरु!"

कर्ण म्हणतो की मी सुद्धा तुमचा शिष्य आहे.

परशुराम म्हणतात की जरी तू माझा शिष्य होतास पण तू असं काहीच केलं नाही की ज्यामुळे मी तुझा परिचय माझा शिष्य म्हणून करून देऊ शकेल.

चित्रगुप्त म्हणतात, "कर्ण आणि परशुराम यांचे संवाद ऐकून एकंदरीत असं वाटतं की या दोन्ही गुरु शिष्यात काहीतरी बेबनाव असावा! ते का हे आपल्याला लवकरच कळेल! आणि पुढचा आरोप कर्णावर हाच आहे की त्याने कपट करून परशुरामांकडून शिक्षण घेतले!"

परशुराम म्हणतात, "माझी प्रतिज्ञा सर्वांना माहीत आहे की मी क्षत्रिय लोकांना शिक्षण देत नाही. कर्णाने स्वतःचे नाव वासू आणि वडील मंदिराचे पुजारी आहे असं खोटं सांगून स्वतः ब्राम्हण आहे असे भासवले. मग शिक्षण घेतले. द्रोणाचार्यनंतर चांगला धनुर्धारी फक्त कर्ण हाच होता. मी कर्णाला ब्रह्मास्त्र सुध्दा शिकवले होते. पण त्याचा उपयोग फक्त क्षत्रिय लोकांच्या विरूद्ध करायचा असे सांगितले होते!'

सगळे विचारतात की मग ते ब्रह्मास्त्र कर्णाने युध्दात वापरले का नाही?

कर्ण सांगतो की परशुराम यांच्या शिकवणीनुसार मी प्राप्त केलेले ते ब्रह्मास्त्र त्यांनी नंतर परत घेतले. त्याचा वेळेवर मला उपयोग होणार नाही असा शाप दिला कारण त्यांना एके दिवशी माहिती पडले की मी क्षत्रिय आहे, ब्राम्हण नाही!

चित्रगुप्त विचारतात, "ते त्यांना कसे माहिती पडले?"

परशुराम, "एके दिवशी मी आराम करतांना कर्णाने माझे डोके त्याच्या मांडीवर घेतले आणि एक विंचू त्याला मांडीला चावायला लागला. पण रक्त येत असतानासुद्धा कर्ण मी झोपेतून उठेपर्यंत तो शांत राहिला. त्याने वेदना सहन केल्या. मला जाग आल्यावर ते रक्त दिसले. एवढी सहनशक्ती नक्की एखाद्या क्षत्रिय व्यक्ती मध्येच असते, एखाद्या ब्राम्हण व्यक्तीत नाही आणि कर्ण ब्राम्हण नाही हे मी ओळखले आणि कर्णाला शाप दिला आणि हाकलून दिले"

मग कर्ण द्रोणाचार्यांना दोष देतो कारण कर्णाला त्यांनी शिक्षण नाकारले आणि त्यांनी त्यांचा शिक्षक धर्म पाळला नाही. कर्ण सुतपुत्र असल्याने त्याला द्रोणकडून शिक्षण नाकारण्यात आले म्हणून कर्णाने प्रतिज्ञा घेतली होती की द्रोणाने नाकारले तर द्रोणाच्या गुरुकडून म्हणजे परशुराम यांचेकडून मी शिकेन. मग खोटं बोलण्याशिवाय दुसरा उपाय नव्हता असे तो सांगतो...

"एक गुरु जे फक्त राजकुमारांना शिकवतात तर दुसरे फक्त ब्राम्हणांना, मग मी अशा स्थितींत काय करायचे? शिक्षणाचा अधिकार तर प्रत्येकाला असतो जे मला का नाकारण्यात आलं? तेही माझी चूक नसताना?" असा प्रश्न कर्ण विचारतो. सगळ्यांना ते म्हणणे पटते.

पुढे कर्ण अर्जुनाला म्हणतो, "खरे तर आपण युध्दात समोरासमोर यायला हवे होते. तिथे कुणीच सुर्यपुत्र आणि कुणीच इंद्रपुत्र नसेल फक्त एक योद्धा दुसऱ्या योध्याशी लढला असता आणि समजा मेहनत करून परशुराम यांचेकडून प्राप्त केलेले ब्रह्मास्त्र माझेकडे युद्ध करताना असते आणि कवच कुंडले असती तर सांग अर्जुना कोण जिंकले असते?"

अर्जुन विचारात पडतो आणि म्हणतो, "शिक्षणाचा हक्क प्रत्येकास असतो, कर्ण तू बरोबर म्हणत आहेस! आणि कोण जिंकले असते याला महत्व नाही तर आपण आपल्या सर्व शक्ती आणि सामर्थ्यानिशी लढलो हे मला समजतं! पण शेवटी युध्दात मी जिंकलो असलो तरीसुध्दा..."

द्रोण, "अर्जुन, मी हे सगळं तुझ्यासाठीच केलं रे!"

अर्जुन, "गुरुवर्य मला तुमच्याबद्दल आदर आहे पण मला ही टोचणी सतत बोचत राहील की कर्णाला योग्य शिक्षण नाकारण्यात आलं होतं आणि तो एक शापित होता जे मला आता कळतंय आणि अशा कर्णाशी मी युद्ध जिंकलो हे मला योग्य वाटत नाही!"

पुढे दुर्योधन म्हणतो, "कर्णा मित्रा तू परशुराम यांना माफ कर पण त्यांना ही कल्पना नाही की तुझ्या रूपाने त्यांनी किती चांगला शिष्य गमावला ज्याने आपल्या गुरूची कीर्ती आणखी वाढवली असती!"

चित्रगुप्त मान्य करतात की दोन्ही गुरूंनी कर्णासोबत जे केलं ते योग्य नव्हतं आणि त्यांनी त्यांचा शिक्षक धर्म पाळला नाही. म्हणून कर्णावरचा हा आरोप सुध्दा निराधार आहे!"

चित्रगुप्त कर्णाबद्दल शेवटचा निकाल आणि निर्णय देणार तेवढ्यात कृष्ण त्यांना थांबवत कर्णाला म्हणतो, "कर्ण, तू कोण आहेस नेमका सांगतोस का? कुंतीपुत्र, सुतपुत्र, अंगराज, कर्ण, वासुसेन, दानवीर, नेमका कोण?

कर्ण, "मी समजलो नाही केशवा? मलाच समजतं नाही मी नेमका कोण?"

कृष्ण, "कधीपर्यंत शोध घेशील स्वतःचा? तू आयुष्यभर फक्त स्वतःच्या शोधात राहिलास पण दरवेळेस जी ओळख मिळाली तिचा तू प्रामाणिकपणाने अंगीकार केला नाहीस. तुझा प्रत्येक बाण हा लक्ष्य भेदण्यासाठी न निघता तो एकेक शंका घेऊन निघायचा!"

कर्ण, "मग मी काय करायला हवे होते नेमके?"

कृष्ण, "द्रौपदीचा अपमान थांबवू शकला असतास, अभिमन्यूच्या वधाच्या कटापासून अलिप्त राहू शकला असतास किंवा जेव्हा तुला माहित पडले की तू कुंतिपुत्र आहेस तेव्हा पुन्हा पांडवांकडे परत जाऊ शकला असतास!"

कर्ण, "दुर्योधनाला सोडून धोका देऊन?"

कृष्ण, "त्याने तुला माफ केलं असतं, विचार त्याला!"

कर्ण, "त्याने माफ केलं असतं पण मी स्वतः ला माफ नसतो करू शकलो!"

कृष्ण, "ही तुझी आणखी एक समस्या! तू कुणाला क्षमा नाही करू शकत, ना कुंतीला, ना अर्जुनाला, ना द्रोणाला, ना स्वतःला! करून टाक सगळ्यांना माफ आता... आणि स्वतःला सुध्दा आणि हो मोकळा!"

(कर्ण येथे एपिसोड समाप्त झाला पण "माध्यमांतर" हे सदर सुरूच राहील. तर वाचक मंडळी, भेटूया पुन्हा पुढच्या अंकात आणि जाणून घेऊया टिव्ही किंवा सिनेमा जगतातील अशाच एखाद्या नवीन रंजक मालिकेच्या एपिसोड्स किंवा फिल्म्सबद्दल!)