जात जाते हो ....? भाग २
- सत्यजीत भारत
नवीन पनवेल, ७२०८७८९१०४
बऱ्याच वर्षांनी दिबांग गावी आला होता. सोबत बायको अन् दोन गोंडस मुलं सुध्दा होती. तसं मुलांनीच हट्ट धरला होता गावच्या देवीची यात्रा पाहण्याचा. दिबांग मुलांना व बायकोला पहिल्यांदाच गावी घेऊन आला होता. सध्या गावी त्याची एकच जवळची अशी चुलतचुलती राहते. आईवडील बऱ्याच वर्षांपूर्वी वारले होते. अन्य कुटुंबसदस्य नोकरीधंद्यासाठी दूर- दूर वर गेलेत म्हणून दिबांग चुलतीच्या कोपटात उतरला. दिबांग गावी आल्याचं हर्षदनी फोनकरून अण्णांना कळवलं होतं. लगेच अण्णांना दिबांगनी त्यांचा केलेला आदर-सत्कार आठवला. त्यांचे मन गदगदून आलं.
त्यांनी आपल्या एका पणतू अभिला दिबांगला घरी फराळासाठी आमंत्रण देण्याकरिता पाठवल. सोयराला कळताच तीनं अण्णांना दिबांग हा चांभाराचा आहे असं सांगितलं. सोयरा ही अण्णांची धाकटी नात-सून पण अण्णांनी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. माईंना त्यांनी दिबांगची चांगली आवभगत करण्याविषयी निर्देश केले. अण्णांनी घरातील सर्वांनाच हा दिबांग शहरात उंचच उंच गगनाला भिडणाऱ्या माडीवर राहत असल्याचं सांगितलं. अण्णांना दिबांग हा उंच आकाशी राहत असल्याचं खूपच अप्रूप वाटत होतं. खरं म्हणजे दिबांग हा रेल्वेमध्ये एका ऑफिसरच्या पदावर काम करत होता. त्याचे घर हे त्याला रेल्वे तर्फे राहण्यासाठी दिलेले क्वार्टर होते.
अभि चांभारवाड्यात आला. तसा तो आधी सुध्दा बऱ्याच वेळा येऊन गेला होता. पण ते लपून छपून. अण्णांना न सांगता. पण आज तो पहिल्यांदाच अण्णांच्या सांगण्यावरून चांभारवाड्यात आला. पुतळाबाईंच्या कोपटा बाहेरच उभं राहून त्याने आवाज दिला. "ओ आजी.....ओ आजी....". कोण आपल्या कोपटा बाहेर आरोळ्या ठोकतोय हे पाहण्यासाठी पुतळाबाई बाहेर आल्या. त्यावर अभि म्हणाला "ओ आजी तुमच्याकडे जी ममईची पाव्हनी आलेत... त्यांना अण्णांनी वाड्यावर फराळासाठी बोलावलय." हे ऐकून पुतळाबाई स्तब्धच झाल्या. त्यांचा आपल्या कानावर विश्वास बसेना. त्यांनी पुन्हा पुन्हा विचारून खात्री केली व म्हणाली "आता बरंच ऊन आहे...ऊन उतरू दे मग सांजापरी मीच घेऊन येते त्यांना वाड्यावर". अभि निघून गेला.
सांजच्यापरी सूर्यनारायण उतरंडीला लागल्यावर पुतळाबाई दिबांग व त्याच्या बिऱ्हाडला घेऊन अण्णांकडे निघाली. वाड्यासमोर येताच अण्णांनी पुढे होऊन दिबांगचं स्वागत केलं. वाड्याच्या आत घेऊन गेले. त्यांनी नवीन जाड घोंगडे आंथरले व त्यावर त्यांना बसण्यास सांगितले. त्यांना डेऱ्यातील थंड पाणी पिण्यास दिलं. त्यांची बरीच आपुलकीने चौकशी केली. घरातील सर्व मंडळींना त्यांची ओळख करून दिली. दिबांग मुंबईला उंचच उंच पाच मजली माडीवर राहतो हे त्यांनी आवर्जून सांगितले. सर्व पाहुणे मंडळींना कपबशीतून चहा दिला. त्यांना जेवणाचा सुद्धा आग्रह केला. पण दिबांग नको म्हटला. पण या सर्वांमध्ये कोणीतरी एक नव्हतं. कोण बरं ? दिबांगची चुलती पुतळाबाई. पुतळाबाई ओसरीच्या बाहरेच शेणाने सारवलेल्या भुईवर चवड्यावर बसली होती. तिला साधं पाणीही विचारलं नव्हत. शेवटी सोयरा एका जर्मलच्या ताटात कोरी चहा घेऊन बाहेर आली. तीनं ते ताट दुरवरच ठेवलं. पुतळाने ते ताट उचलून गटागटा चहा घशातून खाली उतरवला. आत बसलेला दिबांग हे पाहत होता. पोरांनी आजीला आत बोलावण्याचा प्रयत्न करताच, दिबांगनं त्यांना गप्प केलं. एक वेळ अशी होती जेव्हा दिबांगही बाहेर ओसरीवर बसायचा. त्यालाही वाड्यात येण्यास मज्जाव होता. आज बरं असं काय घडलं की आज तो वाड्यात घोंगडीवर बसून कपबशीतून दुधाचा चहा पित आहे.......?
जाताना दिबांगच्या पत्नीची खणा नारळाने ओठी भरली गेली. माईंनी बाहेर येऊन वाळत घातलेल्या काही कांद्याना उचलून पुतळाबाईच्या पदरात टाकलं. तीनं भी गोड हसत कांद्याना पदरात झेललं व खुश होऊन ती दिबांगच्या बिऱ्हाडा सोबत चांभारवाड्यातील आपल्या कोपटाकडे निघाली.....
आज दिबांग सवर्ण झाला होता तर त्याची गरीब अडाणी गावंढळ चुलतचुलती पुतळाबाई अस्पृश्यच राहिली.....
(प्रस्तुत कथा सत्य घटनेवर आधारित आहे. वाचकांना नम्र विनंती आहे की त्यांनी आपला अभिप्राय लेखकाला व्हाट्सअपच्या माध्यमांतून कळवावा)