आला श्रावण सृष्टीचा क्षण
ADV .सौ संगीता श्रीकांत केंजळे
गोडोली , सातारा
मोबाईल : 9404667930
किरण पांघरून मेघ विहरती
इंद्रधनूने सजले नभांगण
हिरवे गालिचे अंथरून धरणी
ऋतू ऋतूंचे करिते पूजन
आला श्रावण सृष्टीचा क्षण
ऊन पाऊस लपंडाव खेळती
क्षितीजावरही उतरले घन
पानोपानी सरी उतरल्या
झाड वेलींचे भिजले कण कण
आला श्रावण सृष्टीचा क्षण
शुभ्र फुलांचे सडे शिंपून
गंध प्राजक्ताचा जाई स्पर्शून
रंगीत रंगीत फुले बहरली
करते सृष्टी रंगांची उधळण
आला श्रावण सृष्टीचा क्षण
स्फटिका सम शुभ्र धबधबे
झेपावती डोंगर कड्यातून
हिरवाईने डोंगर नटले
माती भिजली सुगंध उधळून
आला श्रावण सृष्टीचा क्षण
झाड वेलींची आनंद सळसळ
पानाचे ते तृप्त लोचन
अवघी धरा हर्षित झाली
रिमझिम धारा भिजले मन मन
आला श्रावण सृष्टीचा क्षण
खळखळ भरुनी नद्या वाहती
चार चरातून उमाळे जीवन
जणू भूवरी स्वर्ग उतरला
निसर्गाचा हा सोहळा पाहून
आला श्रावण सृष्टीचा क्षण