Android app on Google Play

 

अध्यात्मावर बोलू काही...

 

-    सत्यजीत भारत
नवीन पनवेल,  ७२०८७८९१०४

आध्यात्मिक असणे म्हणजे काय....?

विज्ञान आपल्याला भौतिक सुख सुविधा पुरवू शकतो पण आत्मिक शांती व आनंद नाही देऊ शकत. हीच हरवलेली  शांती व आनंद प्राप्त करण्यासाठीमनुष्य धडपड करत आहे. आपल्याला आत्मिक शांती व आनंद विज्ञान अथवा पैशाच्या माध्यमातून नाही मिळू शकत.

आज मनुष्य अधिकच दु:खी  , अशांत व मानसिक तणावाने ग्रस्त दिसतो. दु:ख, अशांती व मानसिक तणावातून मुक्त होणे म्हणजेच सुख, शांती व आनंद प्राप्त करणे होय. हे संभव आहे अध्यात्माच्या माध्यमातून....

आज कोणाला विचारलं तुम्ही आध्यात्मिक आहात का तर त्यांचे उत्तर असते हो मी आध्यात्मिक आहे. तुम्ही आध्यात्मिक आहात म्हणजे  काय ? तरत्यांचे उत्तर असतं आ आध्यात्मिक असणे म्हणजे रोज देवाची नित्यनियमाने पूजा करणे , तीर्थयात्रेला जाणे, नवस करणे, धार्मिक स्थळांना देणगी देणे, भाळावरती टिळा लावणे, व्रतवैकल्य करणे, घरात गणपती बसवणे, सत्यनारायणाची महापूजा घालणे, ब्राह्मणभोज आयोजित करणे इत्यादी इत्यादी....

आता श्रावण मास सुरू झाला आहे. या मासात धार्मिक कर्मकांडांची बरीच रेलचेल असते. काहींचा चातुर्मास तर काहींचा श्रावणी शाकाहार तरमहिलावर्गाचा श्रावणी सोमवार व नवविवाहितांची मंगळागौर.... कुळाचाराच्या नावाखाली बरीच व्रत-वैकल्ये केली जातात. पण या सर्व कर्मकांडांच्यामाध्यमातून आपल्याला खरंच सुख, शांती व आनंद प्राप्त होतो का ? प्रत्येकाने अंतर्मुख होऊन याचे उत्तर शोधले पाहिजे. तर त्याचे उत्तर आहे नाही. कारण या सर्व गोष्टी अध्यात्मापासून भिन्न आहेत.

दुःखी अवस्थेतून आपण कसे बरे मुक्त होऊ शकतो....? याचं उत्तर अध्यात्म देत आहे. अध्यात्म सांगते आपण दु:खी कशामुळे आहोत हे प्रथम जाणूनघ्या जेणेकरून दुःखाचं कारण आपण दूर करू व  उरेल तो फक्त आनंद आनंद आनंद....

जेंव्हा जेंव्हा विकार उत्पन्न होतात तेव्हा तेव्हा आपण दु:खी होतो.  हे विकार आहेत क्रोध, लोभ,  वासना, भय, मत्सर, ईर्षा, अहंकार इत्यादी. या मनोविकारतून कायिक व वाचिक दुष्कर्म घडतात व दुःखाचा डोंगर वाढत जातो.

जेंव्हा जेंव्हा मन विकारांपासून मुक्त होऊन निर्मळ होते तेव्हा स्वाभाविकपणे ते स्नेह, सद्भाव, मैत्री आणि करुणा यांनी भरून येते.अशा वेळी सुखशांतीचा स्वतःला तर अनुभव येतोच पण अप्रत्यक्षपणे दुसऱ्यांनाही सुख शांती देण्यास आपण कारण होतो. हेच खरे अध्यात्म.....

तर चला या श्रावणात आपण विकारातून मुक्त होऊन अध्यात्म पथावर चालूया व खऱ्या सुख शांती व आनंदाचा अनुभव घेऊया.

(वाचकांना नम्र विनंती आहे की त्यांनी आपला अभिप्राय लेखकास नक्की कळवावा)