Get it on Google Play
Download on the App Store

रियल ब्युटी

- संजय डोंगरे
९४२०७०४५८०

माधुरी आणि अरुणचा संसार ठीकठाक होता.मात्र  भांडणे जोरदार होत असत.भांडणांचं कारण होतं माधुरीला असलेलं कर्मकांडाचं भारी वेड.आधुनिक विचाराच्या अरुणला मात्र ते सहन होईना. तिनेही वैज्ञानिक विचारांचा परिपोष आपल्या जीवनात करून आपले जीवन सुखमय करावे असे त्याला वाटे.पण ती ऐकेना आणि भांडणं थांबत ना.

लग्न होऊन  दहा वर्षे झाली होती पण स्वभावाला वळण लावता आले नाही.. अलीकडे तर तिच्याचेहर्यावर   एक अनोखी आश्चर्य कारक चकाकी येऊ लागली. तिचा आधीचा मानी स्वभाव आता बेडर होऊ लागला. सौंदर्याच्या अभिमानाने ती अधिकाधिक फुत्कारू लागली.शेजारची सुनंदा तर मिर्च्या झोंबल्यागत करू लागली.असं कसं झालं ? ह्याचा विचार करू लागली. एकदा संध्याकाळी शाळेतून दोघीही  परततांना आपला रूक्ष त्वचेचा गाल तिच्या समोर नेत सुनंदा म्हणाली, "वहिणी, ह्या आश्चर्याचं रहस्य तरी सांगा." ओठ ओठांवर दाबून   डोळे मोठेमोठे करून ती म्हणाली," आता मी तरी कसं सांगू बाई, झालं ते" आणि आपल्या मानेला झटका देऊन दुडूक दुडूक चालीने ती घराकडे जाऊ लागली.

मोठी बहीण दुपारपासून आली होती. तिला मुलाच्या लग्नासाठी पैसे हवे होते. माधूरीने बँकेतून काढून आणले होते. सकाळी देऊया असे ठरले.दोन्ही मुली ट्यूशनला गेल्या होत्या. सर्वात लहान मुलगा होता. तो बाहेर खेळत होता.

दोघी बहिणींनी गोष्टी करत करत चहा घेतला.आपल्या पाचही जणींना एकच भाऊ असून तो कसा हुशार आहे. त्याला मोठी नोकरी असून तो परदेशात असतो. त्याला सासरेही श्रीमंत मिळाले. आता आपण आपल्या गावातल्या देवी जवळ जाऊन पूजा करून येऊया.अशी चर्चा त्या करू लागल्या. हलकीशी पावसाची सर येऊन गेली . वातावरणात गारवा आला. आकाशात ढग मात्र होतेच.तेवढ्यात अरूणही आला. त्याला त्याची अक्कड सासू दिसली.एखाद्या तमासगीरीन सारखी चापून चोपून तिने साडी नेसली होती.त्याने चेहऱ्यावर हसू आणले. ह्यावेळी कितीचा दणका आहे ..असा त्याच्या मनात विचार आला.

अरुणला त्यांनी त्रस्त करून सोडले होते.

बालपणापासून त्याच्यावर बौद्ध धम्माचे संस्कार होते.माधुरी मात्र अजूनही तिच्या विचारांतून बाहेर यायला तयार नव्हती . जसजसा अरुण विरोध करी तसतशी ती त्यात आणखी रस घेई . नोकरीवर असल्याने ह्या गोष्टी घडतात असे अरुणला वाटे. कधी कधी त्यांचे कडाक्याचे वाद होत. माधुरी अश्या शब्दात त्याचा पाणउतारा करितसे की ज्या शब्दांची त्याला तिच्या कडून स्वप्नातही अपेक्षा नव्हती तरीही तो.तिला सांभाळून घेई. तो चूप राही .. माधुरीचा  बोलून बोलून घसा बसे. रडून रडून पापण्या सुजत. अरुण डॉक्टरांना फोन लावी. डॉक्टर सलाईन लावत. ..त्या दिवशी मुलांचं सगळ अरुण करीतसे.

अरुणने बौद्ध रीतीरिवाज मात्र कधीच सोडले नाही.वर्षावास काळात बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे वाचन होई.

त्यात अरुणचा पुढाकार असे. ग्रंथातल्या गोष्टी तो छान सांगायचा ..ते त्याचं कथाकथनच  असे. तो हलकासा फराळ आटोपून विहारात गेला .माधुरी आणि तिची बहीण घरीच माईक मधला अरूणचा ऊंच आणि पहाडी आवाज ऐकू लागल्या.

आज क्षेमाची गोष्ट होती .बिम्बिसार पत्नी क्षेमा ही सौंदर्याची खाण होती. तिचे सौंदर्य इतके विलक्षण होते की तिला मेकपची जरुरी नसे. तरीही ती तिची छोटीशी मेकप बॅग कंबरेला खोवूनच निघत असे. तिच्या सौंदर्याच्या गर्वभूमीत प्रत्येकाचे स्थान तिच्या खालीच होते. एके दिवशी राजाराणी आपल्या राजवाड्याच्या तिसऱ्या मजल्याच्या गच्चीवर उभे राहून बागेकडे पाहत होते. राजा म्हणाला," क्षेमाss , बघ  ..आकाशात ही बगळ्यांची माला. कुण्या महान चित्रकाराने आपल्या कुंचल्याने आकाशावर चीत्र रेखाटलय  जणू बघ.अहाहा किती सुंदर दिसते.!!"

"हुं " क्षेमेने नाक मुरडले . तिने त्याकडे ढुंकूनही पहिले नाही.त्याचा चेहरा रडवेला  झाला. बावरल्यासारखा तो इकडे तिकडे पाहू लागला. उजव्या हाताने डोळ्याची कड पुसली. स्वतःला सावरलं.लगेच छातीत उत्साह भरला. खाली आलेली नजर तिच्यावर अलगद ठेवली .आणि परत म्हणाला," ती कमळाची फुले..." तिच्या खांद्याला स्पर्श करून ,"बघ...  ओहोहो   नुसतं पाहताच रहावस वाटत त्यांच्याकडे. आहे किणी ,बघ."

पण तरीही क्षेमेने हुं की चू ही केले नाही.त्याला आश्चर्य वाटलं. म्हणून त्याने तिच्याकडे पाहिले. तर ती तळहाता एवढ्या आरश्यात बघून स्वतःच्या भूवयांवरून , ओठांवरून, आपल्या उजव्या हाताची तर्जनी फिरवीत होती. तो तिच्याकडे पाहतच राहिला. ती तिथेच.....

राजा बिंबीसार विचारात गढला.त्याचा गोरापान चेहरा लाल झाला. आपले सुदृढ हात त्याने छातीवर गुंडाळून घेतले. शीशाने ठास्सून भरल्यासारखे त्याचे...मस्तक.मदमस्त रेड्यासारखी मान. ओठांवर अक्षय स्मीत.पण तो  दगडासारखा स्तब्ध झाला  होता. क्षेमेने आपल्या हातातला आरसा पिशवीत टाकला.पिशवी कंबरेला लटकावली.त्याच्या डोळ्यातून आवंढा आला.तो त्याने तसाच घशातून गिळला.तिच्या विषयीची अतीव करुणा त्याच्या डोळाभर आसवांनी तुडुंब झाली.

निसर्गाचं पुस्तक वाचण्यात बिंबिसार तरबेज होता. क्षेमेची ही अवस्था म्हणजे व्याधीग्रस्तता...! हे त्याने ओळखले. ह्या व्याधीला गलचप्प्या देऊन बाहेर काढणे त्याला माहिती होते.मात्र  क्षेमेला हळूवारपणेच या व्याधीतून मुक्त करायचं असं त्यान ठरवलं.

अरुण ग्रंथवाचन  आटोपून घरी आला. त्या दोघीही बहिणी जेवण करत होत्या..त्याने आश्चर्याने विचारले ,'अजून जेवणच सुरूच आहे! ' आणि तो हलकेच हसला. त्यावर तिची बहीण म्हणाली,' माले ,राऊदे माय जेव्याच .' आणि ती उठली देखील. तिच्या मागोमाग माधुरी देखील उठली. आता इतक्या भर रात्री ही भांडू लागली तर कसं ह्या विचाराने अरुणची छाती धडधडू लागली.बोलून तर चुकलो होतो.तो विचार करू लागला.पण माधुरी स्तब्ध होती. तिच्या डोक्यात क्षेमेची कथा दौडू लागली होती.

डोक्यातल्या विचारांचा अश्व राजवाड्यात दौडू लागला.राजवाडा राजगृहाच्या मधोमध.राजगृहाला तर सात पर्वतांच संरक्षण होत...!! राजमहाल सुरक्षित होता. एखाद्या शहरासारख्या त्या वास्तूमधून महाराणी क्षेमाच्या अत्तराचा गंध दरवळू लागला.

राणीने कंबरेची पिवशी काढली. त्यातला आरसा काढून . त्यात पाहिले .भिवयांवरून  उजव्या हाताची तर्जनी फिरवली. ओठ ओठांवर दाबले . आरशातल्या आपल्याच छबिकडे पाहून ती खुदकन हसली.पिशवी डाव्या हातात घेतली आणि आतल्या भव्य शयन दालनाकडे जाऊ लागली. . ...तिच्या केसांचा बिचोडा इकडून तिकडे ,तिकडून इकडे होतांना दिसत होता...त्या कडे बिंबीसाराला पाहिल्याशिवाय राहवले नाही.

बिंबिसार हॉल मधेच थांबला.. लांब श्वास सोडून ऊंच आसनावर बसला . काही वेळ तो तसाच राहिला. मग टाळी वाजवली. एक सेवक आला. " जा, महामंत्र्यांना बोलावून आण ." सेवक द्रुतगतीने निघून गेला.

सूर्य मावळतीकडे निघाला होता.रस्त्याच्या दुतर्फा दिमाखात उभ्या असणाऱ्या झाडांच्या सावल्या विरळ होऊ लागल्या.या अशा समयी महाराजांना महामंत्र्यांची आठवण व्हावी ? हे राजे -महाराजे,मंत्री -महामंत्री कधीही काहीही करतात. त्यांनी मन मानेल तसं वागायचं .. नियम पाळायचे ते

आपल्यासारख्या नोकरदारांनी ...त्याचा अश्व दौडत होता आणि मी जर राजा असतो तर मी कसा वागलो असतो याचा आराखडाही त्याच्या मनात आकारत होता.

महामंत्री तातडीने पोचले. महाराजांचा डोळा लागलेला पाहून ते तसेच बाजूच्या आसनावर बसून राहिले. भिंतीवर टांगण्यासाठी पलिता घेऊन एक सेवक आला. पलीत्याच्या आगीतील चटचट चटचट आवाज येत होता.  महाराजांनी डोळे उघडले.शेजारीच महामंत्री बसलेले दिसले. सेवक दालनातून बाहेर जातांना पाठमोरा दिसत होता. त्याच्या हातात विझलेला पलिता होता. हातपाय ताणून तोंडाने उंउंउंउंउंउं असा स्वर काढीत महाराज म्हणाले," कधी आले" हसत हसत महामंत्री म्हणाले , "आत्ताच" दोघेही एकमेकांकडे पाहू लागले" कोणीही बोलेना . महाराज उभे राहिले. महामंत्रीही महाराजांजवळ गेले. तेव्हा हलक्या आवाजात महाराज म्हणाले," महामंत्रीजी एक काम करायचे आहे. "

" होय महाराज , मी समजू शकतो."

" काय ते "

" काहीतरी महत्वाचं असल्याशिवाय ...'

" होय, तसच आहे. महाराणी बद्दल. "

" काय झालय महाराज ?"

" काहीतरी झालाय तिला"

"काय "

" त्याचाच शोध घ्यायचाय"

" पण...

" स्वतःच्या सौंदर्याच्या अहंकारान  ती इतकी फुगून गेलीय की...."

" पण महाराज ही  व्याधी तर सर्वच स्त्रियांना ...."

" नाही नाही महामंत्रीजी ...ते वेगळ. हे फारच वेगळ काम आहे आता कसं सांगावं तुम्हाला...."

हसू दाबत महामंत्री म्हणाले" राहू  द्या," लगेच सामान्यपणे म्हणाले, "असं करूया वैद्यांना दाखवूया."

" हं. हो काही हरकत नाही ..पण " जरास थांबून महाराज म्हणाले ," ती दुखावेल ना..'

"हो तेही खराय म्हणा ..मग असं करूया का महाराज .." महाराजांनी काही विचारायच्या आधीच त्याने आपले तोंड राजाच्या कानाजवळ नेऊन त्यांच्या

कानात काहीतरी सांगितले. महाराजांचा चेहरा उजळला. त्यांनी  कृतज्ञतेने महामंत्र्याकडे पहिले. महामंत्रीही भूवया  ऊंच करून महाराजांकडे पाहू लागले. मग हसत हसत उठले. महाराजांची अनुमती घेतली.   आणि घराकडे निघाले. रस्त्याच्या दुतर्फा असलेया झाडांमधून रातकिड्यांचा कीर्रर्रर्र असा आवाज येत होता. ट र्र र्र र्र र्र असा आलार्म चा आवाज आल्याने त्याने घड्याळी कडे पाहिले. पहाट हाक मारत होती. रात्रभर अरुणच्या डोळ्याला डोळा लागला नाही. आपण कोणत्या पद्धतीने जगावे हे त्याला कळेना. अक्कड सासू आणि माधूरी झोपल्या होत्या. अरूण उठला आणि नेहमीप्रमाणे दूध आणायला गेला.

आज रविवार असल्याने तो सकाळीच अशोक वाटिकेत वंदनेसाठी गेला. वंदना झाल्यावर नेहेमीप्रमाणे कुणीतरी मार्गदर्शन करणार होते. समितीच्या अध्यक्षांनी अरूण कडे पाहताच तो पडत्या फळाची आज्ञा घ्यावी त्याप्रमाणे उभा राहीला. सुरवातीला बुद्धबाबासाहेबांना वंदन करून तो बोलू लागला..आपल्या समाजाला खोट्या सौंदर्याच्या कल्पनांनी सडवत ठेवले आहे.स्त्री ने आपल्या सौंदर्याच्या कल्पनांना काबूत केले पाहिजे. बिंबीसाराची पत्नी क्षेमाही  अशीच होती.तिची गोष्ट आज मी तुम्हाला सांगतो. अध्यक्षांकडे पाहून त्याने स्मीत केले आणि सांगू लागला. क्षेमा आतमध्ये आपल्या महालात बसलेली होती.बाहेर काय सुरू आहे हे तिला माहिती नव्हतं...राजवाड्यात पहाटेच एक पाहुणे आले.ते जरा विचित्रच होते.ते राजवाड्यात बिनदिक्कत फिरू लागले. त्यांना हवं नको ते क्षेमा बघू लागली.... पाहुणे बॉ सगळीकडे बघायचे. क्षेमेच्या डोळ्यात डोळे टाकून बघितले. क्षेमेच्या लांब सडक बोटांच्या नखांकडे पाहिले. ती पाठमोरी चालत गेली तेव्हा तिच्या तळपावलांकडे पहिले. दुपारी भोजनानंतर सगळे पानदान घेऊन बसले. पाहुणे म्हणाले," महाराज , तुमचे सात गेले नि  पाच राहिले असं तुम्हाला कधी वाटते." तेव्हा महाराज म्हणाले.  " तुमचे तीन तेरा झाल्यावर " त्यावर भोजनकक्षात हास्याचा भूकंपच झाला. तेव्हा राणी डोळे विस्फारून पाहू लागली.  तेवढ्या वेळात पाहुण्यांनी क्षेमेच्या  मस्तकावर हलकेच नजर टाकली. ... सायंकाळपर्यंत पाहुणे थांबले.

दुसऱ्या दिवशी पासून. स्वतः महाराज राणीच्या भोजनाकडे लक्ष देऊ लागले. तिच्या जेवणात ते त्यांच्या जवळचा चिमुटभर भुरका  टाकू लागले.

राणीच्या वर्तनात काहीही फरक पडला नाही. आहार वाढला. पण गर्विष्ठपणा तसूभरही कमी झाला नाही. ती नखांना रंग लावायची.ओठ रंगवायची. दररोज रंगविलेपण. वस्त्रांचे भडक रंग . उत्तानपणे वक्ष दिसतील अशा चोळ्यांचे परिधान. ..या कामसुलभ सवयीत खंड पडला नाही.पांडव पर्वतावरच्या शालवृक्षांना फुले येऊ लागली. वैभार पर्वतावरील झाडांशीही  फुलांची गट्टी होती. निसर्गाची कुणाशीही अनबन नसते. झाडांनीच एक दुसऱ्याला आधार दिला की ते मोहरतात ..

एके दिवशी तथागत वेळूवनात आल्याचे  महाराजांना समजले. त्यांच्या उत्साहाला गारवा सुटला.तथागत म्हणजे विश्व विद्यापीठ. त्यांचा सहवास म्हणजे मातापितागुरूंचा संग . तथागत आणि भिक्षुसंघास  राजवाड्याचे निमंत्रण गेले.नियोजीत वेळेवर ते पोचतील असा रुकार आला. दुसऱ्या दिवशी महाराजा, महाराणी, त्यांचा लवाजमा मुख्य द्वारा वर असणाऱ्या  बुरूजावर उभे राहून भिक्षू संघाची वाट पाहू लागले. काषायवस्त्र परिधान केलेला भिक्षुसंघ दिसताच सगळ्यांचे चेहरे टवटवीत झाले. ओठांवर फुललेले हास्य जो तो एक दुसऱ्याला दाखवू लागला.पळसाच्या फुलांनी लदबदलेली झाडं समोरून येतांना दिसत होती. मंद स्वरात 'बहुजन हिताय बहुजन सुखाय' असे  उच्चारण ऐकु येत होते. सागराच्या लाटांप्रमाणे संघ पुढे पुढे मार्गक्रमित होऊ लागला.. इतक्यात एका गल्लीतून भस्कन एक माणूस आला. लडखडत खाली पाहत तो चालला होता. ...चालता चालता अचानक त्याचा तोल गेला. आणि तो  बाजूच्या नालीत पडला. विजेच्या चपळाईने तथागत त्याच्या जवळ गेले. त्याला उचलले. संघाटीने त्याचे अंग पुसले. त्याचं अंग गरम होत. त्याला ज्वराची बाधा झाली होती. ' बाबा काय झालं बाबा.' तथागतांचे ते करूणार्द्र शब्द ऐकून त्याच्या  डोळ्यातून उष्ण अश्रू वाहू लागले.आजूबाजूचे लोकही धावून आले. तथागतांकडून त्या व्यक्तीला घेतलं. तथागतांकडे सरमसांड्या नजरेने पाहत त्याला वैद्याकडे नेऊ लागले.

ऊंच बुरूजावर उभ्या असणाऱ्या क्षेमेने हे दृश्य पाहिले. तिच्या अंगाला झाडणी आली. चेहरा आंबट झाला. 'हुं 'असे तिरस्कार दर्शक अक्षर उच्चारले.

तोंड वाकडे केले. उपहासात्मक हसत पाय ताठ केले. हात लांब केले. मान ताठ केली. डोळे मोठे केले. ओठ गच्च दाबले. आपले वस्त्र निट केले.ऐटीत पावले टाकीत आत जाऊ लागली.

तथागतांच्या पाठोपाठ भिक्षुसंघ आला.राजा आणि राण्यांनी   त्यांचे पाय धुतले. तलम वस्त्रांनी पुसले. हात धुवायला पाणी टाकले. बसायला टाकलेल्या आसनांकडे नेले. गुढग्यावर बसून त्यांना भोजने वाढली. भोजनानंतर भिक्षुसंघाने सामुहिक आशीर्वाद दिला. आज भन्ते कौडींञ धम्मदेसना देतील. असे सांगण्यात आले.

जेष्ठ पुत्र अजातशत्रू , त्याचा मित्र वस्सकार आणि आणखीही समवयस्क मित्र समोरच बसले होते. त्यांची चुळबुळ पाहून महामंत्री वस्सकाराजवळ गेले. हळू आवाजात म्हणाले,' बाळ , भंतेजींच्या प्रवचन सुरु होण्या आधी तुम्ही अजातशत्रू पासून थोडं लांब बसा.उठा बरं..' वस्सकाराचा चेहरा रागाने लालबुंद झाला. ते झटक्यात उठला  आणि  निर्देषित ठिकाणी बसला. पण लगेच तिथून ऊठला . अजातशत्रूजवळ गेला. त्याच्या कानात काहीतरी सांगितले.अजातशत्रुने मित्रांच्या कानात तसेच सांगितले. सहाही जण उठून उभे राहिले. दूर कोपऱ्यात घुम्यासारखे जावून बसले. ...भंतेजींच प्रवचन  झालं .

राजवाडा म्हणजे एक शहरच होत . अनेक लोक तिथ राहत होते. आपापल्या दालनात गेल्यावर फक्त पहारेकऱ्यांचेच आवाज ऐकू येऊ लागले.आपण इथे बसलेले आहोत . आपल्याला  इथे बसेस , गाड्यांचे आवाज येतात . रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांचे बोलण्याचे आवाज येतात आपण ते कानावेगळे करतो. त्यावर तिथे थोडी खसखस पिकली.अध्यक्षांनी हलकेच हसतहसत घड्याळ पाहून घेतले. अरूण न थकता सांगत होता.महाराज रात्रभर झोपले नाही. विचार करत होते. क्षेमा तथागतांसमोर का आली नाही हा प्रश्न त्यांना सतावत होता...रात्रभर एकच प्रश्न . असं कधीच  झालं नव्हत . ह्या बेचैन अवस्थेत महाराजांचा डोळ्याला डोळा लागला नाही.अशातच आपल्या स्वतंत्र शैलीत पहाट अंकुरली.महाराजांनी टाळी वाजवली. सेवक आला. ,"राज कवींना बोलावून आण." सेवक गर्रकन वळला . सैनिकी डौलात कदम टाकीत दारापर्यंत गेला. हलकीशी मान वळवून महाराजाकडे पाहिलं. महाराजांच्या चेहऱ्यावर स्मीत होत .ते पाहून सेवकाने हसत हसत दार ओलांडले.

महाराज उठले. पुरुषभर उंचीच्या चौकोनी पेटाऱ्यातून एक वस्त्रपत्र काढले. त्यावरच्या कविता वाचू लागले. गुरुकुलात असतांना लिहिलेल्या त्या कविता वाचतांना तल्लीन झाले.त्यांचा समकाल सरसर डोळ्यासमोरून सरकू लागला."नमस्कार असो महाराजांना " अशी  गीत सदृश्य ओळ कानावर आली.  तेव्हाच ते आठवणींतून बाहेर आले. वस्त्रपत्र पेटाऱ्यात  ठेवले. आणि अत्यंत आदराने म्हणाले,' यावं कविराज यावं . स्थान ग्रहण करावे असे.' राजकवी हसत हसत स्थानापन्न  झाले. तेव्हा त्यांच्या जवळ जावून आणि  त्यांचा हात हातात  घेवून घोगऱ्या आवाजात म्हणाले,"कविराज, जलपान घेताय ? "

"नाही महाराज "

"ठीक आहे. तर आपणास बोलावण्याच कारण म्हणजे, आज संध्याकाळी विशेष दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे."

"बर"

" त्यात आपणास वेळूवनाच अत्यंत सुंदर वर्णन करायचं आहे."

'बर"

"तुमची प्रतिभाशक्ती बेफाम होऊ दे  आज"

" होय महाराज ,पण काय प्रयोजन आहे ? "

" ते मी तुम्हाला नंतर सांगतो ."

' काही हरकत नाही महाराज '  असे म्हणून ते उभे राहिले लवून नमस्कार केला.आपलं धोतर सांभाळीत मोठ्या लगबगीने तोंडाने गुणगुणत जाऊ लागले.महाराज कृतज्ञतेने पाठमोऱ्या कविराजांकडे पाहू लागले.गर्रकन वळले आणि तितक्याच घाईने विरुद्ध दिशेने जाऊ लागले.

आज दरबार खच्चून भरला होता. राजकविंच काव्यगायन म्हणजे पर्वणीच होती. अनेक दिवसांनंतर राजकविंना स्वतंत्रपणे ऐकण्याची संधी मिळाली होती.

सर्वजण उंची वस्त्रे परिधान करून आणि सुगंधीत अत्तरे  चोपडून आले होते.

राजासनावर महाराज ,महाराणी, राजघराण्यातले महत्वाचे सदस्य विराजमान झाले.महाराजांनी दरबारावर नजर फिरविली.कविराज,प्रधानजी,महामंत्री यांच्या कडे पहिले आणि डावा हात वर केला. सारा दरबार स्तब्ध झाला.महाराजांनी प्रधानांकडे चेहरा

फिरवून  खूण  केली. प्रधानजी उठून उभे राहिले. दरबारातल्या समोरच्या उजव्या कोपऱ्यात पाहिलं आणि हळू हळू डाव्या कोपऱ्यात आपली नजर स्थिरावून म्हणाले,"आज" आणि परत ते आपली नजर उजव्या कोपऱ्यात  नेता नेता म्हणाले,"आपल्या इथे " सभागृहातल्या उपस्थितांनी खाकरायला ,कुणी जांभया द्यायला ,कुणी हळू आवाजात कुजबुजायला लागले. अजातशत्रू वस्सकारादी बच्चे लोक तर

खुदुखुदू करायला लागले. प्रधानांच्या हे लक्षात यायला वेळ लागला नाही की प्रस्तावना आटोपती घेतली पाहिजे. प्रयोजन सर्वश्रुत आहेच तेव्हा ते एवढंच म्हणाले की ."..... तर आपल्या

समोर येत आहेत कविराज राजकविजी .." आणि   टाळ्यांचा गडगडाट झाला.

टाळ्यांच्या प्रचंड गडगडटात  राजकवी उभे राहिले. मंचाच्या मधोमध गेले. अत्यंत सद्गदित अंतःकरणाने कंबरेत वाकून सर्वांना नमस्कार केला. डबडबलेल्या डोळ्यांनी दोन्ही हात छातीशी प्रार्थना मुद्रेत ठेवून ते उभे राहिले. दरबारात परत एकदा टाळ्यांचा प्रचंड गडगडाट झाला. उजव्या हाताने धोतराचा सोगा सांभाळीत आणि डावा हात पुढे करीत ते म्हणू लागले, आपल्या समोर सादर करतोय माझ सर्वात सुंदर काव्य वेळूवन ....वेळूवन ..आणि राजकवीजी खड्या  आवाजात गाऊ लागले.

वेळूचे हिरवे पान वाजवी  छान शीळ हलकीशी।

त्यातून हिंडते कोण ही गोरीपान पोर इवलीशी।

ह्या चंचल वाऱ्यासवे होऊनी लीन धूंद-बेधूंद।

डोळ्यात विसळूनी ऋतू येतसे झाक गर्द पिवळीशी।

राजकविंचा आवाज साऱ्या दरबारात घुमू लागला.वावा ..अतिसुंदर.. अप्रतिम..

असे म्हणून टाळ्यांचा कडकडाट झाला. अरूणने गोष्ट संपवली. बसता बसता लबडेने त्याच्या हातात हात मिळवला . अरूणला खूप बरं वाटलं. आपल्या कथाकथनास चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा त्याला वाटू लागली. वंदना आटोपून घरी जाताजाता अशोक वाटिकेच्या गेट जवळ लबडेची पत्नी अरूणजवळ येऊन म्हणाली," अरूण भाई ,आगे क्या हुवा ये तो तुमने बतायाही नहीं।" ती चांगली वाचक  होती. पंजाबी असून त्यांचा आंतरराज्यीय विवाह होता.अरूण म्हणाला, " टाइम नहीं था ना मॅडम. तुम्हाला स्टोरी तर माहित आहेच नां!"

"हो..पण तुम्ही खूप सुंदर सांगता. मला आणखीन ऐकावीशी वाटते."

" सांगेन असाच एखाद्या वेळेस."

"नक्की बरं"

" हो, नक्की"असे म्हणून तो खळखळून हसला. भारतीय बौद्ध महासभा म्हणजे एक कुटुंबच होतं. घरातले कुटुंबातले पेच प्रसंग इथे सहज सुटत. अरुणला हे संघटन भावलं. सतत या अवस्थेत रहावं असं त्याला वाटत असे. पण घरी जाणेही अटळ होते. त्यातून सुटका नव्हती.

घरी  येता येता तो गाडीवर विचार करू लागला. त्या प्रसंगातून जर आपण सावरलो नसतो तर खलास झालो असतो.तो प्रसंग आठवला. कुठूनतरी घरी आल्यावर त्याला वेगळंच चित्र दिसलं. माधुरी अंगणातल्या भिंतीजवळ उभी होती. शेजारचा दीपक नावाचा शिक्षक माधुरीला खेटून उभा होता. अरुणला रागाचा इतका पारा चढला की त्याला काय करावं हेही सूचेना. त्याने गाडीचा अकॅसेलटर जोरात फिरवला. आवाज खूप जोरात आला. त्या आवाजाने दीपक पळून घरात गेला. अरुण घरात आला . आणि जोरात म्हणाला, " काय लावलं हे"

तेव्हा माधुरी म्हणाली, " कशाचं"

" हे इतकं खेटून उभं राहणं म्हणजे काय"

माधुरी खाली मान घालून उभी राहिली. अरुणला समजेना काय करावं ते. त्याने शेजारच्या काकांना सांगितलं सांगा काका काय करावं. काका म्हणाले," तिच्या आई वडिलांना सांगा ना "

"नाही हो काका माझीच बदनामी होईल ना"

"बर बुवा राहुद्या मग"

आता दिवस बदलले.माधुरी त्याच्या पुढे पुढे करू लागली. त्याला हवं नको ते देऊ लागली. असे काही दिवस गेले.मग ती बदलली. पगाराचे पैसे ती त्याला देईना.कर्मकांड करू लागली. तो बोलला की आत्महत्या करण्याची धमकी द्यायची.साडी घेऊन पंख्याला बांधायला जायची.अरूण धावत जाऊन तिला अडवायचा. मग ती रडायची मोठमोठ्याने बोलायची. अरूण आपला चूपचाप ऐकायचा.अरूण तिला आपण काहीच केले नाही,आणि आता करू शकत नाही असा विचार करून करून कुढू लागला.ती बिनधोक स्वतः खर्च करायची. मार्केट फिरायची. वाटलं तिथं जायची. दिवस जाऊ लागले.माधुरीने घराचा ताबा घेतला. अरूण तिला काही बोलू शकत नव्हता. दररोजच्या  वंदने कडेही त्याचं दुर्लक्ष होऊ लागलं. दिवसेंदिवस तो फुगत गेला . प्रचंड वजन वाढलं. पण सत्कर्म फळलं. आणि डॉक्टर साहेबांची भेट झाली. त्यांनी बोधिसत्वाची दुरङमा अवस्थेने समूपदेशन केले आणि डिप्रेशन मधून बाहेर काढले. आज हे सर्वांगसुंदर जग, हा वारा, ही झाडं, हा प्रकाश शोषू शकतो. प्राषू शकतो निसर्गाच्या सुगंधाचा कण न् कण.हे सगळे त्यांचे उपकार.डॉक्टर साहेबांच्या स्मरणाने त्याचा चेहरा प्रफुल्लीत झाला. अध्यक्षांनी सूचवलं म्हणून आपण डॉक्टर साहेबांकडे गेलो. हेही त्याला आठवलं आणि त्याचे डोळे डबडबले.

घर आलं होतं. त्याने बाइक लावली.माधुरी अंगावर ओढून झोपली होती. तो  चिंतेने म्हणाला,"काय झालं गं"

"काही नाही. पोट आणि डोकं खूप दुखतंय"

"चल उठ दवाखान्यात जाऊ "

"नको जाऊ द्या येईल आराम"

" नको गं चल बरं "

"अहो आज रविवारी कुठला आलाय दवाखाना"

"त्याची काळजी नको करूस तयारी कर लवकर"

"पण तुम्ही आत्ताच आले. जेवण तर करून घ्या"

"नको, कर तयारी लवकर"

माधुरीने झटक्यात तयारी केली. आणि तिला बाइकवर मागे बसवून तो तसाच निघाला.कॉलनीतून बाहेर पडल्यावर माधुरी म्हणाली, " त्यादिवशी ग्रंथ वाचतांना तुम्ही कोणती गोष्ट सांगितली होती.

"ती क्षेमाची का"

"हां हां, तेच"

"बरं काय झालं त्याचं"

"मंग पुळे काय व्हते तीच"

हां ते काय मंग. बाईकचा स्पीड कमी करून तो सांगू लागला वेळूवनाच वर्णन क्षेमेनं ऐकलं आणि ती स्तिमित झाली.तिचं गोल गरगरीत डोकं जे वर गेलं ते खाली येईचना ..तिच्या कानात तेच

गुंजत राहील. वेळूचे हिरवे पान.. वेळूचे हिरवे पान ... वेळूचे हिरवे

पान...वेळूचे हिरवे पान ....इतकं सुंदर आहे वेळूवन!!!!  वेळूवन.

वेळूवन..वेळूवन.. वेळूवन.. रात्रभर महाराणी या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत राहिली. कढईतल्या तप्त रेतीत हरबऱ्यासारखी  तडतडत राहिली.

सकाळीच तिने सेविकेला सांगून सारथ्याला बोलाविले . त्याला रथ तयार करायला सांगितले.सारथी रथ जुंपून उभा राहिला. मग लगेच धावत महाराजांकडे गेला. महाराजांनी त्याच्या पाठीवर हात ठेऊन हळू आवाजात त्याला सूचना दिल्या. "होय महाराज" असे म्हणून उजवा हात पोटावर धरून आणि डावा हात मागे करून तो वळला.

वेळूवनाच्या जवळ रथ आला. गार वारा अंगाला झोंबू लागला. बांबूच्या थोंबी च्या थोंबी अक्राळ विक्राळ पणे दिसू लागल्या . आकाशाशी स्पर्धा करणारी त्यांची उंची.मुग्ध होऊन महाराणी पाहत होती. झुन्झुंझुंझून असा बाजा वाजविल्यासाराखा आवाज येत होता. रथ वेळूवनाभोवती फिरू लागला. गंधकुटी  समोर येताच घोडे अडखळले. समोरचे दोन्ही पाय उचलून जमिनीवर धप्पदिशी आपटले. रथ कलला . एका बाजूला घसरला .सारथ्याने घोड्यांचे लगाम आवळून धरले. महाराणी कडे वळून म्हणाला,'काही नाही महाराणी चाक फसलय. आत्ता काहाडतो '. त्याने लगाम रथाच्या खुंटाला बांधले आणि खाली  उतरला.

महाराणी वेळूवनाकडे सभोवार पाहू लागली.पाहता पाहता तिची नजर गंधकुटी कडे गेली. तथागतांच्या शांत-प्रशांत चेहऱ्यावर नजर जाताच ती तिथेच खिळून बसली. काय झालं काही कळेना. पापणी न लवता ती तशीच रथातून उतरली .गंध कुटीकडे चालू लागली. ...सारथ्याने ते पाहीले .रथाच्या चाकाशी करत असणारी बयाजाटूनची खडखड त्याने थांबवली.दूरवर जांभळाच्या  झाडाखाली घोड्यावर असलेल्या महाराजांकडे त्याने पहिले.आणि तो हसत हसत  महाराजांकडे जायला निघाला. गंधकुटीत भिक्षु-भिक्षुणी,महामंत्री, उपासक-उपासिका  बसलेले होते. महाराणी दारातून सरळ आत गेली. तथागत म्हणाले," ह्या बघा राणी क्षेमा " सर्वांनी क्षेमे कडे पाहिले.  तथागत आणखी पुढे म्हणाले," आणि आता बघा" सर्वांनी तथागतांकडे पाहिले. तथागतांनी डाव्या हाताची तर्जनी एका विशिष्ट दिशेला निर्देशित करून म्हटले "....इथे बघा कोण दिसतंय...ही पण महाराणी क्षेमाच आहे. हुबेहूब तशीच " सगळ्यांनी  तिथं पाहील. क्षेमाही पाहू लागली. अत्यंत सुस्वरूप आणि रूपवान . तारुण्याने मुसमुसलेली . हसऱ्या ओठांची. मादक डोळ्यांची . उभाट  बांध्याची . लांबसडक बोटांची. वाऱ्यावर उडणाऱ्या भुरभुरणाऱ्या काळ्याशार तलम कुंतलांची.मुग्ध होऊन सारे पाहू लागले . तथागतांचा आवाज ऐकू येऊ लागला." बघा हे सौंदर्य ...आता  बघा हेच सौंदर्य खूप मोठ होत जात. खूप खूप सौंदर्य . खूप खूप सुंदरता .."  क्षेमा दिसू लागली.तिचे वाऱ्यावर उडणारे केस दिसू लागले.केस पिंगट झाले. त्यातले काही

केस पांढरेही झाले. आता तिच्या केसांवर जणू प्रकाश पडला . तिचे सारेच्या सारे केस पांढरे झाले.तागा सारखे. केस आखूड झाले . वितवीत झाले. जणू काही तिच्या देहावरून प्रकाश फिरतोय . तिची चामडी गोणपाटा सारखी ढिल्ली ढाल्ली दिसू लागली.पापण्या लोंबलेल्या दिसू लागल्या . लोंबलेल्या स्तनांना चोळीमध्ये  कसेतरीच बांधले होते. कंबर वाकलेली . मान थरथरत होती. डोळ्यांना चिपडांचे फेदोड दिसत होते. नाकातले केस पांढरे झालेले होतें  त्यात शेंबूड दिसू लागला .साऱ्या शरीराला दुर्गंधी सुटली. दुर्गंधीने लोक नाक दाबून धरू लागले...सर्वजण इकडे तिकडे पाहू लागले.

क्षेमेने ओठ गच्च मिटून घेतले .आणि ती सटालकन  खाली बसली. ती भानावर आली तेव्हा उपासक लोक जायला निघाले होते. सूर्य चांगलाच वर आला होता. तथागत आणि भिक्षुसंघास कालच महामंत्र्यांनी   भोजनाच निमंत्रण दिल होत. ते त्यांनी  स्वीकारलं होत.त्यांना घ्यायलाच ते आले  होते .

क्षेमेने कृतज्ञतेने तथागतांकडे पाहिले. दोन्ही हात जोडले. उठली. तसा तिचा तोल गेला. बिंबीसाराने चीत्यासारखी झेप घेवून तिला अलगद आपल्या

बाहुंमध्ये झेललं . क्षेमेन डोळे उघडून पाहिलं तिच्या.सर्वांगावरून पहिल्यांदाच गुलाबी रंगाचा काटा सरसरून गेला. बिंबीसाराच्या गळ्यात पडून

स्वतःला तिने त्याच्या स्वाधीन केलं. तिच्या उष्ण अश्रूंनी त्याचा डावा खांदा पूर्ण भिजून गेला.

विकारांची नदी वाहून गेली. नवे पाणी आले. राजा-राणीचा संसार दिसामासी फुलू लागला. एके दिवशी बागेतून फिरता फिरता महाराणी  म्हणाली, ' महाराज

एक विनंती  आहे.' क्षणाचाही विलंब न करता महाराज म्हणाले," बोला महाराणी" "विनंती हीच आहे महाराज की  " असे म्हणून आणि महाराजांचा हात गच्च धरून ती  म्हणाली," हा संसार त्याग करून  भिक्षुणी व्हावसं वाटत. मला अनुमती द्यावी." महाराज क्षणभर थांबले. चेहऱ्यावर हसू आलं .म्हणाले,

'पण कशासाठी महाराणी'

'शक्य होईल तेवढ्या जणींना विकार मुक्त करण्याचा प्रयत्न करीन. आयुष्यभर ...'

' माझी काही हरकत नाही . आपणास पूर्ण स्वातंत्र्य आहे.' महाराणीच्या चेहऱ्यावर समाधानच हसू आलं . त्या उदार  अंत:करणाच्या महाराजाची अनुमती

घेवून तिने त्याचं दर्शन घेतलं.  क्षणाचाही विलंब न करता ती अनवाणी

पायांनी भिक्षुणी निवासाकडे चालू लागली. आमची गोष्ट सरो नि तुमचं पोट भरो.माधुरी मुग्ध होऊन पाहू लागली. काय करावं तिला कळेना.हसत नव्हती की बोलत नव्हती की पाहत नव्हती .दवाखाना आला होता . दवाखाना पाहून ती आश्चर्यांकीत झाली.

गाडी बाजूला लाऊन ते आत गेले.एमडी डॉक्टर कडे घेऊन आल्याने तिला अरुणचा अभिमान वाटला. डॉक्टर राऊंड वर आले तेव्हा त्यांनी तिला तपासले. रविवार असूनही अरूणच्या खातीर अनेक तपासण्या केल्या आणि घोगऱ्या आवाजात म्हणाले ," यांना मायग्रेनचा त्रास आहे. आशाप्रकारचे .त्रास जाणवायला लागले की पटकन ही गोळी जिभेखाली ठेवायची."

दोघेही हसत हसत घरी आले.अरूणला खूपच मोकळं वाटत होतं. निदान झालं होतं. आयुष्यभर घाबरून राहिलो पण कुणाच्याही लक्षात आलं नाही. नाहीतर आयुष्य खूप पुढे गेलं असत . पण जाऊद्या जे काही उरलं आहे ते आता सुखात जगूया.

घरी जाता जाता माधुरी एका हातगाडी कडे निर्देश करून  म्हणाली," ते कॅलेंडर घ्यायचं" तेव्हा अरुण म्हणाला, "नको" माधुरीला हसू आलं. त्या रात्री तिला गाढ झोप आली.