Get it on Google Play
Download on the App Store

एप्रिल २८ - संत

असंताची आवड नाहीशी होईल तेव्हाच संत हवासा वाटेल . विषय आपल्याला त्रास देतात , पण ते सोडावे कसे हे समजत नाही . जंगलात सापडलेल्या माणसाप्रमाणे आपले झाले आहे . आपली वाट चुकली आहे असे ज्याला वाटेल तोच जंगलातून बाहेर पडण्याची वाट विचारतो . ‘ आता वय फार झाले , काळाच्या स्वाधीन होण्याची वेळ आली , रामा तूच आता तार , ’ अशी तळमळ लागली , तरच संतसहवास लाभेल . सत्संगत हवी असे आपण म्हणतो खरे , पण मागतो मात्र ‘ असत ’ ; मग आपल्याला सत्संगत कशी मिळेल ? स्वत :ला कसे विसरावे हे कळण्याकरताच संताला शरण जावे . आपले विस्मरण म्हणजे भगवंताचे स्मरण . वडील दूर आहेत , त्यांचे पत्र नाही , म्हणून काळजी करतो ; पण जन्मापासून भगवंत दूर आहे , त्याची तळमळ का लागू नये ? आपण नामस्मरण करतो , पण ज्याचे नाम घेतो तो कोण , असा विचार करतो का ? विषय सोडल्याशिवाय राम कसा भेटणार ? रामही हवा आणि विषयही हवा , हे जुळणार कसे ?

मला जोपर्यंत चिमटा घेतलेला कळतो तोपर्यंत कर्ममार्गानेच जाणे जरुर आहे . कर्ममार्ग सांभाळताना , ‘ कर्ता मी नव्हे ’ ही भावना सांभाळणे जरुर आहे . जो खरा अनुभवी आहे तो बोलणारच नाही , आणि बोललाच तर तो अगदी थोडे बोलेल ; तो उत्तम होय . अनुभवी खरा , पण नाइलाज म्हणून जो बोलतो तो त्याच्यापेक्षा थोडा कमी समजावा . कोणीतरी बोलल्याशिवाय लोकांना कळणार कसे , म्हणून हे लोक कमीपणा पत्करुनही पुष्कळ बोलतात . परंतु अनुभव नसताना उगीच शब्दपांडित्य करणारे हे अगदी खालच्या दर्जाचे होत . ज्याला अनुभव कमी त्याला शब्दपांडित्य फार असते . जो जगाला फसविणार नाही आणि स्वत :ही फसणार नाही , असाच मनुष्य जगाला मार्गाला लावू शकेल .

कित्येक साधू दगड मारतात किंवा शिव्या देतात , तरी लोक त्यांच्या मागे लागतात , कारण त्यांच्या शिव्यादेखील आशीर्वादाप्रमाणे असतात . हे कित्येक लोकांच्या ध्यानी येत नाही . एखादा मुलगा बापाला म्हणू लागला की , ‘ मी इतका जवळचा , पण मला मिळतो मार ; आणि तो लांबचा पोर , त्याचे मात्र लाड ! ’ पण तो मारच आपल्या हितासाठी असतो , हे त्याला नाही समजत ! साधूच्या बोलण्यामध्ये किंवा मारण्यामध्येसुध्दा दुष्ट बुध्दी नसते . संत जे काही बोलतील ते जगाच्या कल्याणाकरताच असते . संत नि :स्वार्थी असतात . ते तळमळीने सांगतात . त्यावर आपण श्रध्दा ठेवली पाहिजे . संताच्या सांगण्याचा खरा अर्थ आचरणानेच कळेल .