एप्रिल २१ - संत
कोणत्याही मंगल कार्यात सर्वाआधी गणपतीचे आवाहन करतात , आणि सगळे कार्य संपले की सर्वांचे शेवटी विसर्जन करतात . त्याप्रमाणे अनुसंधानेच पोथीला सुरुवात करावी आणि अनुसंधानेच पोथीची समाप्ती करावी . लौकिक कार्यामध्ये गणपतीचे विसर्जन झाल्यावर आपण शिल्लक उरतो , पण अनुसंधानाचे विसर्जन करताना आपणही त्यात नाहीसे व्हावे . " जसे ठेवायचे असेल तसे ठेवा , पण आपला विसर पडू देऊ नका , एवढी भीक घालावी . " अशी गुरुच्या चरणी प्रार्थना करावी .
भगवंताला विसरुन भजन करु नका . भगवंताची आठवण ठेवून भाजी जरी आणली तरी त्याचे श्रेय जास्त आहे . जगाच्या लाजेला भिऊन भगवंताला अंतर देऊ नये . ‘ मी कोण ’ याचा विचार करावा , आणि तो करण्यासाठी , ‘ मी नाही कोणाचा ’ हे बघावे . मी आप्तेष्टांचा , बायको - मुलांचा , आईबापांचा तर नाहीच , पण मी देहाचा आणि मनाचाही नाही ; असे करता करता जो राहील तो मी . खरे समाधान एकपणात आहे , अद्वैतात आहे . म्हणून , द्वैताचा जनक जो अभिमान तो कमी कसा होईल हे बघावे . याकरिता , मी कर्ता नसून देव कर्ता आहे असे मानावे , सर्वांभूती भगवदभाव पाहावा , सत्समागम करावा . सत्समागम म्हणजे सत्याचा समागम . सत्पुरुषाच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वृत्ती बनविणे हा खरा सत्समागम आहे . संतांवर अनन्य श्रध्दा ठेवा . त्यांच्या चालीने चाला . त्यांच्या समागमात दैन्य मानू नका . जे तुमची एकसारखी विषयातली नडच भागवतील ते संत नव्हेच . खरे संत विषयाची आसक्ती कमी करतात ; अशा संताला शरण जावे . निर्विषय चित्त संतांनाच करता येते . संत हे ईश्वरदर्शनाची तळमळ उत्पन्न करतात . तळमळ उत्पन्न करुन देणे हीच संतांची कामगिरी . संतांची भाषा तळमळीची असते , म्हणून ती तळमळ उत्पन्न करते . संत सांगतील त्याप्रमाणे वागावे . जग संतांशिवाय असणेच शक्य नाही . जे देहात दिसले पण वस्तुत : देहातीत राहिले ते संतच होत . आम्हांला त्यांना ओळखता येत नाही याला काय करावे ? नामाच्या योगानेच संत ओळखता येतात , जोडता येतात आणि टिकवता येतात . जो भगवंताचे नाम घेईल त्याला संत भेटेल , आणि तो त्याला भगवंताची प्राप्ती करुन देईल . त्याचे कुठे अडणार नाही . पण जो नुसत्या शब्दज्ञानाच्या मागे लागेल त्याला आसक्ती सुटणार नाही , आणि त्याचे जीवन सार्थकी लागणार नाही .